पाठीत वार करुन सरकार पाडलं त्याचा बदला घेणारच : उध्दव ठाकरेंचा इशारा !

Santosh Gaikwad April 27, 2023 04:20 PM

मुंबई: भारतीय कामगार सेनेचा ५५ वा वार्षिक सर्वसाधारण सभा शिवसेनेचे ठाकरे गटाचे पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्या उपस्थिती पार पडला. यावेळी ठाकरे यांनी केंद्र सरकार आणि राज्यातील शिंदे फडणवीस सरकारवर टीका केली. आताचं जे सरकार आहे, ते दिल्लीच असेल आणि दुर्दैवाने महाराष्ट्राचं आहे. हे महाराष्ट्राचं काम..गार करणारं सरकार आहे', असं केंद्र आणि राज्य सरकारला लक्ष्य करत उद्धव ठाकरे म्हणाले आहेत. ज्या पद्धतीने पाठीत वार करुन सरकार पाडलं त्याचा बदला घ्यायचाय, आणि तो घेणारचं असा इशारा ठाकरे यांनी दिला. 

 

उद्धव ठाकरे म्हणाले की, कामगार सेनेला 55 वर्ष झाली आणि शिवसेनेला 56 वर्ष झाली, तरीही कामगार सेना तरुण वाटतेय. दत्ताजी साळवींसारखी निष्ठावंत लोक काही घेण्यासाठी आलीच नव्हती, देण्यासाठी आली होती. मुलुखमैदानी तोफ कशाला म्हणतात हे दत्ताजींची भाषणे ज्यांनी ऐकली त्यांनाच समजु शकेल. ज्या शिवसेनेचा जन्मच मुळी भूमीपुत्रांच्या न्याय्य हक्कांसाठी झाला त्या भूमीपुत्रांवर अन्याय करुन येऊ घातलेले उद्योगधंदे बाजुला स्वत:च्या राज्यात नेत आहेत तरी शेपट्या यांच्या आत! हे कसले बाळासाहेबांचे विचार?अडीच वर्षात आपण 25 मोठे उद्योग आणि अडीच लाख कोटी रुपयांची गुंतवणूक आपण आणत होतो, काही आणली. त्यातील बरेचसे यांनी डोळ्यादेखत पळवुन नेले, ओरबाडुन नेले, तरी शेपट्या घालुन आत बसणारे बाळासाहेबांचे विचार दाखवत आहेत? हे बाळासाहेबांचे विचार ? असा सवाल करीत मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यावर निशाणा साधला.  बारसू, नाणारबद्दलची माझी जी भूमिका होती, ती माझी नाही तर तिथल्या लोकांची भूमिका होती, असं उद्धव ठाकरे यांनी म्हटलं.

 

 मी मुख्यमंत्री असताना बारसूबाबत पत्र दिलं होतं पण स्थानिकांशी गद्दारी केली नाही. मी तुमच्यासारखी स्थानिकांवर जबरदस्ती केली नाही. पर्यावरणाला हानी करणारा प्रकल्प आम्हाला नको. जर स्थानिकांच्या भल्याचा प्रकल्प असेल तर लोकांवर जबरदस्ती का करण्यात येतेय ? असा सवाल करुन जमीन आमचे, इमले तुमचे हे कसे चालेल ? असा परखड सवाल उद्धव ठाकरे यांनी विचारला. उद्योग मंत्री उदय सामंत यांच्यावर टीका करताना ठाकरे म्हणाले की, येताना माहिती मिळाली ती खरी का खोटी पहा,  सध्याचे निरुद्योगी मंत्री आणि उपमुख्यमंत्र्यांनी तैवानच्या कंपनीसोबत एमओयु केला होता, 2300 कोटींची गुंतवणूक महाराष्ट्रात येणार म्हणून फोटो काढले, ती जोडे बनवणारी कंपनी देखील तामिळनाडूत गेली, हे बसलेत जोडे पुसत! फक्त जोडे पुसण्याची लायकी असलेली लोक राज्य करत आहेत, महाराष्ट्राच होणार काय ? बारसूबद्दल मी बोलेनच, पण माझं एवढं ऐकत आहात, तर सरकार का पाडलं...तेही गद्दारी करून? आरेचा निर्णय का फिरवला, बुलेट ट्रेनची जागा जिथे आम्ही उद्योग केंद्र करणार होतो ती का दिली? असा टोलाही त्यांनी लगावला.


आता कामगार दिन येत आहे,'जय जवान, जय किसान' ला शिवसेनाप्रमुखांनी जोड दिली होती, 'जय कामगार'! कारण तुम्हीं देश घडवत असता.... मोर्चे निघतात, परंतु सरकार संवेदनाशील असायला हवे.युतीचे सरकार असताना शिवसेनाप्रमुख म्हणाले होते, मोर्चे येतील परंतु मोर्चे आल्यावर ते पोलिसांकरवी अडवायचे नाहीत, ज्या खात्याबद्दल मोर्चा असेल त्या खात्याचा मंत्री 6 व्या मजल्यावरुन खाली उतरून मोर्चास सामोरा जायला पाहिजे. ही संवेदनाशीलता राहिली कुठे ? केवळ ६० टक्के कामगार संघटित आहे, बाकीचा सर्व असंघटित आहे.   कामगारांना किती प्रकारे छळणार? मशीन वेगळी आणि ती देखील बिघडते. जीतीजागती माणसं, त्यांचा माणूस म्हणून तुम्हीं कधी विचार करणार की नाही? की नुसतच कामगार म्हणून वाट्टेल तस त्यांना वापरणार ? असा संतापही ठाकरे यांनी व्यक्त करीत शिंदे सरकारवर आसूड ओढलं.