कर्नाटकात मुख्यमंत्रीपदासाठी सिद्धरामय्या यांची निवड, शपथविधीची तारीखही ठरली

Santosh Sakpal May 18, 2023 08:25 AM

बेंगरूळ : कर्नाटकात काँग्रेसला अभूतपूर्व यश मिळालं असलं तरीही अद्यापही मंत्रिमंडळ तयार झालेलं नाही. सिद्धरामय्या आणि शिवकुमार या दोघांमध्ये मुख्यमंत्री पदावरून रस्सीखेच सुरू असल्याने मंत्रिमंडळाचा पेच निर्माण झाला आहे. गेल्या ४८ तासांपासून या दोघांनीही दिल्लीत ठाण मांडल्याने कर्नाटकचा पुढचा मुख्यमंत्री कोण याकडे सर्वांचं लक्ष लागलं आहे. दरम्यान, कर्नाटकच्या मुख्यमंत्री पदासाठी सिद्धरामय्या यांच्या नावावर शिक्कमोर्तब झाले असल्याचे वृत्त सूत्रांच्या हवाल्याने एएनआय या वृत्तसंस्थेने दिले आहे. तर शपथविधी कार्यक्रम २० मे रोजी होण्याची शक्यता आहे.

कर्नाटकात १० मे रोजी विधानसभा निवडणुकांसाठी मतदान झाले. तर, १३ मे रोजी मतमोजणी होऊन निकाल जाहीर झाला. या निकालात काँग्रेसला स्पष्ट बहुमत मिळाले आहे. त्यामुळे कर्नाटकातील सत्तेच्या चाव्या आता काँग्रेसला मिळणार असल्याचे स्पष्ट आहे. परंतु, सिद्धरामय्या आणि डि. के. शिवकुमार यांच्यात मुख्यमंत्री पदावरून पेच निर्माण झाला होता. दोघेही पक्षातील ज्येष्ठ आणि अनुभवी नेते असल्याने मुख्यमंत्री पदाचे प्रकरण हायकमांडकडे गेले. निवडणूक प्रचारादरम्यान काँग्रेसने मुख्यमंत्री पदाचा चेहरा जाहीर केला नव्हता. आधी निवडणूक होऊ द्या, मग मुख्यमंत्री ठरवू अशी भूमिका मुख्यमंत्री पदाच्या शर्यतीत असलेल्या नेत्यांनी केल्याने निवडणूक प्रक्रिया यशस्वी पार पडली. परंतु, आता निकालानंतर मुख्यमंत्री पदाची खूर्ची कोणाच्या ताब्यात जाणार यावरून दोन्ही नेत्यांमध्ये संघर्ष निर्माण झाला.

सिद्धरामय्या यांनी बुधवारी सकाळी अकराच्या सुमारास ‘दहा जनपथ’वर राहुल गांधी यांची भेट घेतल्यानंतर मुख्यमंत्र्यांच्या नावाची घोषणा लगेचच केली जाईल, असे संकेत पक्षाकडून देण्यात आले होते. मात्र मुख्यमंत्री होणार नसेल तर फक्त आमदार म्हणून पक्षासाठी काम करत राहीन, अशी ताठर भूमिका शिवकुमार यांनी पक्षाध्यक्ष मल्लिकार्जुन खरगेंशी झालेल्या दोन तासांच्या चर्चेमध्ये घेतल्यामुळे काँग्रेसला कर्नाटकच्या मुख्यमंत्र्याचे नाव जाहीर करण्याचा निर्णय अखेरच्या क्षणी मागे घ्यावा लागला.


कर्नाटकच्या बहुतांश नवनियुक्त आमदारांनी पसंती दिल्यामुळे मुख्यमंत्रीपदी सिद्धरामय्यांची निवड निश्चित मानली जात होती. मात्र शिवकुमार यांनी बुधवारी काँग्रेसचे माजी अध्यक्ष राहुल गांधी यांची ‘दहा जनपथ’वर भेट घेतली. तिथून शिवकुमार हे ‘दहा राजाजी’ रोडवरील खरगेंच्या निवासस्थानी गेले. त्यांच्यातील प्रदीर्घ चर्चेनंतर शिवकुमार यांनी, ‘मुख्यमंत्री पदासंदर्भात अजून कोणताही निर्णय झालेला नाही’, असे पत्रकारांना सांगितले. या विधानामुळे शिवकुमार माघार घेणार नसल्याचे स्पष्ट झाले. सिद्धरामय्यांनी दोन वर्षे मुख्यमंत्री पदी राहावे, त्यानंतर ३ वर्षे हे पद शिवकुमार यांना दिले जाईल वा सिद्धरामय्यांनी पाच वर्षे मुख्यमंत्री राहावे व शिवकुमार यांनी उपमुख्यमंत्रीपद, महत्त्वाची खाती सांभाळावीत. तसेच, प्रदेशाध्यक्षपदीही कायम राहावे, असे दोन प्रस्ताव देण्यात आले आहेत. त्यातील एकही प्रस्ताव शिवकुमारांनी स्वीकारलेला नाही.

नेमकं काय ठरलं?

दरम्यान, काल झालेल्या बैठकांनंतर मुख्यमंत्रीपदी सिद्धरामय्या आणि उपमुख्यमंत्रीपदी डी. के. शिवकुमार यांची निवड निश्चित मानली जात आहे. काँग्रेसच्या केंद्रीय नेतृत्त्वाने सिद्धरामय्या, शिवकुमार आणि काँग्रेसच्या इतर नेतृत्त्वासोबत चर्चा केली, अशी माहिती कर्नाटकच्या महिला मोर्चाच्या अध्यक्षा पुष्पा अमरनाथ यांनी माहिती दिली. त्या पुढे म्हणाल्या की, “मुख्यमंत्री पदाच्या नावावर सिद्धरामय्या यांचं शिक्कामोर्तब झालं आहे.” असे वृत्त इंडियन एक्स्प्रेसने दिलं आहे.

दरम्यान, सिद्धरामय्या यांच्या बंगळुरूतील घराबाहेर जल्लोष सुरू झाला असून शिवकुमार यांच्या समर्थकांनी सोनिया गांधी यांच्या निवासस्थानाबाहेर घोषणाबाजीला सुरुवात केली आहे. परंतु, मुख्यमंत्री पदाबाबत अद्यापही चर्चा सुरू असल्याचं काँग्रेसकडून स्पष्ट करण्यात आलं आहे. “पुढच्या ४८ ते ७२ तासांमध्ये कर्नाटकात नवं मंत्रिमंडळ स्थापन होईल. पहिल्याच मंत्रिमंडळ बैठकीत आम्ही आश्वासित केलेल्या पाचही कामांना मंजुरी देणार असून ग्रॅण्ड कर्नाटक बनवण्यासाठी तयारी सुरू करणार आहोत”, असं अखिल भारतीय काँग्रेस कमिटीचे इनचार्ज रणदीप सिंग सुरजेवाला यांनी सांगितलं.