देशात १०२ जागांवर मतदान सुरू : महाराष्ट्रात संथ गतीने, पश्चिम बंगालमध्ये लांबच लांब रांगा ...

Santosh Gaikwad April 19, 2024 11:39 AM


नागपूर : लोकसभा निवडणूक २०२४ च्या पहिल्या टप्प्याच्या मतदानाला आजपासून सुरूवात झाली देशातील २१ राज्य आणि केंद्रशासित प्रदेशांसह १०२ जागांवर मतदान सुरू आहे. पहिल्या टप्प्यात १,६२५ उमेदवार निवडणूक लढवत आहेत. यामध्ये १,४९१ पुरुष आणि १३४ महिला उमेदवार आहेत. ८ केंद्रीय मंत्री, एक माजी मुख्यमंत्री आणि माजी राज्यपाल यांचे भवितव्य पणाला लागले आहेत.  महाराष्ट्रात संथ गतीने मतदान सुरू असून, पश्चिम बंगालमध्ये मतदान केंद्रावर मतदारांच्या लांबच लांब रांगा लागल्या आहेत. 

निवडणूक आयोगाच्या म्हणण्यानुसार, पहिल्या टप्प्यात १६.६३ कोटीहून अधिक मतदार आहेत. यामध्ये ८.४ कोटी पुरुष आणि ८.२३ ​​कोटी महिला मतदार आहेत. त्यापैकी ३५.६७ लाख मतदार असे आहेत जे पहिल्यांदाच मतदान करणार आहेत. तर २० ते २९ वयोगटातील मतदारांची संख्या ३.५१ कोटी आहे. यासाठी १.८७ लाख मतदान केंद्रे तयार करण्यात आली आहेत. 

सकाळी सात वाजल्यापासून सुरू झालेले मतदान संध्याकाळी सहा वाजेपर्यंत चालणार आहे. महिला मतदानासाठी मोठया प्रमाणात बाहेर पडल्या आहेत. हे दृश्य देशभरात दिसून येत आहे. 

महाराष्ट्रात विदर्भातील रामटेक, नागपूर, भंडारा-गोंदिया, गडचिरोली-चिमूर, चंद्रपूर या पाच मतदारसंघात मतदान सुरू आहे. विदर्भात प्रचंड ऊन असल्याने महाराष्ट्रातील मतदानाची टक्केवारी कमी आहे. 

जगातील सर्वात कमी उंचीची महिला म्हणून गिनीज बुक ऑफ इंडियात नोंद असलेल्या नागपूरच्या ज्योती आमगे हिने आज मतदान केले. यावेळी ती लाल कलरच्या फ्रॉकमध्ये होती आणि शाई लावलेले बोट उंचावून तिने मतदान केल्याचे सांगितले.  

२०१९ मध्ये लोकसभेच्या या   १०२  जागांपैकी भाजपने ४०, द्रमुकने २४ आणि काँग्रेसने १५ जागा जिंकल्या होत्या. इतरांना २३ जागा मिळाल्या होत्या. या टप्प्यात बहुतांश जागांसाठी या तीन पक्षांमध्ये लढत आहे.

 दुसऱ्या टप्प्यातील मतदान २६ एप्रिल रोजी होणार आहे. एकूण ७ टप्प्यात ५४३ जागांसाठी १ जून रोजी मतदान होणार आहे. सर्व जागांचे निकाल ४ जूनला लागणार आहेत.


दोन तासातील मतदानाची टक्केवारी 

1. पश्चिम बंगाल- 15.9%
2. मध्य प्रदेश- 14.12%
3. त्रिपुरा- 13.62
4. मेघालय-12.96
5. उत्तर प्रदेश-12.22
6.छत्तीसगड-12.02
7. आसाम- 11.15%
8. राजस्थान- 10.67
9. जम्मू आणि काश्मीर-10.43
10. उत्तराखंड- 10.41
11. मिझोराम-9.36
12. बिहार- 9.23
13. अंदमान-8.64
14. तामिळनाडू- 8.21
15. नागालँड-7.79
16. मणिपूर-7.63
17. पुडुचेरी- 7.49
18. महाराष्ट्र- 6.98
19. सिक्कीम-6.63
20 लक्षद्वीप-5.59
21. अरुणाचल प्रदेश- 4.95