सुलोचना दीदी पंचत्वात विलीन ; शासकीय इतमामात अंत्यसंस्कार !

Santosh Gaikwad June 05, 2023 07:07 PM


मुंबई : ज्येष्ठ अभिनेत्री सुलोचना लाटकर यांच्यावर सोमवारी सायंकाळी दादरच्या शिवाजी पार्कात शासकीय इतमामात अंत्यसंस्कार करण्यात आले. सुलोचना दीदी आपल्या अनेक आठवणी मागे सोडून अनंतात विलीन झाल्या. चित्रपट सृष्टीतील दिग्गज, राजकीय मंडळी, तसेच सर्व चाहत्यांच्या उपस्थितीत सुलोचना दीदींवर अंत्यसंस्कार करण्यात आले. सुलोचनादीदी यांच्या पार्थिवाला विद्युत दाहिनीद्वारे अंत्यसंस्कार करण्यात आले.  यावेळी बॉलिवूड अभिनेते जॅकी श्रॉफ, मराठी चित्रपट दिग्दर्शक आणि अभिनेते महेश कोठारे, अभिनेते सचिन पिळगांवकर, मराठी अभिनेत्री प्रिया बेर्डे यांसह अनेक सेलिब्रिटी उपस्थित होते.


 सुलोचना लाटकर यांचा जन्म २० जुलै १९२८ रोजी झाला. सुलोचना यांना १९९९ मध्ये पद्मश्री आणि २००४ मध्ये फिल्मटाइम अचिव्हमेंट अवॉर्डने सन्मानित करण्यात आले. सुलोचना दीदींनी २५० हिंदी आणि ५० हून अधिक मराठी चित्रपटांमध्ये काम केलं. १९३२ मध्ये माधुरी या चित्रपटातून त्यांनी बालकलाकार म्हणून करिअरला सुरुवात केली. चित्रपटात काम करायला सुरुवात केली तेव्हा त्यांचं वय अवघं ४ वर्ष होतं.  एक दशकाहून अधिक काळ मुख्य अभिनेत्रीची भूमिका केल्यानंतर, त्यांनी त्या काळातील सुनीत दत्त आणि देव आनंद यांसारख्या सुपरस्टार्सच्या आईची भूमिका साकारण्यास सुरुवात केली. त्यातही सुलोचना दीदींनी बऱ्यापैकी यश मिळवलं.


 सुलोचनादीदींच्या जाण्याने अवघी चित्रपटसृष्टी पोरकी : - मुख्यमंत्री एकनाथ शिंदे


राज्याचे  मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी प्रभादेवी येथील निवासस्थानी ज्येष्ठ अभिनेत्री सुलोचनादीदी लाटकर यांच्या पार्थिवाचे अंत्यदर्शन घेवून श्रद्धांजली अर्पण केली. यावेळी आमदार सदा सरवणकर, अभिनेते सचिन पिळगावकर व अन्य मान्यवर उपस्थित होते.   मुख्यमंत्री एकनाथ शिंदे म्हणाले, “सुलोचनादीदींचे निधन ही अत्यंत दुःखद, रसिकांच्या मनाला चटका लावणारी घटना आहे. त्यांच्या जाण्याने चित्रपटसृष्टी पोरकी झाली आहे. त्या चित्रपटसृष्टीतल्या मूर्तिमंत वात्सल्य होत्या. आपल्या वैशिष्ट्यपूर्ण अभिनयाने त्यांनी ३०० हून अधिक चित्रपटांमध्ये आपला ठसा उमटवला. विशेषकरून त्यांनी साकारलेली ‘आई’ ची भूमिका ठसा उमटवणारी ठरली. ज्येष्ठ अभिनेते देवानंद, राजेश खन्ना, अमिताभ बच्चन यांच्या सारख्या दिग्गज कलावंतांसोबत त्यांनी चित्रपटांत काम केले. प्रत्येकाच्या आयुष्यामध्ये मायेची पखरण करणा-या वात्सल्यमूर्ती हरपल्या. त्यांच्या जाण्याने प्रत्येकालाच वाटते की आपल्यातलेच कुणी गेले आहे. इतका प्रेम, जिव्हाळा त्यांनी निर्माण केला आहे”, या शब्दांत राज्य शासनाच्यावतीने सुलोचनादीदींना मुख्यमंत्री  शिंदे यांनी श्रद्धांजली अर्पण केली.


सुलोचनादीदींची कारकीर्द अनेकांना प्रेरणादायी ठरेल :  उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस


  उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस म्हणाले, “आपल्या चित्रपटसृष्टीमध्ये काही नावं अशी आहेत. ज्यांच्या कार्यकर्तृत्वामुळे ती अजरामर आहेत. चित्रपटसृष्टीत त्यांच्याबद्दल प्रचंड आदर आहे. यातीलच एक नाव सुलोचनादीदींचे आहे. सुरुवातीच्या काळामध्ये त्यांनी नायिकेच्या भूमिका साकारल्या. नंतर आईच्या भूमिका साकारल्या, त्या अत्याधिक लोकप्रिय झाल्या. माझ्या पिढीने त्यांना आईच्या रुपात बघितले आहे. अतिशय सोज्वळ आणि ममत्त्व वाटावे असे त्यांचे व्यक्तिमत्व होते. सुलोचनादीदींची कारकीर्द अतिशय थक्क करणारी आहे. त्यांना अनेक पुरस्कार मिळाले. या पुरस्कारांपेक्षाही त्यांचे कार्य मोठे होते. त्यांनी गाजवलेली कारकीर्द अनेकांना प्रेरणादायी ठरेल”, अशा शब्दात श्री. फडणवीस यांनी विनम्र श्रद्धांजली अर्पण केली.