मुंबईतील जागा वाटपाचा तिढा सुटला : यामिनी जाधव, रवींद्र वायकर यांना उमेदवारी जाहीर

Santosh Gaikwad April 30, 2024 10:56 PM


मुंबई, दि. ३०ः मुंबईच्या जागा वाटपावरून महायुतीत गेल्या काही दिवसांपासून  सुरू असलेला तिढा अखेर सुटला आहे. या दोन्ही जागा सेनेकडे रोखण्यात मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना यश आलं.  शिवसेनेकडून दक्षिण मुंबई मतदारसंघातून यामिनी जाधव तर मुंबई उत्तर पश्चिम मतदारसंघातून आमदार रवींद्र वायकर यांना मंगळवारी अधिकृत उमेदवारी जाहीर केली. 

 लोकसभा निवडणुकीत हे दोन्ही मतदार संघावर भाजपने दावा केला होता. त्यावरून शिवसेना शिंदे गट आणि भाजपमध्ये जोरदार रस्सीखेच सुरू होती. भाजपकडून अनेक इच्छुकांची नावे चर्चेत होती. विधानसभा अध्यक्ष राहूल नार्वेकर, मंत्री मंगलप्रभात लोढा, मनसेचे नेते बाळा नांदगावकर यांच्या नावाची चर्चा होती.  मात्र शिवसेनेने हे मतदार संघ आपल्याकडे राखण्यात यश मिळालं. 

कोण आहेत यामिनी जाधव 

 यामिनी जाधव या उपनेते यशवंत जाधव यांच्या पत्नी आहेत. भाजपचे नेते किरीट सोमय्यांनी त्यांच्यावर मुंबई महापालिकेतील घोटाळ्याचा आरोप केला होता. ईडीच्या चौकशीनंतर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी जुलै २०२२ मध्ये ४० आमदारांसह बंड करत शिवसेनेत फूट पाडली. यावेळी आमदार यामिनी जाधव यांनी शिंदेंची साथ दिली होती. या मतदार संघातून शिवसेना ठाकरे पक्षाने अरविंद सावंत यांना उमेदवारी घोषित केली आहे. त्यामुळे  यामिनी जाधव यांचा अरविंद सावंत यांच्याशी होणार आहे. 

जोगेश्वरीतील राखीव भूखंडाच्या कथित गैरव्यवहाराप्रकरणी भाजपने केलेल्या गंभीर आरोपामुळे रवींद्र वायकर  गोत्यात आले. ईडीने देखील वायकर यांच्याविरोधात चौकशीचा ससेमिरा लावला. सततच्या चौकशीला कंटाळून वायकर यांनी १० मार्चला शिवसेनेत प्रवेश केला. त्यानंतर अवघ्या महिन्याभरातच वायकर यांना उत्तर पश्चिम मुंबई लोकसभा मतदारसंघातून शिवसेनेकडून उमेदवारी जाहीर झाली. शिवसेना (ठाकरे) अमोल किर्तीकर यांना येथून उमेदवारी दिली आहे. शिवसेना नेते विद्यमान खासदार गजानन किर्तीकर यांचे ते चिरंजीव आहेत. त्यामुळे गजानन किर्तीकर यांनी येथून निवडणूक लढवू नये, यासाठी शिवसेनेचे नेते रामदास कदम यांनी जोरदार विरोध केला होता. तसेच चिरंजीव सिध्देश कदम यांना तिकीट मिळावे, अशी मागणी केली होती. दोघांमध्ये यामुळे खडाजंगी उडाली होती. मात्र, सिध्देश यांना प्रदुषण महामंडळाच्या अध्यक्षपदी नेमणूक झाल्याने वाद मिटला. शिवसेनेकडून अभिनेता गोविंदा, माजी मंत्री संजय निरूपम यांच्यासह अनेकांची नावे पुढे आली होती. मात्र, शिवसेनेने वायकर यांना संधी दिली आहे. दोन्ही उमेदवारांचा प्रचार भाजप येत्या निवडणुकीत करणार का, असा प्रश्न यावेळी उपस्थित केला जातो आहे.