गोरेगाव आग दुर्घटनेतील मृतांच्या कुटुंबियांना ५ लाखांची मदत,

Santosh Gaikwad October 06, 2023 09:16 PM


 मुंबई, दि. ६ :- गोरेगावच्या उन्नतनगर येथील एसआरएच्या जय भवानी इमारतीला भीषण आग लागून झालेल्या दुर्घटनेतील मृत व त्यांच्या कुटुंबियांच्याप्रति मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी सहवेदना व्यक्त केली आहे.  मृतांच्या कुटुंबियांना पाच लाख रुपयांची मदत जाहीर करण्यात आली असून  जखमींवरील उपचाराचा खर्च शासनाकडून करण्यात येणार आहे. 


 मुख्यमंत्री  शिंदे म्हणाले की, ‘या दुर्घटनेत काही नागरिकांना आपला जीव गमवावा लागला आहे. यात काही लहान मुलांचाही समावेश आहे. ही घटना दुर्दैवी असून त्यात जीव गमवावा लागलेल्या नागरिकांप्रति सहवेदना व्यक्त करतो. या आगीच्या घटनेबाबत मुंबई महानगरपालिका आयुक्त आणि पोलीस आयुक्तांकडून वेळोवेळी माहिती घेत आहे. मुंबईचे शहर जिल्ह्याचे पालकमंत्री दीपक केसरकर तसेच मुंबई उपनगर जिल्ह्याचे पालकमंत्री मंगलप्रभात लोढा यांना घटनास्थळी भेट देण्याचे निर्देश दिले आहेत’. या दुर्घटनेत मृत्यू झालेल्या मृतांच्या कुटुंबियांना ५ लाख रुपयांची मदत देण्यात यावी. तसेच जखमींवरील उपचाराचा खर्च शासनाकडून करण्यात यावा, असेही निर्देश मुख्यमंत्र्यांनी दिले आहेत.


 पहाटे 3 वाजताच्या सुमारास आग लागली. ही आग इतकी भीषण होती की या आगीमध्ये ८ जणांचा मृत्यू झाला आहे.आगीच्या धुरामुळे श्वसनाचा त्रास झालेल्या नागरिकांना सुद्धा उपचारासाठी रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. या घटनेची दखल मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्याकडून घेण्यात आली आहे. दिल्ली येथे असलेल्या मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी या आगीच्या दुर्घटनेतील मृतांना 5 लाख रुपयांची मदत जाहीर केली आहे. तर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्याकडून मृतांना 2 लाख रुपये आणि जखमींना 50 हजार रुपयांची मदत जाहीर करण्यात आलेली आहे. तसेच, ज्या जखमींना प्लॅस्टिक सर्जरी करण्याची गरज आहे, अशा जखमींवर प्लॅस्टिक सर्जरीचे उपचार हे कस्तुरबा रुग्णालयात करण्यात येतील, अशी माहिती मुंबई महानगरपालिकेचे आयुक्त इकबाल सिंह चहल यांच्याकडून देण्यात आली आहे.