जालना घटनेवरून शरद पवारांकडून, फडणवीसांच्या राजीनाम्याची मागणी

Santosh Gaikwad September 02, 2023 06:53 PM


जालना : जालना येथील घटनेवरून राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी सरकारवर हल्लाबोल केला आहे. गोवारी आंदोलनात आदिवासी मंत्री मधुकरराव पिचड यांनी राजीनामा दिला होता. त्यामुळे या घटनेत गृहखात्याची नैतिक जबाबदारी कुणाची आहे ? असा सवाल करीत पवार यांनी गृहमंत्री देवेंद्र फडणवीसच्या अप्रत्यक्षपणे राजीनाम्याची मागणी केली.  


जालन्यातील मराठा आंदोलकांवर पोलिसांनी केलेल्या अमानुष लाठीहल्ल्यानंतर राज्यभरात मराठा समाज आक्रमक झाला आहे.  शिंदे-फडणवीस सरकारविरोधात सर्वत्र संतप्त भावना उमटताना दिसत आहे. शरद पवार यांनी आंदोलनकत्यांची भेट घेतली. यावेळी त्यांनी सरकारवर टीका केली.  ही घटना गंभीर आहे. संकटात असलेल्या लोकांना दिलासा देण्याची गरज आहे. हवा तसा बळाचा वापर जालना येथील घटनेत करण्यात आला. आंदोलनात काही मार्ग निघेल याची चर्चा सुरू होती, सर्व व्यवस्थित सुरू असताना पोलिसांना सूचना आल्या आणि पोलिसांनी निर्णय बदलून सरळ सरळ बळाचा वापर करत लाठीहल्ला केला. मुंबईहून आदेश आल्यावर पोलिसांकडून बळाचा वापर करण्यात आला असल्याचा गंभीर आरोप शरद पवार यांनी केला आहे.  


जालना येथे घडलेला प्रकार अतिशय गंभीर आहे. हा प्रकार जालना जिल्ह्यापुरता मर्यादित न रहाता इतर ठिकाणी पसरण्याची शक्यता नाकारता येत नाही. आज आम्ही तिघांनी इथे हॉस्पिटल मध्ये जाऊन भेट दिली, जखमी लोकांना भेटलो. आश्चर्य वाटेल असा बळाचा वापर या ठिकाणी करण्यात आला. स्त्रिया लहान मुले यांना सुद्धा पाहिले नाही. आंदोलनात काही मार्ग निघेल याची चर्चा सुरू होती, सर्व व्यवस्थित सुरू असताना पोलिसांना सूचना आल्या आणि पोलिसांनी निर्णय बदलून सरळ सरळ बळाचा वापर करत लाठीहल्ला केला. हवेत गोळीबार करून ज्वारीच्या साईजचे छरे जखमींना लागले होते. काँग्रेस-राष्ट्रवादी काँग्रेसच्या सरकारच्या काळात, त्या मंत्रिमंडळात आरक्षण देण्याचा निर्णय घेतला होता, असेही शरद पवार म्हणाले. 


आंदोलन शांततेने व्हावं कायदा हातात घेण्याचे काम कोणी करू नये. चर्चा सुरू असताना एकदम लाठीहल्ला केला, त्यानंतर संतप्त प्रतिक्रिया उमटल्या असतील तर त्याची जबाबदारी ज्यांनी निर्णय घेतला त्यांची आहे. जखमी लोक आणि आंदोलकांनी सांगितले की, पोलिसांना वरून आदेश देण्यात आले. पोलिसांवर हल्ला झाला नाही, पोलिसांकडून हल्ला झाला. मात्र यात पोलिसांना मी दोष देणार नाही. त्यांना ज्यांनी आदेश दिला? याची उच्चस्तरीय नाही तर यासाठी न्यायालयीन चौकशीची गरज आहे.आंदोलकाना शांतता प्रस्थपित करण्याचे मी आवाहन केले, जाळपोळ करू नये असेही शरद पवार म्हणाले. 


 शरद पवार मुख्यंमत्री असतांना गोवारीमध्ये झालेल्या आंदोलनात अनेकांचे जीव गेले होते. पण त्यावेळी शरद पवारांनी तिथे भेट दिली नाही आणि राजीनामा सुद्धा दिला नसल्याचा आरोप फडणवीस यांनी केला होता. त्यांच्या आरोपाला उत्तर देतांना आज शरद पवार म्हणाले की, "गोवारीमध्ये आंदोलनात चेंगराचेंगरी झाली होती. त्यावेळी मी नागपुरात नव्हतो, मुंबईत होतो. या घटनेनंतर माझ्या सरकारमधील आदिवासी कल्याण मंत्र्यांनी राजीनामा दिला होता. ज्यांनी मला प्रश्न विचारला त्यांची जबाबदारी काय? असे म्हणत पवारांनी देवेंद्र फडणवीस यांचे नाव न घेता टीका केली आहे.