अहिल्यानगर: जलसंपदा मंत्री राधाकृष्ण विखे व माजी मंत्री अण्णासाहेब म्हस्के यांच्यासह ५४ व्यक्तीविरुद्ध लोणी पोलीस ठाण्यात फसवणुकीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. तसेच प्रवरानगर येथील पद्मश्री विठ्ठलराव विखे पाटील सहकारी साखर कारखान्याच्या २००४-५ तसेच २००७ मधील संचालक मंडळाविरुद्ध देखील लोणी पोलीस ठाण्यात फसवणुकीचा गुन्हा दाखल करण्याची कारवाई करण्यात आली आहे. या घडामोडीच्या पार्श्वभूमीवर राधाकृष्ण विखे यांच्या मंत्रिमंडळातून हकालपट्टीची मागणी जोर धरू लागली आहे.
ऊस उत्पादक सभासद बाळासाहेब केरू विखे यांनी दिलेल्या फिर्यादीवरून सर्वोच्च न्यायालयाच्या आदेशाने हा गुन्हा दाखल झाला असून आरोपींमध्ये बँक ऑफ इंडियाचे तत्कालीन विभागीय व्यवस्थापक व युनियन बँकेचे तत्कालीन विभागीय व्यवस्थापक यांचाही समावेश आहे.
बाळासाहेब केरू विखे यांच्या फिर्यादीनुसार कारखान्याचे बनावट कागदपत्रे करून, कर्जाचा प्रस्ताव तयार करून बँक अधिकाऱ्यांशी संगणमत करून अनुक्रमे ३ कोटी ११ लाख ६० हजार ९८६ रुपये व ५ कोटी ७४ लाख ४२ हजार २२० असे एकूण ८ कोटी ८६ लाख १२ हजार २०६ रुपये शेतकरी सभासदांच्या नावे मंजूर केले. प्रत्यक्षात ही रक्कम सभासदांना प्रदान करण्यात आली नाही.
यासंदर्भात कारखान्याचे सर्वेसर्वा राधाकृष्ण विखे यांच्याशी संपर्क साधण्याचा प्रयत्न केला असता ते उपलब्ध झाले नाहीत. तसेच कारखान्याचे कार्यकारी संचालक महेश कोणापुरे यांच्याशी देखील संपर्क होऊ शकला नाही.