केजरीवाल तुरुंगातून सरकार चालवणार ?

Santosh Gaikwad March 23, 2024 07:43 PM



नवी दिल्ली : दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांना दिल्लीच्या राऊस एव्हेन्यू न्यायालयाने २८ मार्चपर्यंत ईडी कोठडी सुनावली आहे.  “केजरीवाल दिल्लीचे मुख्यमंत्री म्हणून कायम राहतील, तसेच ते तुरुंगातून आपली कर्तव्ये पार पाडतील” असे आम आदमी पक्षाच्या नेत्यांनी स्पष्ट केले आहे. त्यामुळे केजरीवाल तुरूंगातून सरकार चालवणार का ? असाच प्रश्न उपस्थित होत आहे. मात्र    भाजपाचे नेते मनोज तिवारी यांनी यावर टीका केली आहे.



गुरुवारी कथित मद्य धोरण घोटाळ्याप्रकरणी ईडीकडून दिल्लीचे मुख्यमंत्री आणि आपचे अध्यक्ष अरविंद केजरीवाल यांना अटक करण्यात आली आहे. त्यानंतर त्यांच्या अडचणींत वाढ होताना दिसत आहे. गेल्या अनेक दिवसांपासून ईडीकडून अरविंद केजरीवाल यांची चौकशी सुरू होती. तसंच त्यांना चौकशीकरता ईडी कार्यालयात बोलावण्यात आले होते. तब्बल ९ वेळा समन्स बजावण्यात आले होते. परंतु, प्रत्येकवेळी अरविंद केजरीवाल यांनी ईडी कार्यालयात जाणं टाळलं. अरविंद केजरीवाल दिल्लीचे मुख्यमंत्री आहेत आणि राहतील. यामध्ये कोणतंही दुमत नाही, असं आप नेत्या आतिशी यांनी स्पष्ट केल होतं. यावरूनच आता भाजपाचे खासदार आणि दिल्लीचे माजी प्रदेशाध्यक्ष मनोज तिवारी यांनी खोचक प्रतिक्रिया दिली आहे. तुरुंगातून टोळ्या चालवल्या जातात, सरकार नाही, असं त्यांनी म्हटलं आहे. “तुम्ही टोळ्या चालवायची तयारी करताय का? सरकार चालवण्यासाठी रोज बैठका घ्यायच्या असतात, विविध स्तरांवर पत्रके काढायची असतात, सह्या करायच्या असतात. तुम्ही निवडून गेलात म्हणजे जनेतचा पैसा लुटायला मोकळे झालात का?” असा प्रश्न त्यांनी केला.