मुंबई; शिवनेर, प्रतिनिधी
आत्माराम मोरे प्रतिष्ठान व आयडियल स्पोर्ट्स अकॅडमीतर्फे रोझरी हायस्कूल-डॉकयार्ड सहकार्याने कबड्डी दिनानिमित्त सुरु झालेल्या आत्माराम मोरे स्मृती चषक विनाशुल्क इंडोर कबड्डी स्पर्धेत समता विद्यामंदिर-घाटकोपर, ताराबाई मोडक हायस्कूल-दादर, ज्ञानेश्वर विद्यालय-वडाळा, ऑल इंडिया एज्युकेशन सोसायटी हायस्कूल-घाटकोपर आदी शालेय संघांनी सलामीचे सामने जिंकले. समता विद्यामंदिरने यजमान रोझरी हायस्कूलचा ८-४ असा पराभव करतांना विजयी संघाचे चढाईपटू मोहित विश्वकर्मा व हर्ष पावसकर चमकले. स्पर्धेचे उद्घाटन रोझरी हायस्कूलच्या प्रिन्सिपल सिस्टर विजया चलील, सेक्युर वन सेक्युरिटी सर्व्हिसचे सुरक्षा मुख्याधिकारी अरुण माने, शिवछत्रपती पुरस्कार विजेते लीलाधर चव्हाण आदींच्या उपस्थितीत झाले.
डॉकयार्ड येथील रोझरी हायस्कूल सभागृहात मॅटवर ही स्पर्धा टायब्रेकरसाठी होणाऱ्या ५-५ चढायांमध्ये मुंबईतील १२ शालेय संघांच्या सहभागाने सुरु झाली आहे. अष्टपैलू आर्यन दिवे व अनिश पोळेकर यांच्या आक्रमक चढायामुळे ताराबाई मोडक हायस्कूलने भायखळ्याच्या अँटोनियो डिसोझा हायस्कूलवर ९-२ असा विजय मिळविला. ज्ञानेश्वर विद्यालयाने सांघिक खेळाच्या बळावर माझगावच्या सर एली कदुरी हायस्कूलचे आव्हान १२-१ असे सहज संपुष्टात आणले. संपूर्ण डावामध्ये बरोबरी झालेल्या सामन्यात अखेर ऑल इंडिया एज्युकेशन सोसायटी हायस्कूलने चेंबूरच्या अफॅक हायस्कूलचा ९-८ असा निसटता पराभव केला. विजयी संघाचा चढाईपटू साई खोपकरने छान खेळ केला. स्पर्धेदरम्यान शालेय खेळाडूंना आत्माराम मोरे प्रतिष्ठानचे अध्यक्ष अश्विनीकुमार मोरे व कबड्डीप्रेमी गोविंदराव मोहिते यांच्या प्रोत्साहनामुळे प्रशिक्षक प्रॉमिस सैतवडेकर व सुनील खोपकर यांचे मार्गदर्शन लाभत आहे.
******************************