एमसीएमसीआर' येथील विविध पदांसाठी उमेदवारांना अर्ज करण्यासाठी मुदतवाढ

Ketan khedekar May 15, 2025 03:35 PM


मुंबई प्रतिनिधी 

 नागरी स्थानिक स्वराज्य संस्थांसाठी क्षमता वाढ, सल्लागार सेवा आणि व्यावहारिक संशोधन करण्यासाठी तसेच महानगरपालिकांचा विकास आराखडा तयार करण्यासाठी, महाराष्ट्र शासनाच्या नगर विकास विभागाने बृहन्मुंबई महानगरपालिकेच्या 'एमसीएमसीआर' या संस्थेला समन्वय (नोडल एजन्सी) म्हणून मान्यता दिली आहे. पवई स्थित महानगरपालिका क्षमता बांधणी आणि संशोधन केंद्र (एमसीएमसीआर) येथे कंत्राटी तत्वावर काही शैक्षणिक, आस्थापना तसेच तांत्रिक संवर्गातील विविध पदांसाठी भरती प्रक्रिया सुरू करण्यात आली आहे. त्यासाठी अर्ज करण्याची मुदत दिनांक २० मे २०२५ पर्यंत वाढवण्यात आली आहे. 

 महानगरपालिका क्षमता बांधणी आणि संशोधन केंद्र (एमसीएमसीआर) येथे महानगरपालिकेच्या अधिकारी आणि कर्मचाऱ्यांना तसेच इतर स्थानिक स्वराज्य संस्थांमधील मनुष्यबळास कौशल्य आणि क्षमता वाढीसाठी प्रशिक्षण दिले जाते.  

 एमसीएमसीआर येथे कंत्राटी तत्वावर काही शैक्षणिक, आस्थापना तसेच तांत्रिक पदांसाठीची पदभरती जाहिरात दिनांक २ मे २०२५ रोजी प्रसिद्ध झाली होती. प्रसिध्‍द झालेल्‍या जाहिरातीमध्‍ये अर्ज करण्‍यासाठी अंतिम मुदत दिनांक १३ मे २०२५ सायंकाळी ५ वाजेपर्यंत नमूद करण्‍यात आली होती. मात्र, या भरती प्रक्रियेअंतर्गत अधिकाधिक उमेदवारांना अर्ज सादर करण्‍यासाठी अतिरिक्त कालावधी देण्यात आला आहे. त्यानुसार अर्ज करण्यासाठीची मुदत आता दिनांक २० मे २०२५ सायंकाळी ५ वाजेपर्यंत वाढवण्यात आली आहे. एकूण १५ संवर्ग मिळून २० पदांसाठी ही भरती प्रक्रिया राबविण्यात येणार आहे. उमेदवारांना विविध संवर्गासाठी https://mcmcr.mcgm.gov.in/careers.php या लिंकवर अर्ज करता येईल. 

 सदर नेमणूक प्रक्रिया ही नियमितपणे होणारी कंत्राटी तत्वावरील असल्याचे महानगरपालिका क्षमता बांधणी आणि संशोधन केंद्र (एमसीएमसीआर) च्या संचालकांनी स्पष्ट केले आहे. अधिकाधिक उमेदवारांना या भरती प्रक्रियेअंतर्गत अर्ज करणे शक्य व्हावे, यासाठी ही मुदतवाढ देण्यात आली आहे. कंत्राटी तत्वावरील भरती प्रक्रियेअंतर्गत अध्यापन, प्रशासकीय, कार्यालयीन, तांत्रिक तसेच चतुर्थ श्रेणी अशा विविध पदांवर भरती करण्यात येणार आहे.