महाराष्ट्राच्या हितासाठी आचार्य अत्रेंच्या पश्चयात पत्रकारांवर मोठी जबाबदारी ! : ज्येष्ठ पत्रकार मधुकर भावे यांचे प्रतिपादन

Santosh Gaikwad August 14, 2023 08:50 PM


मुंबई :  संयुक्त महाराष्ट्राच्या चळवळीत शेतकरी, कामगार लढले, त्या लढयात त्यांनी रक्त सांडलं. महाराष्ट्र मिळवून दिला, पण आज  शेतकरी, कामगार देशोधडीला लागला आहे. गेल्या ६० वर्षात कोण लढले, कोण मेले आणि कोण गब्बर झाले या प्रश्नाचं उत्तर अजूनही मिळालेलं नाही. वृत्तपत्रातही सामान्य माणसाच्या प्रश्नाची चर्चा होताना दिसत नाही.  पत्रकारच  ही परिस्थिती सुधारू शकतात. कोणत्याही पक्षाचे राजकीय नेते परिस्थिती सुधारू शकत नाहीत, आचार्य अत्रेसाहेब नसताना महाराष्ट्राच्या हितासाठी आपल्यावरील जबाबदारी दहा पटीने नव्हे  शंभर पटीने वाढली आहे असे प्रतिपादन ज्येष्ठ पत्रकार मधुकर भावे यांनी केले. यावेळी अध्यक्षस्थानी संघाचे अध्यक्ष नरेंद्र वि. वाबळे होते. 


मुंबई मराठी पत्रकार संघाच्यातीने पत्रकार संघात आचार्य अत्रे यांच्या १२५ व्या जयंती दिनानिमित्त  ज्येष्ठ पत्रकार मधुकर भावे यांचे व्याख्यान आयोजित करण्यात आले होते. त्यावेळी ते बोलत होते.  यावेळी  पत्रकार संघाचे  अध्यक्ष नरेंद्र वि. वाबळे यांनी  मधुकर भावे  यांचा शाल, श्रीफळ, पुष्पगुच्छ व भेटवस्तु देऊन स्वागत केले. यावेळी ज्येष्ठ पत्रकार विजय वैद्य उपस्थित होते. आचार्य अत्रे यांच्या १२५ व्या जयंतीनिमित्त मधुकर भावे हे १२५ व्याख्यान करणार असून पहिल्या व्याख्यानाचा शुभारंभ मुंबई मराठी पत्रकार संघातून केला. 


भावे पुढे म्हणाले की, वृत्तपत्रात सामान्य माणसाच्या प्रश्नाची चर्चा होताना दिसत नाही.  कलादिग्दर्शक नितीन देसाई यांनी  १ कोटी ८० लाख कर्ज फेडले नाही म्हणून आत्महत्या केली आणि आठ हजार कोटी बुडवणारा मल्ल्या दारू पितानाचा फोटो छापतोय लाज वाटली पाहिजे महाराष्ट्राला. ६० वर्षात कामगार  शेतकरी  मराठी माणसाची अशी परिस्थिती झाली आहे.  पत्रकारच परिस्थिती सुधारू शकतात. अत्रेसाहेब नसताना आपल्यावरील जबाबदारी दहा पटीने वाढली आहे. आपण लिहिलेला प्रत्येक शब्द समाजाच्या उपयोगी आहे कि नाही याची जाणीवपूर्वक काळजी घेऊन वस्तुस्थिती मांडली पाहिजे ती पत्रकारिता  आणि आजची पत्रकारिता यात फरक पडला आहे. आम्ही आमची विश्वार्हता गमावलेी आहे ती विश्वासर्हता पून्हा मिळवणं हिच आचार्य अत्रे यांनी श्रध्दांजली असल्याचे भावे म्हणाले. 


मधुकर भावे यांनी आपल्या भाषणात अत्रेसाहेबांचे वेगवेगळे पैलू उलगडले.   लेखक, कवी, विडंबनकार, चित्रपट कथालेखक, नाटककार, दिग्दर्शक, फर्डा वक्ता, शिक्षक, राजकीय नेता, संपादक असे अत्रे  दहा आहेत अशा शब्दात भावे यांनी सांगितले. झेंडूच्या फुलाला ८० वर्षे झाली पण एकही कविता खवटं लागत नाही. अत्रे हे हसवणारे कवी नव्हते ते प्रकांड पंडीत होते.  एका शब्दाची ताकद काय असते हे त्यांच्याकडून आयुष्यात शिकायला मिळालं. एखाद्या गोष्टीचा सार एका शब्दात कसं सांगायचं हे कौशल्य त्यांच्यात होते.  डिजीटल युगात साहित्य विसरत चाललोय अशीही खंत त्यांनी व्यक्त केली. 


१९५४ साली श्यामची आई या चित्रपटाला राष्ट्रपतींच्या हस्ते सुवर्णपदक मिळालं. ही खूप मोठी गौरवाची बाब असल्याचे भावे यांनी सांगितले.  त्यावेळी पुरस्कारासाठी ७० नामांकन आली होती.त्यावेळी सात परीक्षक होते मात्र एकही मराठी  परीक्षक नव्हता तरीसुध्दा  श्यामच्या आईला पहिलं पारितोषिक मिळालं. अत्रेंच्या महात्मा फुले या चित्रपटाला रजत पदक मिळालं त्यावेळी डॉ बाबासाहेब आंबेडकर आणि माईसाहेब स्वत: आल्या होत्या. अत्रे ज्या क्षेत्रात गेले तिथं त्यांनी पावले उमटवली असे भावे म्हणाले. अत्रे हे दहा विद्यापीठं होतं आणि त्या विद्यापीठाचे आम्ही विद्यार्थी होतो.  याचा सार्थ अभिमान असल्याचे भावे यांनी सांगितले.  


अमरशेख यांचा पहाडी आवाजातील भाषण, आत्माराम पाटील यांचा पोवाडा आणि जंगम यांची शाहीर यावेळी म्हणत भावेंनी संयुक्त महाराष्ट्र चळवळीचा इतिहास डोळयासमोर उभा केला. आचार्य अत्रे, अमर शेख यांना महाराष्ट्र भूषण पुरस्कार मिळावा यासाठी राज्य सरकारकडं पत्रव्यवहार केल्याचे त्यांनी सांगितलं. घर दार सोडून महाराष्ट्रासाठी आयुष्य पणाला लावणारी ही माणसं होती. त्यांना दिल्याने महाराष्ट्र भूषण पुरस्काराच मोठा होणार आहे असे भावे म्हणाले. सरकारी सेवेतून निवृत्त होण्याचे वय ५८ आहे पण वयाच्या ५८ व्या वर्षी अत्रें संपादक झाले हा फरक लक्षात घेतला पाहिजे.  महाराष्ट्राच्या शत्रूला कधी क्षमा केली नाही. सगळया निष्ठा संयुक्त महाराष्ट्र चळवळीला वाहिल्या होत्या. चळवळ सुरू झाली त्यावेळी त्यांनी कविता नाटक लिहिणं बंद केलं होतं.  चळवळीच्या अगोदरचे अत्रे आणि त्यानंतरच अत्रे भावेंनी उलगडून सांगितले. 


अधू मेंदूचा मधू , फडक्यांच्या चिंध्या अशा अग्रलेखांची आठवण तसेच  माझा बाबू गेला ..असा ड्रायव्हरवरही अग्रलेख त्यांनी  लिहिला. लालबहादूर शास्त्री गेले त्यावेळी मराठामध्ये अग्रलेख लिहिण्याची संधी मला अत्रेंसाहेबांनी दिल्याची आठवणही भावे यांनी सांगितली. साधी साधी माणसं मोठी केली. त्यांनी माणसं घडवली असे भावे म्हणाले. 


 यशवंतराव चव्हाणांवर टीका आणि  निरोपाचं भाषण हा किस्सा भावे यांनी उलगडून  सांगितला. आचार्य अत्रे यांनी एका भाषणात मुंबईसह संयुक्त महाराष्ट्र झालाच पाहिजे असं म्हटलं होतं. अत्रेंच्या भाषणातील च यशवंतराव चव्हाणांना खटकला आणि त्यांनी तो बोलून दाखवला तर त्यावर हजरजबाबी अत्रे यांनी तुमच्या आडनावातला च काढला तर मागे काय राहतं असा म्हटलं होतं. पण त्यानंतर चव्हाणांना केंद्रात संरक्षण मंत्री म्हणून बोलावण्यात आलं तेव्हा त्यांनी विधानसभेत यशवंतरावांसाठी केलेल्या निरोपाच्या भाषणातून अत्रेंच्या मनाचा मोठेपणा दिसून येतो असे भावे यांनी सांगितलं.