दुर्गा भोसलेंचे ह्दयविकाराच्या झटक्याने निधन, उध्दव ठाकरे सून्न, रश्मी ठाकरेंना अश्रू अनावर !

Santosh Gaikwad April 06, 2023 07:10 PM

मुंबई :  युवासेनेच्या सचिव दुर्गा भोसले-शिंदे यांच ह्दयविकाराच्या तीव्र झटक्याने रात्री उशिरा दीड वाजता निधन झालं. ठाकरे कुटुंबाने दुर्गा भोसले यांच्या पेडर रोड येथील निवासस्थानी दाखल होत अंत्यदर्शन घेतलं. उद्धव ठाकरे यांच्यासह शेकडो कार्यकर्ते पेडर रोड परिसरात दुर्गाताईच्या यांच्या अंत्यदर्शनासाठी दाखल झाले. या घटनेने पक्षप्रमुख उद्धव ठाकरे देखील सुन्न झाले तर रश्मी ठाकरे यांना अश्रू अनावर झाले.  दुर्गाताई भोसले शिंदे यांच्या पश्चात पती, आई, वडील केशवराव भोसले आणि भाऊ असा परिवार आहे.  



बुधवारी ठाण्यातील महाविकास आघाडीच्या जनआक्रोश मोर्चात युवा सेनेची रणरागिनी ओळखली जणारी दुर्गा भोसले या सहभागी झाल्या होत्या. दुर्गा या मोर्चात जोरजोरात घोषणाबाजी देत होत्या. पण मोर्चादरम्यान त्यांची प्रकृती अचानक बिघडली. त्यांना तातडीने  रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. पण डॉक्टरांच्या अथक प्रयत्नानंतरही त्यांची रात्री उशिरा त्यांची  प्राणज्योत मालवली.  दुर्गा भोसले यांच्यासारख्या लढावू पदाधिका-याच्या निधनाने शिवसैनिक हळहळला.  पक्षप्रमुख उद्धव ठाकरे, त्यांच्या पत्नी रश्मी ठाकरे   आणि युवासेना प्रमुख आदित्य ठाकरे यांच्यासह शेकडो कार्यकर्ते मुंबईत पेडर रोड परिसरात दाखल झाले.  ठाकरे कुटुंबाकडून दुर्गा यांच्या कुटुंबियांचं सांत्वन करण्यात आलं. संध्याकाळी पाचच्या सुमारास   धीरज अपार्टमेंट, पेडर रोड, जसलोक हॉस्पिटलच्या बाजूला, कंबाला हिल येथून त्यांची अंत्ययात्रा निघाली. त्यांच्या पार्थिवावर वाळकेश्वर येथील बाणगंगा स्मशानभूमीत अंत्यसंस्कार करण्यात आले. शेकडो कार्यकर्ते अंत्ययात्रेत सहभागी झाले होते.