एकाकी वृद्धांसाठी अवघ्या २० मिनिटात रुग्णवाहिका, डॉक्टर पथकासह आरोग्यसेवा मिळणार ! आरोग्य मंत्री तानाजी सावंत यांची विधान परिषदेत माहिती

Santosh Gaikwad July 27, 2023 06:26 PM

 

मुंबई : मुंबईसह  राज्यभरात एकाकी असणाऱ्या वृद्धांसाठी  अवघ्या २० मिनिटात रुग्ण वाहिकेस डॉक्टरांचे पथक त्यांच्या दारात पोहचणार आहे. मग ते वृद्ध शेताच्या बांधावर असो, वा फ्लॅटमध्ये असो; त्यांना तातडीने सेवा पुरविण्याबाबत आरोग्य खात्याकडून नवीन योजना आखली जात असून, महिनाभरात ही सेवा कार्यान्वित करण्याबाबत कार्यवाही सुरू असल्याचे आरोग्यमंत्री तानाजी सावंत यांनी विधान परिषदेत सांगितले. भाजपचे सदस्य  प्रवीण दरेकर य़ांनी  यासंदर्भात प्रश्न उपस्थित केला होता. 



मुंबईसह मोठमोठ्या शहरांमध्ये  अनेक कुटुंबांमध्ये मुले नोकरी-धंद्यानिमित्त परदेशी वास्तव्यास आहेत, तर त्या घरात त्यांचे आईवडील एकटे राहत आहेत. त्यांना आजारपण आल्यास बघायलाही कोणी नसते. तर त्यांच्यासाठी काही उपाययोजना करणार का, असा प्रश्न दरेकर यांनी उपस्थित केला होता. 


आरोग्यमंत्री तानाजी सावंत म्हणाले की, या गंभीर विषयावर आरोग्यखाते गेली सहा महिने विचारमंथन करत आहे. बऱ्याचशा कुटुंबांमध्ये वयोवृद्ध लोक राहतात. त्यांना काही अचानक आजार उद्धभवल्यास तातडीने उपचार मिळण्याची गरज असते. तसेच शेताच्या बांधावर एखाद्या शेतकऱ्याला साप चावल्यास त्याला  तातडीने उपचार मिळण्याची गरज असते. त्यासाठी सरकारकडून ही नवीन योजना आखण्यात येत असल्याचे मंत्री सावंत यांनी सांगितले.


 अमरावती येथील प्राथमिक आरोग्य केंद्रातील टे लि मेडीसीन सेवापूर्ववत सुरू करण्याबाबतचा मुख्य प्रश्न सदस्य श्रीकांत भारतीय यांनी मुख्य प्रश्न उपस्थित केला होता. दुर्गम परिसरातील आदिवासी वा अन्य रुग्णांना मुंबई-पुणे यासारख्या प्रगत शहरातील डॉक्टरांची मदत व्हावी, त्यांना वेळेवर उपचार मिळावेत यासाठी सुरू करण्यात आलेली टोलिमेडिसीन सेवा बंद पडली आहे. यासंबंधीचा मायक्रोसॉफ्ट कंपनीशी करण्यात आलेला करार संपुष्टात आल्यानंतर शासनाने ही सेवा पुन्हा सुरू करण्याबाबत काय उपाययोजना केली, असा प्रश्न श्रीकांत भारतीय यांनी उपस्थित केला होता.यावर उत्तर देताना आरोग्यमंत्री तानाजा सावंत यांनी सांगितले की, मायक्रोसॉफ्ट कंपनीशी करण्यात आलेला करार २०१९ मध्ये संपुष्टात आला. त्यानंतर ई-संजीवनी टेलिकन्स्लटेशन कार्यक्रमांतर्गत सद्यस्थितीत गरजेनुसार रुग्णांना टेलिमिडीसीन सेवा देण्यात येत आहे. ही सेवा आयुष्मान भारत योजनेंतर्गत देण्यात येत आहे. तसेच ई-संजीवनी ओपीडी अंतर्गत देखील तपासणी सुरू असल्याचे तानाजी सावंत यांनी सांगितले.