जगात मराठी लोक दिसतात, पण आपले अधिराज्य नाही : देवेंद्र फडणवीस

Santosh Gaikwad January 28, 2024 09:22 PM


ठाणे,दि.२८ :- मराठी भाषा ही ज्ञानभाषा तर आहेच परंतु तरीही आजच्या काळातील ज्ञानभाषा म्हणून ती परिवर्तित व्हायला हवी. जर्मन, चीन यासारखे देश मातृभाषेचा आग्रह धरीत, त्यांच्या भाषेचा अभिमान बाळगीत त्यांच्या देशातील तज्ञ घडवतात. आपल्याकडेही तसे होणे आवश्यक आहे. जगात सर्वत्र मराठी लोक दिसतात परंतु आपले अधिराज्य नाही. यासाठी सामूहिक प्रयत्नांची गरज आहे. याविषयी स्वतः प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी नवीन शैक्षणिक धोरण आखले असून आता या नव्या शैक्षणिक धोरणानुसार कोणतेही शिक्षण हे मातृभाषेतूनच दिले जाईल, हा निर्णय घेण्यात आला आहे असे प्रतिपादन उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आज नवी मुंबई येथे केले. 


  नवी मुंबई येथील सिडको प्रदर्शन केंद्र या ठिकाणी आयोजित विश्व मराठी संमेलन-२०२४ च्या दुसऱ्या दिवसाच्या सोहळ्याप्रसंगी ते बोलत होते. यावेळी मराठी भाषा व शालेय शिक्षण तथा मुंबई (शहर) पालकमंत्री दीपक केसरकर, आमदार गणेश नाईक,आमदार मंदा म्हात्रे, मुख्यमंत्री कार्यालयाचे अपर मुख्य सचिव भूषण गगराणी, मराठी भाषा विभागाच्या अपर मुख्य सचिव श्रीमती मनीषा पाटणकर-म्हैसकर, मराठी आंतरराष्ट्रीय मंच चे अध्यक्ष डॉ. ज्ञानेश्वर मुळे, राज्य मराठी विकास संस्थेचे संचालक डॉ.शामकांत देवरे आदि मान्यवर उपस्थित होते.


 कवी कुसुमाग्रजांनी मराठी भाषेचे गोडवे गाताना रचलेल्या "रत्नजडित अभंग, ओवी अमृताची सखी..! चारी वर्णातून फिरे, सरस्वतीची पालखी..!! रसरंगात भिजला, येथे शृंगाराचा स्वर..! येथे अहम् ता द्रवली, झाले वसुधेचे घर..!"  या पंक्ती अत्यंत समर्पक असून मराठी भाषेला वैश्विक बनविण्यासाठी सामूहिक प्रयत्नांची आवश्यकता आहे. त्यादृष्टीने मराठी भाषा संवर्धनासाठी हे शासन कटिबद्ध असल्याचे त्यांनी सांगितले. 


  फडणवीस पुढे म्हणाले, मराठी मातीत वैश्विकता आहे. संत ज्ञानेश्वर माऊलींनी सांगितलेला धर्म म्हणजेच महाराष्ट्र धर्म. पसायदानाच्या माध्यमातून सर्वांच्या कल्याणाचा विचार त्यांनी मांडला. हा वैश्विक कल्याणाचा विचार हाच आपला खरा महाराष्ट्र आणि यासोबतच आपली मराठी भाषा आणि संस्कृतीही जोडली गेली आहे. हिंदू हा केवळ धर्मवाचक शब्द नाही तर ती एक जीवन पद्धती आहे. महाराष्ट्राने ही जीवन पद्धती अनादी काळापासून स्वीकारलेली आहे. 

      

 मराठी भाषा सनातनी आहे, शाश्वत आहे. अलीकडेच सुरू झालेल्या मराठी भाषा विद्यापीठाशी मराठी भाषा विषयाशी संबंधित काम करणाऱ्या जगभरातील सर्व संस्थांनी जोडले जावे, अशी अपेक्षा व्यक्त करून ते पुढे म्हणाले की, मराठी भाषा जगातील एक समृद्ध भाषा आहे. या भाषेकडे दुर्लक्ष करून चालणार नाही. या भाषेकडे पूर्वजांचा हजारो वर्षांचा विचारांचा ठेवा आहे आणि हा ठेवा पुढच्या पिढीला देणे, ही काळाची गरज आहे. इंग्रजी व्यवहार भाषा असली तरी आपण आपल्या मुलांशी मात्र मराठीतच बोलायला हवे. प्रमाण भाषा महत्वाची तर आहेच परंतु याचबरोबर बोली भाषेचा गोडवाही जपायला हवा.


   या कार्यक्रमाच्या निमित्ताने आंतरराष्ट्रीय मराठी मंचचे काम करणारे मुख्य समन्वयक डॉ.ज्ञानेश्वर मुळे व विविध देशातील उपसमन्वयकांचा गौरव उपमुख्यमंत्री श्री.फडणवीस यांच्या हस्ते करण्यात आला. या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन सुप्रसिद्ध निवेदिका समिधा गुरू यांनी केले.