मुंबई प्रतिनिधी:
शिवाजीनगर पोलीस स्टेशनचे ज्येष्ठ पोलीस निरीक्षक बापूराव मधुकर देशमुख यांना मंगळवारी रात्री त्यांच्याच पोलीस स्टेशनमध्ये एक लाख रुपयांची लाच घेताना अटक करण्यात आली.
याबाबतची सविस्तर माहिती अशी आहे. १५ ऑगस्ट २०२४ रोजी शिवाजीनगर मधील एका शाळेत काही लोक कुलूप तोडून जबरदस्तीने घुसले. शाळेच्या एका ट्रस्टीने त्यांच्याविरुद्ध शिवाजीनगर पोलीस स्टेशन व चॅरिटी कमिशनर यांच्याकडे तक्रार दाखल केली.
संबंधितांना शाळेत पुन्हा घुसता येऊ नये तसेच चॅरिटी कमिशनर यांचा अहवाल येईपर्यंत शाळेला संरक्षण मिळावे अशी मागणी तक्रारदार ट्रस्टीने पोलीस स्टेशन वर केली. त्यावर अशी मदत करण्याकरिता ज्येष्ठ पोलीस निरीक्षक बापूराव देशमुख यांनी शाळेकडे तीन लाख रुपयांची मागणी केली. ही रक्कम खूपच अधिक असल्याचे शाळेच्या ट्रस्टीने सांगितले. त्यावर घासाघीस करून अडीच लाख रुपयांवर व्यवहार ठरविण्यात आला. त्यापैकी एक लाख रुपये मंगळवारी रात्री ट्रस्टीने पोलीस स्टेशनला आणून द्यायचे असे ठरले.
पण कायदेशीर कामासाठी पोलीस निरीक्षकाला लाच देणे ट्रस्टीना मान्य नव्हते. म्हणून त्यांनी अँटी करप्शन ब्युरो कडे तक्रार दाखल केली. या तक्रारीच्या आधारे अँटी करप्शन ब्युरो ने सापळा रचून देशमुख यांना पोलीस स्टेशनवर एक लाख रुपयांची लाच स्वीकारताना रंगे हात पकडले. येत्या वर्षभरात देशमुख सेवानिवृत्त होणार होते. पण लाच स्वीकारण्याची त्यांना अवदसा आठवली आणि त्यांना तुरुंगात जावे लागले. देशमुख यांच्या या शोकांतिकेपासून सर्वच सरकारी कर्मचाऱ्यांनी खूप काही शिकण्यासारखे आहे.