पाकिस्तानचे परराष्ट्र मंत्री इशाक दार यांनी म्हटले की, पाकिस्तान आणि भारत यांनी तात्काळ शस्त्रविरामावर सहमती दर्शविली आहे. पाकिस्तानने नेहमीच या प्रदेशात शांतता आणि सुरक्षिततेसाठी प्रयत्न केले आहेत.

संरक्षण मंत्रालयाकडून पत्रकार परिषद घेऊन आतापर्यंत झालेल्या लष्करी संघर्षाची माहिती देण्यात आली.

शस्त्रविराम झाला असला तरी पाकिस्तानने यापुढे काही आगळीक झाल्यास त्याला भारतीय सैन्यदलाकडून सडेतोड उत्तर देण्यात येईल, असेही संरक्षण मंत्रालयाच्या पत्रकार परिषदेत सांगण्यात आले. संरक्षण दलाच्या वतीने घेण्यात आलेल्या पत्रकार परिषदेत विंग कमांडर व्योमिका सिंग यांनी सांगितले की, भारतीय सैन्यदल भारताची एकता, अखंडता अबाधित राखण्यासाठी पूर्णपणे कटिबद्ध आहे.

 
 पाकिस्तान लष्कराचे मोठे नुकसान - कर्नल सोफिया कुरेशी

भारताने केलेल्या कारवाईत पाकिस्तान लष्कराचे मोठे नुकसान केले आहे. पाकिस्तानचे एअर डिफेन्स, रडार सिस्टिमलाही निकामी केले. प्रत्यक्ष नियंत्रण रेषेजवळील पाकिस्तानच्या लॉजिस्टिक यंत्रणेला आणि पाकिस्तानच्या लष्करी प्रणालीचे मोठे नुकसान करण्यात आले आहे. यापुढे पाकिस्तान स्वतःची सुरक्षा किंवा हल्ला करू शकणार नाही, अशी माहिती कर्नल सोफिया कुरेशी यांनी दिली.

भारत सेक्यूलर देश, आम्ही धार्मिक स्थळांना लक्ष्य केले नाही

भारतीय सैन्याने मशिदीचे नुकसान केले, असा अपप्रचार पाकिस्तानकडून होत आहे. मात्र हा भ्रामक प्रचार खोटा असल्याचे आम्ही जाहीर करतो. भारत हा एक सेक्यूलर देश आहे. भारतीय सैन्यदल संविधानाचा आदर करतो आणि त्याप्रमाणे वागतो”, असे सांगून कर्नल सोफिया कुरेशी यांनी धार्मिक स्थळांना लक्ष्य केल्याचा आरोप फेटाळला.

सरंक्षण दलाची पत्रकार परिषद सुरू

परराष्ट्र मंत्रालयाच्या पत्रकार परिषदेनंतर संरक्षण मंत्रालयाकडून पत्रकार परिषद घेऊन शस्त्रविरामाची माहिती देण्यात येत आहे.

 परराष्ट्र मंत्री एस. जयशंकर यांची मोठी माहिती, दोन्ही देशांत सामंजस्य करार

“भारत आणि पाकिस्तानने आज गोळीबार आणि लष्करी कारवाई थांबविण्याबाबत सामंजस्य करार केला आहे. भारताने सर्व प्रकारच्या दहशतवादाविरोधात आजवर कोणतीही तडजोड न करता ठाम अशी भूमिका घेतलेली आहे आणि पुढेही घेत राहिल”, अशी पोस्ट परराष्ट्र मंत्री एस. जयशंकर यांनी केली आहे.

 डोनाल्ड ट्रम्प यांची शिष्टाई आणि शस्त्रविरामाची घोषणा

अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी काही वेळापूर्वी एक्सवर पोस्ट टाकून भारत आणि पाकिस्तानदरम्यान मध्यस्थी घडवून आणण्यासाठी अमेरिकेने प्रयत्न केल्याचा दावा केला. भारत आणि पाकिस्तान शस्त्रविरामासाठी तयार झाल्याची घोषणाही त्यांनी केली. त्यांच्या पोस्टनंतर परराष्ट्र सचिव विक्रम मिस्री यांनी पत्रकार परिषदेतही हीच घोषणा केली.

भारत-पाकिस्तानमध्ये पुढची चर्चा थेट १२ मे रोजी होणार

भारत आणि पाकिस्तानचे डीजीएमओ हे पुन्हा १२ मे रोजी चर्चा करणार आहेत, अशी माहिती परराष्ट्र मंत्रालयाचे सचिव विक्रम मिस्री यांनी दिली.

परराष्ट्र मंत्रालयाकडून शस्त्रसंधीची घोषणा, सायंकाळी ५ वाजल्यापासून दोन्ही बाजूंनी कारवाया थंडावल्या

परराष्ट्र सचिव विक्रम मिस्री यांनी सांगितले की, जमीन, आकाश आणि समुद्राद्वारे होणाऱ्या सर्व कारवाया थांबविण्यात आल्या आहेत. पाकिस्तानच्या लष्करी ऑपरेशन्सचे महासंचालक यांनी भारतीय अधिकाऱ्यांशी संपर्क साधून शस्त्रसंधीची मागणी केली. भारताने आपल्या अटींवर शस्त्रसंधीस परवानगी दिली आहे. सायंकाळी ५ वाजल्यापासून शस्त्रसंधीची घोषणा करण्यात आली आहे.

वाढत्या तणावाच्या पार्श्वभूमीवर पंतप्रधान मोदींच्या नेतृत्वाखाली उच्चस्तरीय बैठक सुरू

परराष्ट्र मंत्रालयाची पत्रकार परिषद संपल्यानंतर आता पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या अध्यक्षतेखाली उच्चस्तरीय बैठक सुरू झाली आहे. पाकिस्तानकडून चिथावणी देण्यात येत असल्याचे विधान परराष्ट्र सचिव विक्रम मिस्री यांनी केले होते. तसेच शुक्रवारी रात्रीपासून पाकिस्तानने नागरी भागांनाही लक्ष्य केल्यानंतर सदर महत्त्वाची बैठक संपन्न होत आहे.

 

 
 
India confirms ceasefire with Pakistan

भारत आणि पाकिस्तान यांच्यात शस्त्रविरामाची घोषणा झाली आहे.