येणारा जागतिक जल दिन: आपल्या नद्या परत जीवित करण्याबद्दलची कथा : गुरुदेव श्री श्री रविशंकर

Santosh Gaikwad March 19, 2024 09:13 PM


 मुंबई : यावर्षी जागतिक जल दिनाची थीम 'शांततेसाठी पाणी' अशी आहे. पाण्याचा जीवनाशी गहिरा संबंध आहे.  पाण्याचा संस्कृत शब्द आप: असा आहे, ज्याचा अर्थ प्रेम किंवा प्रिय व्यक्ती असा होतो.  सर्व प्रमुख प्राचीन संस्कृतींचा विकास नदीच्या काठावर किंवा नद्यांवर झाला आहे, जसे भारतातील गंगा किंवा यमुना, इजिप्तमधील नाईल किंवा दक्षिण अमेरिकेतील ऍमेझॉन.

 

 भारताचा सांस्कृतिक संबंध नद्यांशी अगदी गहिरा आहे.  प्रभू रामाने आपले जीवन शरयू नदीकाठी व्यतीत केले.  गंगा नदी ही भगवान शिवापासून उदयास आली असल्याचे वर्णन केले गेले आहे आणि योगी तिच्या तीरावर हजारो वर्षांपासून ध्यान करत आहेत.  गंगा ज्ञानाचे प्रतीक आहे आणि यमुना भक्ती दर्शवते. गोपींचे भगवान कृष्णाप्रती प्रेम आणि भक्ती यमुनेच्या तीरावर फुलली होती.

 

 आपल्या नद्यांना पुन्हा जिवीत करण्यासाठी आपण शक्य ते सर्व करणे आवश्यक आहे. इथे श्रद्धेची महत्त्वाची भूमिका असू शकते.  श्रद्धा लोकांना नीतिमत्तेने वागण्यास आणि नद्या, पर्वत, जंगले आणि पाण्याचे इतर स्त्रोत अशा पर्यावरणाची काळजी घेण्यास प्रेरित करू शकते.  आपल्याकडे सर्वोत्कृष्ट धोरणे असतील, परंतु त्या धोरणांची अंमलबजावणी करण्यासाठी तुम्हाला तळागाळातील लोकांत अधिक जागरूकता आणणे आवश्यक आहे आणि यासाठी विश्वासावर आधारित संस्था मोठा बदल घडवून आणू शकतात.


 भारताला पाण्याबद्दल सकारात्मक बनवणे: तळागाळातील लोकांसोबत काम करणे

 

 या जगात शांतता आणि स्थिरतेसाठी पाण्याची उपलब्धता अत्यंत महत्त्वाची आहे.  त्यासाठीच आम्ही भारतात काम केले.  तळागाळातील लोकांना सोबत घेऊन, आम्ही केवळ महसुल खात्याच्या नोंदींवर अस्तित्वात असलेल्या ७० लुप्तप्राय नद्यांचे पुनरुज्जीवन केले.  इथल्या कोरड्या पडलेल्या नद्यांच्या पात्रांवर अतिक्रमण केले जात होते; त्यामुळे एकतर पूर आला की जास्त पाणी वाया जात असे किंवा अनेक महिने दुष्काळ पडत असे. परिणामी पिके उगवायची नाहीत आणि शेतकऱ्यांचे प्रचंड नुकसान होत असे.  आत्महत्या करणाऱ्या शेतकऱ्यांची संख्या दिवसेंदिवस वाढतच होती.

 

 बाहेरील बदल पाहण्याच्या आधी, तो बदल आपल्यातच घडून यायला हवा.  तुमचे हृदय मोकळे झाल्यावर तुम्ही सेवा केल्याशिवाय राहू शकत नाही. याप्रकारे आमचे स्वयंसेवकांचे जाळे गेल्या काही वर्षांत वाढत गेले आहे.  आपल्या आतून अनुभवलेल्या आनंदाने प्रेरित होत त्यांनी इतरांची सेवा करण्याचा आणि तोच आनंद इतरांना देण्याचा निर्णय घेतला.  आमचे स्वयंसेवक गावोगावी अगदी तळागाळापर्यंत पोहोचले. त्यांनी त्या लोकांना प्रेरणा दिली आणि आतून आनंदी आणि मजबूत होण्यासाठी ध्यान, प्राणायाम, योग आणि इतर पद्धती शिकवल्या.  त्यांनी त्यांच्यासोबत शेकडो ग्राउंड रिचार्ज विहिरी बांधण्याचे काम केले, जेणेकरून पावसाचे पाणी आत झिरपू शकेल. आम्ही वनीकरणाचे उपक्रम हाती घेतले, बाभळीच्या झाडांसारख्या जलप्रधान प्रजाती बदलून आणि नदीच्या काठावर आंबा, पिंपळ आणि त्या सारखी इतर देशी झाडे लावली.

 

 चमत्कार हा होता की, जमिनीचे सर्वेक्षण करून, पुनर्भरण संरचना बांधून, आणि लाखो योग्य प्रजातींच्या वनस्पतींचे पुनर्रोपण केल्यावर, आम्हाला हजारो जलाशय दिसू लागले, तलावांचे पुनरुज्जीवन केले गेले आणि आज भारतातल्या पाच राज्यांमध्ये ७० लुप्तप्राय नद्या बारमाही पाण्याने वाहू लागल्या आहेत, पक्षी परत येऊ लागले आहेत आणि ढगही परत जमू लागले आहेत.

 

 गेल्या मे महिन्यात, विदर्भातील ज्या भागात शेतकरी आत्महत्यांचे प्रमाण सर्वाधिक होते, त्या भागातील सुमारे एक हजार शेतकरी, आमच्या स्वयंसेवकांनी केलेल्या कार्यामुळे झालेल्या परिवर्तनाबद्दल आभार मानण्यासाठी आमच्या बंगलोर आश्रमात आले.  ते आता पूर्वीपेक्षा चौपट जास्त कमावत आहेत.  दोन वर्षांपेक्षा कमी कालावधीत १९,५०० हून अधिक गावांना लाभ झाला.


 जेव्हा एखादी व्यक्ती स्पष्ट आणि तणावमुक्त असते, तेव्हा ती संवेदनशील होते, काळजी घेते, सुखदुःख वाटून घेते आणि कटिबद्ध असते.  ईथे विश्वासावर आधारित संस्था लोकांच्या मानसिक आरोग्यासाठी, त्यांना प्रेरणा देण्यासाठी आणि सेवेसाठी प्रेरित करण्यासाठी, आपल्या नद्यांना पुन्हा जिवीत करण्यात मोठी भूमिका बजावत असतात, ज्यामुळे  आपल्या भोवताली समृद्धी, स्थिरता आणि शांतता येईल.