महापालिकेकडून पाणी शुल्काचा परतावा : अभ्युदयनगर सहकारी संस्थांच्या महासंघाच्या लढ्याला यश !

Santosh Gaikwad April 12, 2023 06:36 PM


   मुंबई  : अभ्युदयनगर सहकारी संस्थांच्या महासंघाचे माजी अध्यक्ष  नंदकुमार काटकर यांच्या नेतृत्वाखाली महासंघाने गेली ५ वर्षे दिलेल्या निकराच्या लढ्याला यश आले असून मुंबई महापालिकेने ८ जलवाहिन्यांसाठी वाढीव दराने वसूल केलेली सुमारे ११ कोटी  ५६ लाख रुपयांची रक्कम म्हाडास परतावा म्हणून दिली आहे. त्यामुळे वाढीव जल आकारणी विरोधात लढा उभारणार्‍या अभ्युदय नगर वसाहतीतील शेकडो रहिवाशांनी सुटकेचा नि:श्वास सोडला आहे. म्हाडाच्या मुंबई मंडळाने ५६ वसाहतींना सन १९९८ ते २०१८  व पुढे २०२१ पर्यंतच्या कालावधीसाठी ज्यादा दराने वार्षिक सेवा शुल्क आकारणी सुरू केली होती. त्या विरोधात अभ्युदयनगर म्हाडा वसाहतीतील रहिवाशांच्या वतीने महासंघाने न्यायालयात दाद मागितली होती. या पार्श्वभूमीवर महापालिकेने पाणी शुल्काचा केलेले परतावा हा महासंघाचा मोठा विजय मानला जात आहे.


     म्हाडाच्या  मुंबई मंडळाने ५६ वसाहतींकडून सन १९९८ ते २०१८ -२०२१ पर्यंतच्या कालावधीत थकीत सेवाशुल्काप्रमाणेच जादा दराने नवीन सेवाशुल्क आकारणीसाठी बिले पाठविली होती. कोरोनाचा प्रादूर्भाव सुरू असतानाच म्हाडाने घेतलेल्या या अमानवी निर्णयावर टीकेची झोड उठली होती. वसाहतीतील रहिवाशांनी यास तीव्र विरोध दर्शविला होता. महासंघाचे अध्यक्ष श्री. नंदकुमार काटकर यांनी वेळोवेळी महापालिका आणि म्हाडा यांच्या अधिकार्‍यांशी झालेल्या बैठकीत रहिवाशांची बाजू अभ्यासपूर्ण मांडली होती. तथापि, तरीही म्हाडाने आग्रही भूमिका घेत वाढीव सेवाशुल्काचा निर्णय अंमलात आणला. त्या विरोधात महासंघाने न्यायालयात धाव घेतली. त्यात म्हाडा आणि मुंबई महापालिका यांना प्रतिवादी केले. म्हाडाच्या वसाहतीतील पाणी पुरवठा आणि त्यासाठी बिलांची आकारणी म्हाडामार्फत केली जाते. म्हाडाकडून ही रक्कम मुंबई महापालिकेस दिली जाते. या सर्व पार्श्वभूमीवर अभ्युदयनगर सहकारी संस्था महासंघाने न्यायालयात याचिका दाखल करताच मुंबई महापालिकेकडून संबंधित वाढीव दराच्या आकारणीचा आढावा घेण्यात आला. यामध्ये म्हाडा वसाहतीतील पाण्याच्या वापरासाठीचे शुल्क मुंबई महापालिका घेत असून, या संदर्भात वाढीव दराने पाणी दर आकारला जात असल्याचे पालिकेच्या लक्षात आले.


 अभ्युदयनगर वसाहतीत ४८ सोसायट्या असून त्यामध्ये ३४१० सदनिका आहेत. सन २०१८ पासून या सर्व घरांकडून म्हाडाने सन १९९८ ते २०१८ व पुढे २०२१  कालावधीतील वाढीव सेवाशुल्क थकबाकी तसेच सन २०१५-१६ ची मासिक रुपये १०२७ प्रमाणे वाढीव सेवाशुल्क व्याजासह वसुलीस सुरुवात केली. आता मुंबई महापालिकेचे वाढीव पाणीदरा संदर्भात ११ कोटी ५६ लाख  रुपयांची रक्कम म्हाडास परतावा म्हणून दिल्याने रहिवाशांवरील वाढीव रकमेचा भार कमी होणार आहे.  अभ्युदयनगर वासियांच्या या निकराच्या लढ्यात म्हाडाचे माजी सभापती मधू चव्हाण, आमदार अजय चौधरी, माजी नगरसेवक दत्ता पोंगडे आदींचा मोलाचा सहभाग होता.  याकामी महांसघाचे  पदाधिकारी व सदस्य   विलास सावंत, जयसिंग भोसले,  अनिल नाईक , केतन चव्हाण,  नंदू चव्हाण,  भरत कारंडे ,   दत्तात्रय  आमडोस्कर , श्रीमती शहाणे तसेच या कामी भरत वीर, अनंत केळुस्कर व राम बोडके यांनी विशेष परिश्रम घेतले. नंदकुमार काटकर यांनी रहिवाशांच्या वतीने या मान्यवरांचे आभार मानले.