“तो आम्हाला…”,.. सांस्कृतिक मंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी ज्येष्ठ नेते शरद पवारांचा एकेरी उल्लेख केला

Santosh Sakpal June 04, 2023 10:03 PM

MUMBAI : पुरोगामी महाराष्ट्रातील नेते मंडळींचा तोल हल्ली ढासळू लागला आहे. अनेक नेते एकमेकांवर शेरेबाजी करताना अश्लाघ्य भाषेचा वापर करताना दिसतात. तर बरेच नेते शिवराळ भाषा वापरू लागले असल्याचं पाहायला मिळत आहे. तसेच ज्येष्ठ नेत्यांबद्दल आदर राखला जात नाहीये. भाजपा नेते आणि सांस्कृतिक मंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी काही वेळापूर्वी प्रसारमाध्यमांशी बातचित करताना राष्ट्रवादी काँग्रेसचे सर्वेसर्वा आणि महाराष्ट्रातील ज्येष्ठ नेते शरद पवारांचा एकेरी उल्लेख केला.
भारतीय जनता पार्टीत ओबीसींचा सन्मान होत नाही, असा आरोप राष्ट्रवादी काँग्रेसने केला आहे. या आरोपाला प्रत्युत्तर देताना सुधीर मुनगंटीवार म्हणाले, आमचे महाराष्ट्र प्रदेशाध्यक्ष ओबीसी नेते आहेत.. या देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी हे ओबीसी आहेत. परंतु राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात ओबीसी आहेत का?राष्ट्रवादी काँग्रेसचे माजी उपमुख्यमंत्री ओबीसी आहेत का? छगन भुजबळ स्वतःला ओबीसी नेते म्हणवतात, पण कुठे आहेत ते? सरकारमध्ये असताना अन्न आणि नागरी पुरवठा विभाग घेऊन बसले होते. त्यांना तिथे महत्त्व नाही.
सांस्कृतिक मंत्री सुधीर मुनगंटीवार म्हणाले, “हे लोक आम्हाला शिकवतायत ओबीसींबद्दल, परंतु पंतप्रधान नरेंद्र मोदी जातीच्या आधारावर पत्ते खेळत नाहीत. ओबीसींचं राजकारण करत नाहीत. ओबीसींना भाजपात स्थान नाही असं म्हणणाऱ्या या खोटारड्या लोकांपासून जनतेनं लांब राहावं. खोट्या विचारांपासून ओबीसी बंधू आणि भगिनींनी लांब राहावं. खरंतर ओबीसी पंतप्रधान झाल्यामुळे यांच्या (काँग्रेस-राष्ट्रवादी) पोटात दुखतंय.
मुनगंटीवार म्हणाले, काँग्रेसचा पंतप्रधान कोण आहे? तर एक ब्राह्मण आहे, जो जाणवं घालतो. राष्ट्रवादी काँग्रेसचा २२ वर्षांपासून अध्यक्ष कोण आहे? मराठा शरद पवार, तो आम्हाला अक्कल शिकवणार का? जनतेलाही हे समजलं पाहिजे की, मायावी चेहरे घेऊन बसलेल्या या लोकांपासून त्यांनी दूर राहिलं पाहिजे. हे लोक आपल्यासमोरचा मोठा धोका आहेत.