८० वर्षांचा खट्याळ मुलगा ! ( नरेंद्र वि.वाबळे)

Santosh Gaikwad June 05, 2023 05:18 PM


 शिरीष कणेकर हे नावच पुरेसे आहे! कणेकर म्हणजे फिल्लमबाजी, कणेकर म्हणजे इरसालकी, कणेकर म्हणजे फटकेबाजी, कणेकर म्हणजे साखरफुटाणे, कणेकर म्हणजे यादों की बारात, कणेकर म्हणजे एकला बोलो रे, कणेकर म्हणजे धमाल टाइमपास. कणेकर म्हणजे... जशी फिश करी, चिकन करी तशी कणेकरी!


   शिरीष कणेकर आणि आमचे गेल्या चार दशकांचे मैत्रीसंबंध आहेत. ते आमच्यापे़क्षा  खूप ज्येष्ठ आहेत.  पण त्यांच्या सहवासात ही ज्येष्ठता कधी जाणवत नाही, हे कणेकरांचे मोठेपण आहे. कणेकर यांचा परिचय होण्याआधी क्रिकेट आणि सिनेमाविषयक त्यांचे अनेक लेख आम्ही वाचले होते. ते वाचताना वाचनाचा भरपूर आनंद लुटला होता. शिरीष कणेकर ही व्यक्ती दिसायला कशी असेल, बोलायला कशी असेल, वागायला कशी असेल याबाबत मनात भरपूर उत्सुकता होती. त्यांना भेटण्याची तीव्र इच्छा होती. ती इच्छा १९८२ साली पूर्ण झाली. आम्ही आमची कारकिर्द सिनेपत्रकार म्हणून सुरू केली. ८० च्या दशकात आम्ही ‘शिवनेर’मध्ये सिने समीक्षण लिहीत होतो. तसेच महाराष्ट्र टाईम्सच्या शुक्रवारच्या पुरवणीत सिने कलाकारांच्या मुलाखती देखील देत होतो. दर आठवड्याला नव्या सिनेमाचा प्रेस शो एखाद्या मिनी थिएटरमध्ये दाखविला जात असे. कणेकर हे त्या शोसाठी येत असत. तेव्हाच १९८२ मध्ये त्यांच्याशी  प्रथम परिचय झाला. नंतर या परिचयाचे रुपांतर मैत्रीत झाले. ती मैत्री दिवसेंदिवस दृढ होत गेली.


   कणेकरांनी क्रिकेट असो वा सिनेमा. या विषयांवर सदैव आपले परखड लिखाण केले. त्यामुळे अनेकजण घायाळ देखील झाले. अजित वाडेकर, दिलीप वेंगसरकर यांच्यासारखे रथी-महारथी कणेकर यांच्या टीकेचे लक्ष्य ठरले. किंबहुना, इंग्लंडमधील दारुण पराभवानंतर अजित वाडेकर यांनी कर्णधारपदाचा राजीनामा दिला. तो त्यांनी कणेकरांच्या टीकेमुळे व्यथित होऊन दिल्याचे तेव्हा बोलले जात होते. यासंदर्भात आम्ही एकदा कणेकर यांना विचारले, तेव्हा ते म्हणाले, ‘छे हो! लोक काहीही बोलतात. माझ्या टीकेमुळे वाडेकरने राजीनामा दिला हे खरे नाही.’


    पाकिस्तानचा संघ भारतात आला असताना दिलीप वेंगसरकर एका सामन्यात फारच बिचकत बिचकत खेळला. त्यावर कणेकर यांनी आपल्या खास कणेकरी शैलीत झोड उठवली. अब्दुल कादिरने त्या सामन्यात वेंगसरकरचा त्रिफळा उडविल्याचे छायाचित्र त्या लेखात प्रसिद्ध झाले होते. त्या छायाचित्राखाली कणेकरांनी काहीसे असे कॅप्शन दिले होते, ‘तीन तास वीस मिनिटे रडत, रखडत, चाचपडत, अडखळत, ठेचाळत खेळल्यानंतर कादिरने दिलीप वेंगसरकरची ही अशी वेदनामुक्ती केली.’ या कॅप्शनवरूनच तो लेख किती लोडेड झाला असेल याची कल्पना यावी. त्या लेखानंतर वेंगसरकर हा कणेकर यांचा कायमचा शत्रू बनला. आपल्या परखड लिखाणाने कणेकर यांनी किती शत्रू निर्माण केले असतील, याची कल्पनाच केलेली बरी!


   आम्ही कणेकरांना वेंगसरकर वरील टीकेविषयी विचारले असता ते म्हणाले, ‘अहो, तो माझा वैयक्तिक शत्रू आहे का? तो भारताचा आघाडीचा फलंदाज होता. तो चांगला खेळल्यावर त्याची स्तुती केली व वाईट खेळल्यावर त्याच्यावर टीका केली तर माझे काय चुकले? तो जर एखाद्या क्लबचा फलंदाज असता तर त्याची कोणी दखलही घेतली नसती.’ कणेकरांच्या या विधानाशी आम्ही देखील शंभर टक्के सहमत आहोत.


   लता मंगेशकर आणि दिलीप कुमार हे कणेकर यांचे दोन वीक पॉइंट. त्यातील लता दीदींवर तर त्यांनी विपूल लिखाण केले. आजही करत आहेत. तसेच दिलीप कुमारवर भरपूर प्रेम केले. दिलीप कुमारच्या कपाळाला आलेले टेंगूळ दिवसेंदिवस वाढू लागले. तेव्हा एका भेटीत कणेकर त्यांना म्हणाले, ‘तुमच्या कपाळावर टेंगूळ अमूक अमूक सिनेमात लहान दिसत होते. आता ते मोठे झाले आहे.’ हे ऐकून दिलीप कुमार यांनी आपल्या कपाळाला हात लावून टेंगूळ चोळत म्हटले, ‘अरेच्चा! हे तर मला कळलेच नाही.’ त्यावर कणेकर पटकन म्हणाले, ‘कसे कळणार? तुमचे चित्रपट दहा-दहा वेळा आम्ही पाहतो. तुम्ही नाही.’ कणेकर यांच्या या हजरजबाबीपणावर दिलीप कुमार देखील खूष झाले.


   कणेकर हे आपल्या आई-वडिलांविषयी भलतेच भावूक होताना दिसतात. त्यांचे वडील डॉक्टर होते. ते पोलीस सर्जन होते. एकदा राज्याचे माजी पोलीस महासंचालक कै. द. शं. सोमण यांनी कणेकरांना विचारले, ‘ते आमचे पोलीस सर्जन डॉ. कणेकर होते ते तुमचे कोण?’ त्यावर कणेकर म्हणाले, ‘ते माझे वडील होते.’ हे ऐकून सोमण यांनी कणेकरांना सांगितले की, ‘तुमच्या वडिलांनी माझा रक्तदाबाचा विकार कायमचा दूर केला. मी तरुणपणी रक्तदाबाने आजारी पडलो. तेव्हा तुमच्या वडिलांनी मला रोज स्वत:चे कपडे स्वत: धुण्यास सांगितले. मी त्यांचे म्हणणे ऐकले आणि माझा रक्तदाब कायमचा दूर झाला.’


   कणेकरांची आई त्यांच्या लहानपणीच गेली. त्यामुळे आईची कमतरता त्यांना सदैव जाणवली. आपला मुलगा डॉक्टर व्हावा, असे कणेकरांच्या वडिलांना वाटत होते. पण ते होऊ शकले नाहीत. मात्र आपल्या चिरंजीवाला त्यांनी डॉक्टर केले. सारांश, शिरीष कणेकर डॉक्टर होऊ शकले नाहीत, पण डॉक्टरचा बाप मात्र झाले.


    असे आमचे हे लोकप्रिय लेखक, पत्रकार मित्र शिरीष कणेकर दि. ६ जून, २०२३ रोजी वयाची ८० वर्षे पूर्ण करून ८१ व्या वर्षात पदार्पण करीत आहेत. ८१ हा केवळ एक आकडा आहे. तो उलटा केला तर १८ होतो. शिरीष कणेकर आजही १८ वर्षाच्या मुलाप्रमाणे खट्याळ आहेत. या खट्याळ मुलाला वाढदिवसाच्या कोटी कोटी शुभेच्छा!