उत्तर मध्य मुंबई : पूनम महाजन यांचा पत्ता कट, भाजपकडून उज्जवल निकम यांना उमेदवारी !

Santosh Gaikwad April 27, 2024 08:39 PM


मुंबई :  मुंबई उत्तर-मध्य लोकसभा मतदारसंघातून भाजपनं ज्येष्ठ विधीज्ञ उज्ज्वल निकम यांना उमेदवारी जाहीर केली आहे. त्यामुळं या जागेवरुन विद्यमान खासदार असलेल्या पूनम महाजन यांचा पत्ता कट झाला आहे. तर दुसरीकडं याच जागेवरुन महाविकास आघाडीनं वर्षा गायकवाड यांना उमेदवारी जाहीर केली आहे. त्यामुळं आता निकम विरुद्ध गायकवाड यांच्यामध्ये लढत होणार आहे. 

 देशातील निष्णांत वकील म्हणून उज्जवल निकम यांची ख्याती आहे. २६/११  मुंबई हल्ल्यामध्ये उज्ज्वल निकम यांनी विशेष सरकारी वकील म्हणून काम पाहिलं होतं. यामधील  दहशतवादी अजमल कसाब याला फाशीपर्यंत पोहोचवण्यात त्यांनी मोठी भूमिका बजावली होती. त्यांनी  अनेक महत्वाच्या खटल्यांमध्ये सरकारी वकील म्हणून काम केलं आहे.  

 
दरम्यान, मुंबई उत्तर-मध्य लोकसभा मतदारसंघातून पूनम महाजन या भाजपच्या विद्यमान खासदार आहेत. महाजन यांचे तिकीट कापलं जाणार असल्याचे अनेक दिवसांपासून चर्चा होती. या जागेवरून मुंबई भाजप अध्यक्ष आशिष शेलार यांच्या नावाची चर्चा होती. अखेर भाजपनं उज्ज्वल निकम यांना उमेदवारी जाहीर केली आहे.  कालच महाविकास आघाडीकडून मुंबई काँग्रेसच्या अध्यक्षा वर्षा गायकवाड यांना मुंबई उत्तर-मध्य लोकसभा मतदारसंघातून उमेदवारी जाहीर केल्यानंतर आज भाजपने अँड उज्जवल निकम यांच्या नावाची घोषण केली.