अभिनेत्री सीमा देव यांचे निधन

Santosh Gaikwad August 24, 2023 12:49 PM


मुंबई :मराठी मनोरंजन विश्वात आपल्या अभिनयाने चाहत्यांच्या मनात हक्काचे स्थान निर्माण करणाऱ्या जेष्ठ अभिनेत्री सीमा देव यांचे आज सकाळी निधन झाले आहे. वयाच्या ८१ व्या वर्षी त्यांची प्राणज्योत मालवली आहे. त्यांच्या निधनाने सिनेविश्वावर दु:खाचा डोंगर कोसळला आहे.


सीमा यांनी त्यांच्या कारकीर्दीत अनेक यशस्वी आणि हिट चित्रपट मराठीसह हिंदी सिनेसृष्टीला दिले आहेत. एकूण ८० चित्रपटांमध्ये त्यांनी आपल्या भूमिकांना न्याय दिलाय. सीमा यांचे पती रमेश देव यांनी देखील मनोरंजन विश्वात उल्लेखनीय कामगीरी केली आहे.


साल १९६० मध्ये प्रदर्शित झालेला मिया बीबी राजी हा सीमा यांचा पहिला चित्रपट होता. त्यानंतर त्यांनी जगाच्या पाठीवर या चित्रपटात काम केलं. मराठीमधील या चित्रपटाने त्यांना घराघरात पोहचवलं. आज सायंकाळी पाच वाजता शिवाजी पार्क स्मशानभूमीत सीमा देव यांच्या पार्थिवावर अंत्यसंस्कार करण्यात येणार आहेत.


चतुरस्त्र अभिनेत्री हरपली : - मुख्यमंत्री एकनाथ शिंदे

“चित्रपट सृष्टीत अभिनयाच्या जोरावर आणि प्रेमळ स्वभावाने आदराचे स्थान पटकावणाऱ्या चतुरस्त्र अभिनेत्री सीमा देव यांचे निधन चटका लावून जाणारे आहे,” अशा दुःखद भावना व्यक्त करून मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी ज्येष्ठ अभिनेत्री सीमा देव यांना भावपूर्ण श्रद्धांजली अर्पण केली आहे.


 “भारतीय चित्रपट सृष्टीत रमेश देव आणि सीमा देव यांनी आगळी ओळख निर्माण केली होती. पडद्यावर आणि प्रत्यक्षातही आदर्श दाम्पत्य, प्रेमळ व्यक्तिमत्त्व म्हणून त्यांचे अनेकांशी स्नेहाचे संबंध राहिले आहेत. देव कुटुंबीय गेली कित्येक दशके कला क्षेत्राची सेवा करत आहे. सीमा देव यांनी अनेक चित्रपटांतून वैविध्यपूर्ण व्यक्तीरेखा साकारून आपल्या चतुरस्त्र अभिनयाचा परिचय दिला आहे. त्यांच्या जाण्याने देव कुटुंबीय आणि चाहत्यांवर आघात झाला आहे. त्यांना यातून सावरण्याची ताकद मिळावी, हीच ईश्वरचरणी प्रार्थना. ज्येष्ठ अभिनेत्री सीमा देव यांना भावपूर्ण श्रद्धांजली,” असे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी शोकसंदेशात म्हटले आहे.


कृष्णधवल चित्रपटांमध्ये अभिनयाचे रंग भरणारी अभिनेत्री हरपली : 

- उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस


  “मराठी चित्रपटसृष्टीत आपल्या अभिनयाचा अमीट ठसा उमटविणाऱ्या ज्येष्ठ अभिनेत्री सीमा देव यांच्या निधनाने कृष्णधवल चित्रपटांमध्ये अभिनयाचे रंग भरणारी अभिनेत्री आपण गमावली आहे,” अशा शब्दांत उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी श्रद्धांजली वाहिली आहे.


 “सीमाताई देव यांनी अनेक गाजलेल्या मराठी चित्रपटात भूमिका केल्या. रमेश देव आणि सीमाताई देव हे केवळ त्यांच्या जीवनातील नाही तर पडद्यावरचेसुद्धा समीकरण होते. एक मोठा कालखंड या दोघांनी गाजविला. 'आनंद' चित्रपटातील त्यांची संस्मरणीय भूमिका असो किंवा अनेक मराठी चित्रपटांमधील सोज्वळ नायिका असा एक मोठा कालखंड त्यांनी गाजवला. सीमाताईंचे आपल्यातून निघून जाणे ही सिनेमा जगतातील एका अध्यायाची अखेर आहे. मी सीमाताईंना भावपूर्ण श्रद्धांजली अर्पण करतो. त्यांच्या कुटुंबीयांच्या दुःखात आम्ही सहभागी आहोत. हे दुःख सहन करण्याची ताकद कुटुंबियांना देवो, ही ईश्वरचरणी प्रार्थना,’’ असे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी  शोकसंदेशात म्हटले आहे.


चित्रपटसृष्टीतील सुवर्णयुगाचा अंत : -उपमुख्यमंत्री अजित पवार


  “ज्येष्ठ अभिनेत्री सीमा देव यांच्या निधनानं मराठी, हिंदी चित्रपटसृष्टीतील सुवर्णयुगाचा अंत झाला आहे. आपल्या सहज, सोज्वळ, सात्विक अभिनयानं चित्रपटरसिकांच्या हृदयावर तब्बल सहा दशके अधिराज्य गाजवणाऱ्या गुणी अभिनेत्रीला आज आपण मुकलो आहोत. गेल्यावर्षी, 2022 च्या फेब्रुवारी महिन्यात रमेश देव यांचं निधन झालं. त्यानंतर दीड वर्षांनी आज, सीमा देव यांचं झालेलं निधन, ही देशभरातील चित्रपट रसिकांच्या, मराठी माणसाच्या मनाला धक्का देणारी घटना आहे. सीमा आणि रमेश देव ही जोडी रुपेरी पडद्यावरची आणि वास्तव जीवनातीलही पती-पत्नींची आदर्श जोडी होती. सीमा देव यांचं निधन ही मराठी चित्रपटसृष्टीची, भारतातील कला क्षेत्राची मोठी हानी आहे. मी सीमा देव यांना भावपूर्ण श्रद्धांजली अर्पण करतो. त्यांच्या आत्म्यास सद्गती लाभो, अशी प्रार्थना करतो,” असे उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी शोकसंदेशात म्हटले आहे.


सिनेसृष्टीतले बहुगुणी सालस व्यक्तिमत्व हरपले : - सांस्कृतिक कार्य मंत्री सुधीर मुनगंटीवार


  “भारतीय सिनेसृष्टीतले एक सालस व्यक्तिमत्व हरपले आहे. पाश्चात्य संस्कृतीच्या प्रभावाच्या काळात चित्रपट सृष्टीसारख्या क्षेत्रात अतिशय उच्च स्थान निर्माण करतांना आणि आयुष्यभर ते स्थान कायम राखतानाही स्वतःवरील आणि आपल्या कुटुंबावरील भारतीय संस्कार जतन करणाऱ्या सीमाताई भारतीयांच्या कायम लक्षात राहतील,” अशा शब्दात राज्याचे सांस्कृतिक कार्य मंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी अभिनेत्री सीमा देव यांना श्रद्धांजली वाहिली आहे.

 “सीमाताईंच्या व्यक्तिमत्वात साधेपणा आणि सुसंस्कृत, सालसपणा ठासून भरला होता. मराठी, हिंदी चित्रपटसृष्टीत रमेश देव, सीमा देव या दोघांनीही आपआपले स्वतंत्र स्थान निर्माण केले होते, त्यांच्या जवळपास सर्वच भूमिका अजरामर म्हणाव्यात अशा आहेत. ईश्वर सीमाताईंना सद्गती देवो. या दुःखाच्या काळात मी देव परिवाराच्या सोबत आहे. या दुःखातून लवकर सावरण्याचे बळ ईश्वर देव परिवारास देवो ही प्रार्थना करतो,” असे श्री.मुनगंटीवार यांनी शोकसंदेशात म्हटले आहे.

००००