मणीपूरमधील महिला अत्याचाराचे विधीमंडळात तीव्र पडसाद : काँग्रेसच्या महिला आमदार आक्रमक, विरोधकांचा सभात्याग

Santosh Gaikwad July 21, 2023 02:51 PM


मुंबई :  मणीपूरमध्ये महिलांची विवस्त्र धिंड काढण्यात आली होती या घटनेचे संसदेत आणि राज्य विधिमंडळाच्या दोन्ही सभागृहात तीव्र पडसाद उमटले. विधानसभेत काँग्रेसच्या महिला सदस्या आक्रमक झाल्या होत्या. मात्र विधानसभा अध्यक्षांकडून चर्चेला परवानगी नाकारल्याने विरोधकांनी सभात्याग केला. तर विधानपरिषदेतही उपसभापतींकडून चर्चेसाठी परवानगी न मिळाल्याने विरोधकांनी घोषणाबाजी करीत गोंधळ घातला. त्यामुळे मणीपूरच्या मुद्दयावरून विधीमंडळात गदारोळ झाला.   


विधीमंडळाच्या पावसाळी अधिवेशनाचा आज पाचवा दिवस आहे. आज मणिपूरमधील महिलांची विवस्त्र धिंड काढल्याचा व्हिडीओ सोशल मिडीयावर व्हायरल झाला आहे त्याच मुद्दयावर विरोधक सभागृहात आक्रमक झाल होते. सुरूवातीलाच विरोधी पक्षातील महिला आमदारांनी मणिपूर घटनेवर चर्चा करण्याची मागणी केली. त्यामुळे सभागृहात गोंधळ झाला. यावेळी विरोधकांनी सरकार विरोधात जोरदार घोषणाबाजी केली. प्रणिती शिंदे, वर्षा गायकवाड आणि यशोमती ठाकूर या मणिपूरच्या मुद्द्यावरून आक्रमक झाल्या. अखेर या प्रकरणावरुन विरोधकांनी सभात्याग केला. मणिपूरच्या घटनेवर सरकार बोलू देत नसल्याचा आरोप करत विरोधी पक्षाने सभात्याग केला. या मुद्द्यावरुन पावसाळी अधिवेशनात दोन्ही सभागृहांमध्ये विरोधक आणि सत्ताधारी यांच्यामध्ये खडाजंगी झाल्याचं पाहायला मिळालं. 


विधानपरिषदेत गोंधळ 

विधानपरिषदेमध्ये मणिपूरच्या मुद्यावरुन विरोधकांनी एकच गोंधळ केला. विधानपरिषदेमध्ये काँग्रेसचे आमदार भाई जगताप यांनी हा मुद्दा उपस्थित केला. तर मणिपूर देशामध्ये आहे की नाही असा सवाल करत विरोधकांनी आक्रमक भूमिका  घेतली.  दरम्यान विधानपरिषदेच्या उपसभापती निलम गोऱ्हे यांनी या चर्चेसाठी परवानगी दिली नसल्याने विरोधकांकडून घोषणाबाजी देखील करण्यात आली. यावर बोलताना निलम गोऱ्हे यांनी म्हटलं की, "मी स्वतः  केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांनी निवेदन दिले आहे. ही घटना गंभीर असून आरोपींना अटक करण्यात आली आहे. त्यामुळे विरोधकांनी या मुद्द्यावरुन राजकारण करु नये असे गो-हे यांनी सांगितले  


विधानसभेत विरोधकांकडून सभात्याग

विधानसभेत मणिपूरचा मुद्दा महिला आमदारांनी उपस्थित करायचा होता. म्हणून काँग्रेसच्या महिला आमदारांनी त्यावर बोलण्यासाठी विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर यांच्याकडे  परवानगी मागितली. पण त्यासाठी विधानसभा अध्यक्षांनी त्यासाठी परवानगी नाकारली. त्यामुळे विधानसभेत मणिपूरच्या मुद्द्यावरुन विरोधकांनी सभात्याग केला. यावर बोलताना विधानसभा अध्यक्षांनी म्हटलं की, 'कोणतीही पूर्व सूचना दिली नसल्यामुळे यावर बोलण्यासाठी परवानगी देता येणार नाही.  तुम्ही अतिशय महत्त्वाचा मुद्दा मांडला आहे. पण तुम्ही नियम पाळला नसल्यामुळे तुम्हाला चर्चा करण्याची परवानगी देणार नाही.' यामुळे आक्रमक होऊन विरोधकांनी सभात्याग केला. 


काँग्रेसच्या महिला आमदार आक्रमक

मणिपूरच्या मुद्द्यावर काँग्रेसच्या महिला आमदार आक्रमक झाल्याचं पाहायला मिळालं. काँग्रेसच्या आमदार प्रणिती शिंदे यांनी म्हटलं की, 'ही भाजप आणि काँग्रेसच्या लोकांसाठी नाही तर संपूर्ण भारतीयांसाठी ही अत्यंत लज्जास्पद आहे. आम्हाला साधं या विषयावर बोलण्याची परवानगी अध्यक्षांनी दिली नाही ही अत्यंत खेदजनक बाब आहे.' तर काँग्रेसच्या नेत्या वर्षा गायकवाड आणि यशोमती ठाकूर यांनी देखील यावर तीव्र नाराजी व्यक्त केली आहे. दरम्यान माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांनी विधानसभा अध्यक्षांना हा मुद्दा उपस्थित करण्यासाठी काय अडचण होती असा सवाल केला आहे. 


 मणिपूरमध्ये राष्ट्रपती राजवट लागू करा

 मणिपूरमधील महिला अत्याचाराच्या घटनेवर केंद्र व मणिपूरमधील भाजपा सरकारचा धिक्कार करत विधानसभेच्या पायऱ्यांवर सकाळी काँग्रेससह विरोधी पक्षांनी आंदोलन केले. यावेळी भाजपा सरकारचा निषेध करण्यात आला व केंद्र व मणिपूर सरकारविरोधात घोषणा देण्यात आल्या. मणिपूरच्या घटनेचा निषेध करत मणिपूरचे अमानवी सरकार बरखास्त करुन राष्ट्रपती राजवट लागू करावी, असा ठराव काँग्रेस विधिमंडळ पक्षाने केला. 


“मणिपूरची घटना माणुसकीला काळीमा फासणारी असून देशभरातून या घटनेचा धिक्कार करण्यात येत आहे. या घटनेवर विधानसभेत ठराव करुन पीडित महिलांना न्याय मिळाला पाहिजे व सरकारचा धिक्कार झाला पाहिजे अशी विरोधकांची मागणी होती. काँग्रेस पक्षाच्या महिला सदस्यांनी चर्चा घेण्याची मागणी लावून धरली परंतु विधानसभा अध्यक्षांनी बोलण्याची संधी दिली नाही. अध्यक्षांनी म्हणणेच ऐकून घेतले नाही त्यामुळे सरकारचा निषेध करुन सभात्याग केला”, अशी माहिती माजी मंत्री वर्षा गायकवाड यांनी दिली.