लोकलमध्ये विद्यार्थीनीवर लैंगिक अत्याचार, गृहखात्याच्या कार्यक्षमतेवर प्रश्नचिन्ह : अजित पवार

Santosh Gaikwad June 15, 2023 04:39 PM


मुंबई : लोकलमध्ये एका विद्यार्थीनीवर झालेला लैंगिक अत्याचाराने सर्वांचीच झोप उडाली असून, या घटनेवरून विरोधकांनी तीव्र संताप केला आहे.गेल्या काही दिवसात राज्यात महिलांवरील अत्याचारात झालेली वाढ चिंताजनक असून गृहखात्याच्या कार्यक्षमतेवर प्रश्नचिन्ह निर्माण करणारी आहे, अशा तीव्र शब्दात विधानसभेचे विरोधी पक्षनेते अजित पवार यांनी संताप व्यक्त करत या घटनेचा निषेध केला आहे. या घटनेचा युध्दपातळीवर तपास पूर्ण करुन सुरक्षा व्यवस्थेतील गंभीर हलगर्जीपणाची चौकशी करण्याची मागणी त्यांनी  केली आहे.

 

विरोधी पक्षनेते अजित पवार म्हणाले, मुंबईत लोकलच्या हार्बर मार्गावर धावत्या लोकलमध्ये सकाळच्या वेळेत विद्यार्थीनीवर अत्याचाराची घटना घडली. परीक्षेला जात असताना विद्यार्थीनीसोबत सकाळी साडे सातच्या सुमारास हा प्रकार घडला. गेल्या काही दिवसांत राज्यात महिलांवरील अत्याचाराच्या घटनांमध्ये झालेली वाढ चिंताजनक असून गृह खात्याच्या कार्यक्षमतेवर प्रश्नचिन्ह उपस्थित करणारी आहे. ही घटना घडली त्या लोकलच्या महिला डब्यांमध्ये पोलीस सुरक्षा व्यवस्था का नव्हती ?  याला कोण जबाबदार आहे ? सुरक्षा व्यवस्था असती तर एका विद्यार्थीनीवरील हा गैरप्रसंग टाळता आला असता. या घटनेचा युध्दपातळीवर तपास पूर्ण करुन सुरक्षा व्यवस्थेतील गंभीर हलगर्जीपणाची चौकशी सरकारने करण्याची मागणी विरोधी पक्षनेते अजित पवार यांनी केली आहे. 


मुंबईच्या अब्रुची लक्तरे वेशीवर ...


मुंबईत चालत्या लोकलमध्ये एका विद्यार्थीनीवर झालेला लैंगिक अत्याचार संताप आणणार आहे. राज्यात सरकार, गृहखाते, पोलीस नावाची काही यंत्रणा जिवंत आहे का? असा प्रश्न पडला आहे. मुंबई शहरातील महिला अत्याचाराच्या वाढत्या घटना लाजीरवाण्या आहेत. डबल इंजिनचे सरकार महाराष्ट्रातही नापास झाले असून चालत्या लोकलमध्ये मुलीवरील लैंगिक अत्याचाराने मुंबईच्या अब्रुची लक्तरे वेशीवर टांगली आहेत, असा घणाघाती हल्ला महाराष्ट्र प्रदेश महिला काँग्रेसच्या अध्यक्षा संध्याताई सव्वालाखे यांनी केला आहे.

 महाराष्ट्रातील कायदा सुव्यवस्थेचा बोजवारा उडालेला आहे. राज्यात खून, दरोडे, बलात्कार, दंगली यांचे प्रमाण वाढत आहे पण पोलीस यंत्रणा व सरकार कुंभकर्णी झोपेत आहे, त्यांच्यावर कशाचाही परिणाम होत नाही, डबल इंजिनच्या सरकारने निर्लज्जपणाचा कळस गाठला आहे. चर्चगेटजवळच्या महिला वसतिगृहातील मुलीवर अत्याचार होऊन आठवडाही झाला नाही, मुंबईतच मनोज साने नावाच्या नराधमाने महिलेची क्रूर हत्या करून तिचे तुकडे केले आणि आता पुन्हा लोकलमध्ये मुलीवर लैंगिक अत्याचार. या घटना पाहून सरकार खडबडून जागे व्हायला हवे पण शिंदे फडणवीसांना कशाचीही चाड राहिलेली नाही.

राज्यातील शिवसेना व भाजपा या सत्ताधारी पक्षातील आपसातील भांडणातून त्यांना राज्यकारभार करण्यास वेळ मिळत नाही तर दुसरीकडे देशाचे पंतप्रधान रेल्वेला हिरवा झेंडा दाखवून चमकोगिरी करण्यातच आघाडीवर असतात. रेल्वे सेवा व रेल्वे सुरक्षा याबाबत त्यांना काही देणे घेणे नाही. सरकारला जर जनाची नाही मनाची असेल तर महिला सुरक्षेवर लक्ष द्यावे. विशेषतः मुंबईत लोकलमध्ये रात्री उशिरापर्यत मुली, महिला प्रवास करत असतात, याचा गांभिर्याने विचार करुन लोकलमधील रात्रीची सुरक्षा वाढवावी असे सव्वालाखे म्हणाल्या.