आमदार अपात्रता सुनावणी : ठाकरे - शिंदे आमने सामने येणार ?

Santosh Gaikwad September 22, 2023 06:10 PM


मुंबई :  शिवसेना आमदारांच्या अपात्रतेच्या सुनावणीला उशीर होत असल्यानं सुप्रीम कोर्टानं विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर यांना झापल्यानंतर आता सुनावणीच्या घडामोडींना वेग आला आहे. १४ सप्टेंबर रोजी सुनावणी पार पडल्यानंतर ती दोन आठवडे पुढे ढकलण्यात होती पण आता सुप्रीम कोर्टाच्या निर्देशानुसार २५ सप्टेंबर रोजी सुनावणी घेण्यात येणार आहे. विशेष म्हणजे या सुनावणीवेळी शिवसेनेच्या दोन्ही गटांचे प्रमुख उद्धव ठाकरे आणि एकनाथ शिंदे समोरासमोर येण्याची शक्यता आहे. 


सर्वोच्च न्यायालयाने फटकारल्यानंतर आमदार अपात्रतेच्या याचिकांवरून हालचाली वाढल्या असून विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर यांनी महाधिवक्ता तुषार मेहता यांच्यासह इतर कायदेतज्ज्ञांशी सल्लामसलत करण्यासाठी थेट दिल्ली गाठली. आमदार अपात्रतेसंदर्भात निर्णय विधानसभा अध्यक्षांनी वाजवी वेळेत घ्यावा, असे निर्देश सर्वोच्च न्यायालयाने दिले आहेत. विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर  यांनी दिल्लीत जाऊन कायदेतज्ज्ञांशी चर्चा केली. त्यामुळे आता नार्वेकर हे दिल्लीतून आल्यानंतर चांगलेच अॅक्शन मोडवर आले आहेत.  

 

राहुल नार्वेकर म्हणाले, काही भेटीगाठी कायदेतज्ज्ञांबरोबर होत्या. एकूण अपात्रतेबाबतचा हा कायदा बदलत जाणारा आहे. त्यात बदल होत राहतात. परिस्थितीनुसार या कायद्यात बदल होत असतात. त्यामुळे सर्वोच्च न्यायालयात जी याचिका दाखल झाली आहे त्याबाबत आलेले आदेश किंवा या कायद्यात आणखी काय दुरुस्ती करण्याची गरज आहे. तसेच या कायद्याची अंमलबजावणी कशाप्रकारे होणं आवश्यक आहे? या संदर्भातील अनेक विषयांवर माझी अनेक तज्ज्ञांबरोबर चर्चा झाली असे त्यांनी सांगितले.