मोदींची जुमलेबाजी व फेकुगिरी आता चालणार नाही : नाना पटोले

Santosh Gaikwad March 31, 2024 06:06 PM


मुंबई, दि. ३१ मार्च : महाविकास आघाडीसाठी चांगले वातावरण असून पहिल्या टप्यातील विदर्भातील पाचही जागांवर काँग्रेस, महाविकास आघाडीचे उमेदवार मोठ्या मताधिक्क्याने विजयी होतील. मोदी सरकारची जुमलेबाजी व फेकुगिरी आता चालणार नाही, लोकसभा निवडणुकीत जनता भारतीय जनता पक्षाच्या तानाशाही सरकारला सत्तेतून हद्दपार केल्याशिवाय स्वस्थ बसणार नाही, असे महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष नाना पटोले यांनी म्हटले आहे.


टिळक भवनमध्ये पक्ष प्रवेशाच्या कार्यक्रमावेळी काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले पत्रकारांशी बोलत होते, ‘राहुल गांधी जर सावरकर चित्रपट पाहायला येणार असतील तर मी अख्खं थिएटर बुक करेन’ या उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या विधानाचा पटोले यांनी समाचार घेतला, मोदींवरचा सिनेमा फ्लॉप झाला, नितीन गडकरींवरील हायवे मॅन सिनेमा फ्लॉप झाला, गोडसेवरील चित्रपट फ्लॉप झाला आणि सावकर चित्रपटही फ्लॉप झाला आहे. उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी मुन्नाभाई MBBS चित्रपट पहावा, गांधी विचारासाठी फडणवीसांनी हा चित्रपट पहावा, त्यांच्यासाठी थिएटर बुक करतो, असे आवाहन पटोले यांनी केले आहे. राहुल गांधी यांच्याशी तुलना करु नका, राहुल गांधी यांनी पदयात्रा काढून देशाच्या जनतेच्या मनात आपले स्थान निर्माण केले आहे. राज्यातील कायदा व सुव्यवस्था अत्यंत खालावलेली आहे, टिंगळटवाळी करण्यापेक्षा कायदा सुव्यवस्थेकडे लक्ष द्या व जनतेच्या मुलभूत प्रश्नांवरही लक्ष द्या, असेही नाना पटोले म्हणाले.

सोलापूरचे माजी आमदार दिलीप माने व वंचित बहुजन आघाडीचे लातूर जिल्हाध्यक्ष जगदिश माळी यांनी समर्थकांसह काँग्रेस पक्षात प्रवेश केला. प्रदेशाध्यक्ष नाना पटोले व ज्येष्ठ नेते, माजी केंद्रीय गृहमंत्री सुशिलकुमार शिंदे यांच्या उपस्थितीत हा पक्ष प्रवेश कार्यक्रम पार पडला. नाना पटोले यांनी दोघांचेही काँग्रेस पक्षात स्वागत केले. 

यावेळी नाना पटोले म्हणाले की, भारतीय जनता पक्षाचे तानाशाही सरकारला सत्तेतून पायउतार करण्यासाठी तसेच लोकशाही व्यवस्था व संविधान टिकवण्यासाठी हा लढा सुरु. ईडी, सीबीआय, इन्कम टॅक्सची भिती दाखवून भाजपा दुसऱ्या पक्षातील लोकांना पक्षात प्रवेश देते पण त्याचाही काही फरक पडत नाही.      

यावेळी बोलताना माजी केंद्रीय मंत्री सुशिलकुमार शिंदे म्हणाले की, दिलीप माने हे काँग्रेस पक्षाचेच होते पण मध्यंतरी इतर पक्षात गेले परंतु योग्यवेळ पाहून ते आज पुन्हा स्वगृही परतले आहेत. कार्यकर्त्यांशी चांगले संबंध असलेला नेता अशी त्यांची ओळख असून त्यांच्या काँग्रेस प्रवेशाने सोलापूर जिल्ह्यात पक्षाला आणखी बळ मिळाले आहे. भाजपाकडून प्रणिती शिंदेंनाही ऑफर होती पण आम्ही काँग्रेस सोडून कुठेही जाणार नाही, असा निर्वाळा सुशिलकुमार शिंदे यांनी दिला. 

यावेळी प्रदेशाध्यक्ष नाना पटोले, ज्येष्ठ नेते व माजी केंद्रीय मंत्री सुशिलकुमार शिंदे, अल्पसंख्याक विभागाचे अध्यक्ष आमदार वजाहत मिर्झा, प्रदेश सरचिटणीस प्रमोद मोरे, सोलापूर शहर काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष चेतन नरोटे आदी उपस्थित होते.