आश्रमशाळेत लवकरच २८२ पदाची भरती - मंत्री अतुल सावे यांची विधानसभेत माहिती

Santosh Gaikwad December 08, 2023 07:06 PM


नागपूर, दि.८ :  राज्यातील इतर मागास बहुजन कल्याण विभागांतर्गत   एकूण ९७७ आश्रमशाळा चालविण्यात येतात. या आश्रमशाळांना शालेय पोषण, इमारत भाडे आणि वेतन अशा तीन भागात अनुदान देण्यात येत आहे. यावर्षी २२५ कोटी रुपयांच्या तरतुदींपैकी आतापर्यंत १८०कोटी रुपयांचे वितरण करण्यात आले आहे. या आश्रमशाळांमध्ये एकूण २ लाख २३ हजार विद्यार्थी शिक्षण घेत आहेत. या शाळांतील शिक्षकांच्या २८२ पदे भरण्यास मंत्रिमंडळाची मान्यता मिळाली असून भरतीप्रक्रिया सुरू करण्यात आली असल्याचे इतर मागास बहुजन कल्याण मंत्री अतुल सावे यांनी विधानसभेत प्रश्नोत्तराच्या तासात सांगितले.

 

विधानसभेत विकास ठाकरे व इतर सदस्यांनी यासंदर्भातील प्रश्न उपस्थित केला होता. या अनुषंगाने विरोधी पक्षनेते विजय वडेट्टीवार यांनी रिक्त पदे भरण्याबाबत विचारलेल्या प्रश्नाबाबत मंत्री सावे म्हणाले की, आश्रमशाळांमधील रिक्त पदे त्वरीत भरण्यात येतील. इतर मागास प्रवर्गातील ज्या विद्यार्थ्यांना शासकीय वसतिगृहात प्रवेश मिळणार नाही त्यांच्यासाठी थेट लाभ देण्याच्या  ‘आधार’ योजनेची प्रक्रिया अंतिम टप्प्यात आली असून प्रतिजिल्ह्यात ६०० अशा एकूण २१६०० विद्यार्थ्यांना याचा लाभ मिळणार आहे. परदेशी शिक्षणासाठी देण्यात येणाऱ्या शिष्यवृत्तीसाठी विद्यार्थ्यांची संख्या आता  ५० वरून ७५ इतकी वाढविण्यात आली असल्याचे सांगून आतापर्यंत सर्व विद्यार्थ्यांना शिष्यवृत्ती प्रदान करण्यात आली आहे. सदस्य बाळासाहेब थोरात यांनीही या अनुषंगाने चर्चेत सहभाग घेतला.