मालमत्ता थकबाकीदारांना दिलासा : कल्याण डोंबिवलीत ३१ जुलैपर्यंत अभय योजना !

Santosh Gaikwad May 22, 2023 02:09 PM


डोंबिवली :  कल्याण डोंबिवली महापालिकेने मालमत्ता कर थकबाकी दरांसाठी अभय योजना लागू करण्याचा निर्णय घेतला असून, अभय योजनेचा कालावधी दिनांक १५ जुन २०२३ ते दिनांक ३१ जुलै २०२३ असा आहे. त्यामुळे थकबाकीदारांना दिलासा मिळणार आहे.


कल्याण डोंबिवली महानगरपालिकेने करदात्यांना पाठवलेल्या बिलात मुद्दल रकमेसह व्याज व नोटीस फी लावून बिले व नोटीस पाठवल्या आहेत. मात्र  कोविड- १९ क्या लॉकडाऊन  काळात अनेकांचे कामधंदे बंद झाले व अनेक नोकरदारांच्या नोकऱ्याही गेल्यामुळे त्यांची आर्थिक परिस्थिती विकट झाल्यामुळे त्यांचे जगणेही मुश्किल झाले होते. अश्या परिस्थिती बऱ्याच नागरिकांचे मालमत्ता कर भरणे राहून गेले आहे. त्यामुळे करदात्या नागरिकांच्या आर्थिक परिस्थितीचा विचार करता त्यांच्या मालमत्ता करात लावलेले व्याज व नोटीस फी माफ करून त्यांच्या मालमत्ता कराची मुद्दल रक्कम भरण्यास मुभा द्यावी अशी मागणी काँग्रसचे प्रदेश सचिव संतोष केणे यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, खासदार डॉ श्रीकांत शिंदे यांना निवेदन देऊन अभय योजना लागू करण्याची मागणी केली होती. तसेचन नवी मुंबई महापालिकेने त्यांच्या करदात्या नागरिकांना अभय योजने अंतर्गत व्याज माफ करून मुद्दल रक्कम भरण्याची मुभा दिलेली आहे. याकडेही केणे यांनी राज्यसरकार आणि प्रशासनाचे लक्ष वेधले होते.


 कल्याण डोंबिवली महानगरपालिका क्षेत्रातील कर थकबाकीदारांसाठी महानगरपालिकेने 'अभय योजना – २०२३' लागु करण्याचा निर्णय घेतला असुन अभय योजनेचा कालावधी दिनांक १५ जुन २०२३ ते दिनांक ३१ जुलै २०२३ असा आहे. संपुर्ण थकबाकीसह चालू वर्षाचे कराचे मागणीची संपुर्ण रक्कम अधिक नियम ४१ खाली शास्ती (दंड / व्याज) ची २५ टक्के रक्कम एकरक्कमी भरल्यास ७५ टक्के शास्ती (दंड / व्याज) रक्कम माफ केली जाणार आहे. सदर योजना ही वर नमुद केलेल्या कालावधीत जमा केलेल्या रक्कमांनाच लागू राहिल या योजनेच्या प्रारंभापूर्वी अथवा समाप्ती नंतर जमा केलेल्या कोणत्याही रक्कमांना ही योजना लागू राहणार नाही. त्यामुळे सर्व थकीत मालमत्ता करदात्यांनी विहित मुदतीत या योजनेचा लाभ घ्यावा असे आवाहन महापालिका प्रशासनाकडून करण्यात आले आहे.

---