ठाकरे गटाची मागणी आणि विधानसभा अध्यक्ष लंडनहून मुंबईत दाखल !

Santosh Gaikwad May 15, 2023 04:52 PM


मुंबई : राज्याच्या सत्ता संघर्षावर सुप्रीम कोर्टाने निकाल देताना आमदारांच्या अपात्रतेचा निर्णय विधानसभा अध्यक्षांनी घ्यावा असे आदेश दिले आहेत. मात्र विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर हे विदेश दौ-यावर असल्याने ठाकरे गटाच्या आमदारांनी आज विधानसभेचे उपाध्यक्ष नरहरी झिरवळ यांची भेट घेऊन तातडीने निर्णय घेण्याची मागणी केली होती. ठाकरे गटाच्या या मागणीने खळबळ उडाली होती. मात्र आजच विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर हे लंडनहुन मुंबईत दाखल झाले आहेत. कायद्याच्या तरतुदीनुसार आणि सुप्रिम कोर्टाने दिलेल्या आदेशानुसार योग्य निर्णय घेवू अशी प्रतिक्रिया विधानसभेचे अध्यक्ष राहुल नार्वेकर  यांनी माध्यमांशी बोलताना दिली आहे.


 राज्याच्या सत्तासंघर्षावर सुप्रीम कोर्टानं गेल्या आठवड्यातच निकाल दिला आहे. निकालावेळी सुप्रीम कोर्टाकडून शिंदे सरकार आणि तत्कालीन राज्यपाल कोश्यारी यांच्यावर ताशेरे ओढण्यात आले. शिंदे गटाकडून नियुक्त करण्यात आलेले मुख्य प्रतोत गोगावले यांची नियुक्ती नियमाबाह्य असल्याचं यावेळी न्यायालयानं म्हटलं. त्यानंतर आमदारांच्या अपात्रतेचा निर्णय विधानसभा अध्यक्षांनी घ्यावा असा आदेश न्यायालयानं दिला. विधान सभा अध्यक्ष निर्णय घेणार असल्यानं शिंदे गटाला मोठा दिलासा मिळाला.  मात्र त्यानंतर विधान सभा अध्यक्ष राहुल नार्वेकर हे विदेश दौऱ्यावर गेले होते. आज ठाकरे गटानं विधान सभा उपाध्यक्ष नरहरी झिरवाळ यांची भेट घेत अध्यक्ष भारतात नसल्यानं आमदारांच्या अपात्रतेबाबत आपण निर्णय घ्यावा अशी मागणी केली होती. या मागणीने मोठी खळबळ उडाली होती. मात्र  आता राहुल नार्वेकर हे लंडनहून भारतात परतले आहेत. 


यासंदर्भात बोलताना राहुल नार्वेकरांनी आपली भूमिका मांडली. त्यांनी विमानतळावरून माध्यमांना प्रतिक्रिया दिली आहे. ते म्हणाले की, आमदारांच्या अपात्रेचा निर्णय मीच घेणार असं त्यांनी  माध्यमांशी  बोलताना म्हटलं आहे.  सुप्रिम कोर्टाने दिलेल्या निकालवर आम्ही लवकरात लवकर निर्णय घेण्याचा प्रयत्न करत आहोत. याची प्रक्रिया किचकट आहे. हा निर्णय पुर्ण चौकशी केल्यानंतरच कायद्याच्या तरतुदीनुसार निर्णय घेतला जाणार आहे, कोणत्याही प्रकारची घाई केली जाणार नाही, आणि उशीर देखील केला जाणार नाही. आपण सगळ्यांनी आश्वासित रहा जो निर्णय घेतला जाईल तो कायद्याच्या तरतुदीनुसार आणि सुप्रिम कोर्टाने दिलेल्या आदेशानुसार योग्य निर्णय घेवू अशी प्रतिक्रिया विधानसभेचे अध्यक्ष राहुल नार्वेकर  यांनी दिली आहे.  'मी कोणाच्या मनाप्रमाणे व्हावं म्हणून मी निर्णय घेणार नाही. कायद्याच्या चौकटीत राहून निर्णय घेतले जातील असे नार्वेकर यांनी सांगितलं,