MUMBAI : महाराष्ट्र दिन व कामगार दिनानिमित्त लाईफ इन्शुरन्स कार्पोरेशन ऑफ इंडिया पुरस्कृत विनाशुल्क शालेय खेळाडूंच्या सुपर लीग कॅरम स्पर्धेमध्ये सिबिईयु वॉरीयर्स, आत्माराम मोरे प्रतिष्ठान, अविनाश नलावडे स्पोर्ट्स, एमडीसी ज्वेलर्स संघांनी विजयीदौड केली. आनंदराव अडसूळ चॅरिटेबल ट्रस्ट, को-ऑपरेटिव्ह बँक एम्प्लॉईज युनियन-सिबिईयु व आयडियल स्पोर्ट्स अकॅडमी आयोजित स्पर्धेमध्ये सिबिईयु वॉरीयर्स विरुध्द गोविंदराव मोहिते फायटर्स यामधील लढत शेवटपर्यंत चुरशीची झाली. नील म्हात्रेने उमैर पठाणविरुध्द १२-८ असा महत्वाचा विजय नोंदवून मोहिते फायटर्सने १-० असा दमदार प्रारंभ केला. परंतु प्रसाद माने व सारा देवन यांच्या विजयी खेळामुळे सिबिईयु वॉरीयर्सने २-१ अशी निर्णायक बाजी मारली.
आत्माराम मोरे प्रतिष्ठानने सुरेश आचरेकर फिनिशर्सला २-१ असे नमविताना उदयोन्मुख कॅरमपटू श्रीशान पालवणकरने राष्ट्रीय ख्यातीच्या तनया दळवीला १६-१५ असे आणि मयुरेश पवारने सोहा पठाणला २५-० असे हरविले. आर्यन राऊतने शिवांश मोरेवर १७-६ अशी मात करून आचरेकर फिनिशर्सला एकमात्र विजय मिळवून दिला. वेदांत पाटणकरने देविका जोशीला १९-४ असे तर तीर्थ ठक्करने अनय म्हेत्रेला २५-१० असे चकवून आनंदराव प्लॅटीनम संघाविरुद्ध अविनाश नलावडे स्पोर्ट्सच्या २-१ अशा विजयाचा मार्ग सुकर केला. अमेय जंगम व वेदिका पोमेंडकर यांच्या विजयी खेळामुळे एमडीसी ज्वेलर्सने बलाढ्य अभिजित घोष फ्लेअर प्ले संघाला २-१ असे पराभूत केले. पंचाचे कामकाज शिवछत्रपती पुरस्कार विजेते लीलाधर चव्हाण व प्रमोद पार्टे यांच्या मार्गदर्शनाखाली चंद्रकांत करंगुटकर, सचिन शिंदे, संतोष जाधव, अविनाश महाडिक, प्रॉमिस सैतवडेकर आदी पंच मंडळी पाहत आहेत.