breaking news: महाराष्ट्र भूषण पुरस्काराला गालबोट; सोहळ्यात उष्माघाताचे बळी, सात-आठ जणांचा मृत्यू

SANTOSH SAKPAL April 16, 2023 10:45 PM

नवी मुंबई, : आज नवी मुंबईत झालेल्या महाराष्ट्र भूषण पुरस्काराला गालबोट लागलं आहे. आप्पासाहेब धर्माधिकारी यांना महाराष्ट्र भूषण पुरस्कार देऊन गौरवण्यात आलं. या कार्यक्रमासाठी आलेल्या काही अनुयायांना उष्माघाताचा त्रास झाला आहे. यामध्ये सात-आठ जणांचा मृत्यू झाल्याची माहिती समोर आली आहे.

एमजीएम रुग्णालयामध्ये काही जणांना उपचारासाठी दाखल करण्यात आलं आहे. या रुग्णांची विचारपूस करण्यासाठी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आले होते. ही घटना दुर्दैवी, दुख:द आणि मनाला वेदना देणारी असल्याची प्रतिक्रिया मुख्यमंत्र्यांनी दिली. तसंच मृतांच्या नातेवाईकांना पाच लाख रुपये सरकारी मदत दिली जाईल आणि उपचार घेत असलेल्यांचा खर्च शासन करेल, असं मुख्यमंत्र्यांनी सांगितलं.

'लाखो लोकांचा जनसमुदाय आला, कार्यक्रम सुरळीत पार पडला. अशाप्रकारची घटना दुर्दैवी. यावर राजकीय भाष्य कुणी केलं यावर बोलू इच्छित नाही. इकडे २४ जणांवर उपचार सुरू आहेत. ५० जण ऍडमिट होते. जवळपास सगळे स्टेबल आहेत', अशी माहिती मुख्यमंत्र्यांनी दिली.

आप्पा साहेब धर्माधिकारी यांना महाराष्ट्र भूषणने सन्मानित करण्यासाठी खारघर येथील सेंट्रल पार्क येथे एका कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. ज्यामध्ये देशाचे गृहमंत्री अमित शहा यांच्यासह महाराष्ट्राचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि मंत्रिमंडळातील सर्व सदस्य सहभागी झाले होते.

उष्माघातामुळे अनेक जण चक्कर येऊन खाली पडले आहेत, तर अनेक जणांना उलटीही झाली आहे. खारगघरमधील टाटा रुग्णालय, पनवेलमधील उपजिल्हा रुग्णालय तसंच मेडी कव्हर रुग्णालय आणि एमजीएम रुग्णालयामध्ये रुग्णांना दाखल करण्यात आलं आहे.