दादांच्या दादागिरीला भाईंचा लगाम : वड्डेटीवार यांचा टोला !

Santosh Gaikwad August 31, 2023 02:38 PM


मुंबई : अजित पवार यांचा मंत्रिमंडळात समावेश झाल्यापासून शिंदे गट तसेच भाजपमध्ये अस्वस्थता पसरली आहे.  त्यातच अजित पवार यांनी गेल्या  काही दिवसांत बैठका आणि निर्णयांचा धडाका लावताना मुख्यमंत्री आणि भाजप नेत्यांची नाराजी ओढवून घेतली होती. त्यामुळे पवार यांच्या कारभाराला लगाम लावण्याचा निर्णय मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी घेतला असून यापुढे आपल्याकडे येणाऱ्या सर्व महत्त्वाच्या तसेच प्रसंगी वित्त विभागाने नाकारलेल्या फाईल उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या मार्फत आपल्याकडे पाठवाव्यात, असे आदेश शिंदे यांनी प्रशासनास दिले आहेत. त्यामुळे शिंदे फडणवीस यांनी पवारांचे पंख छाटल्याची कुजबुज मंत्रालयात सुरू आहे. त्यातच राज्याचे विरोधी पक्षनेते विजय वड्डेटीवार यांनी एक ट्विट करीत दादांच्या दादागिरीला भाईंचा लगाम असा टोला लगावला आहे. 


राष्ट्रवादीला खिंडार पाडीत अजित पवार हे भाजप शिंदे सरकारमध्ये सामील झाल्यानंतर त्यांना उपमुख्यमंत्री आणि अर्थखात्याची जबाबदारी सोपविली आहे तसेच त्यांच्यासोबत आलेल्या ९ आमदारांना मंत्रीपद देण्यात आले आहे. अजित पवार यांनी गेल्या  काही दिवसांत बैठका आणि निर्णयांचा धडाका लावताना मुख्यमंत्री आणि भाजप नेत्यांची नाराजी ओढवून घेतली आहे. अजित पवारांच्या आक्रमक स्वभावामुळे शिंदे गटातील आमदारांमध्येही नाराजीचा सूर आहे.  

अजित पवार यांच्याकडून फाईल थेट मुख्यमंत्र्यांकडे न जाता फडणवीस यांच्या माध्यमातून जाणार आहे. हा एक प्रकारे अजित पवारांचे पंख छाटण्याचाच प्रयत्न असल्याची कुजबुज मंत्रालयाच्या वर्तुळात सुरू आहे.  


यावर  काँग्रेस नेते आणि विधानसभेतील विरोधी पक्षनेते विजय वडेट्टीवार यांनी ट्वीट करत प्रतिक्रिया दिली आहे. विजय वडेट्टीवार म्हणाले, “दादांच्या दादागिरीला भाईंचा लगाम. अजित पवार मंत्रिमंडळात येऊन दोन महिनेही झाले नाही, पण त्यांच्या दादागिरीने आता ठाण्याच्या भाईंना मैदानात उतरावे लागले. कोणत्याही फाईली, विशेषत वित्त विभागाने नाकारलेले प्रस्ताव हे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या मार्फत मुख्यमंत्र्यांकडे पाठविण्याच्या सूचना मुख्यमंत्र्यांनी केल्या आहेत असे ट्विट वड्डेटीवार यांनी केले आहे.