ज्येष्ठ पत्रकार सुजाता आनंदन यांचे निधन

Santosh Gaikwad February 29, 2024 07:29 PM



मुंबई, दि. २९ फेब्रुवारी : ज्येष्ठ पत्रकार, राजकीय विश्लेषक, स्तंभलेखक सुजाता आनंदन यांचे गुरुवारी  निधन झाले. निधनासमयी त्या ६० वर्षाच्या होत्या. सध्या त्या ‘नॅशनल हेरॉल्ड’ वर्तमानपत्राच्या सल्लागार संपादक म्हणून काम पाहात होत्या. १ मार्च रोजी सकाळी साडेनऊच्या सुमारास मूळगाव नागपूर येथील अंबाझरी मोक्षधाम येथे त्यांच्या पार्थिवावर अंत्यसंस्कार करण्यात येणार आहे. त्यामुळे त्यांचे पार्थिव मुंबईहून विमानाने नागपूर येथे नेण्यात आले आहे. सुजाता आनंद यांच्या निधनाने पत्रकारिता, सामाजिक आणि राजकीय अशा सर्वच क्षेत्रात शोककळा पसरली आहे. 


सुजाता आनंदन यांनी नागपूर विद्यापीठातून बीएससी आणि बॅचलर ऑफ जर्नलिझमचे शिक्षण घेतले. १९८५ पासून पत्रकारितेची सुरूवात 'यूएनआय' या वृत्तसंस्थेच्या माध्यमातून केली. त्यानंतर ‘इंडियन एक्स्प्रेस’ ‘आउटलूक’ साप्ताहिक, ‘हिंदुस्तान टाइम्स’ या प्रतिष्ठीत इंग्रजी वृत्तपत्रात त्यांनी काम केले. सध्या त्या ‘नॅशनल हेरॉल्ड’ वर्तमानपत्राच्या सल्लागार संपादक पदावर काम करीत होत्या. महाराष्ट्र आणि मुंबईतील  राजकारणातील संपादनाचे काम ते पाहत होत्या. निर्भिड पत्रकार म्हणूनच त्यांची ओळख होती. वाचनाची त्यांना खूप आवड होती. इंग्रजी भाषेवर त्यांचे प्रभुत्व होते. उदारमतवादी, पुरोगामी आणि धर्मनिरपेक्ष विचारसरणीच्या कट्टर समर्थक होत्या. मूळगाव नागपूर असल्याने भाजपचे नेते केंद्रीय मंत्री नितीन गडकरी, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस त्यांच्याशी त्यांचे चांगले संबध होते. मात्र स्वत:च्या विचारापासून त्यांनी कधीच फारकत घेतली नाही. शिवसेनाप्रमुख स्वर्गीय बाळासाहेब ठाकरेंविषयी त्यांनी सम्राट या आशयाखाली लेख मालिका लिहिली.ती खूपच गाजली होती. अनेक राजकीय नेत्यांचे चरित्र विश्लेषण त्यांनी केले.  ‘नॅशनल हेरॉल्ड’ मधील  लेखनात महाराष्ट्रातील राजकारणाबरोबरच, राष्ट्रीय समस्यांचा विस्तृत समावेश केला. 

ज्येष्ठ पत्रकार राही भिडे यांनी त्यांच्याविषयी बोलताना सांगितले की,  गेल्या ३० ते ३५ वर्षापासून आमच्या दोघींची जिवलग मैत्री  होती. त्यानंतर मैत्रीचे रूपांतर कौटूंबिक संबधात झाले. तिच्या अकाली निधनाची बातमी ऐकून मोठा धक्का बसला.  मी लोकमत मध्ये काम करीत असतानाच पहिल्यांदाचा सुजाताची भेट झाली. त्यानंतर आम्ही दोघींनी एकत्रीत पत्रकारिता केली. ती इंग्रजी भाषेत करायची आणि मी मराठीत बातम्या करायचो. ठिकठिकाणी आम्ही एकत्रीत जायचो आणि बातम्या करायचो.  आम्ही दोघी काम संपल्यावर घरी जायला निघायचो तेव्ही सहकारी पत्रकार नेहमी म्हणायचे दो बिचारे बिना सहारे.. या आठवणींना त्यांनी उजाळा दिला. सुजाता हि  स्पष्टवक्ता स्वभावाची होती. तिला वाचनाची खूप आवड होती. इंग्रजीवर तिचे प्रभुत्व होते. पुस्तक लिहिण्याचे काम सुरू होते पण ते अपूर्ण राहिले आहे. आपल्या कामावर तिची खूप निष्ठा होती. माझया " माध्यमांच्या पटावर " या पुस्तक प्रकाशनाच्या सोहळयात तिने हजेरी लावून भाषणही  केले. काही दिवसांपूर्वीच तिच्याशी फोनवर बोलणे झाले. मात्र तिच्या आवाजावरून वाटलं नाही. ती आजारी आहे. तिच्या निधनाची बातमी ऐकून आमच्या ३५ वर्षाच्या मैत्रीतील सगळया आठवणींना डोळयासमोर तरळल्या. खूपच दु:खदायक, वेदनादायक बातमी आहे असे राही भिडे म्हणाल्या 

प्रदेश काँग्रेस अध्यक्ष नाना पटोले यांनीही शोकभावना व्यक्त केली. सुजाता आनंदन यांनी काँग्रेस पक्षाची ध्येयधोरणे, राष्ट्रवादी कॉंग्रेसचा उदय व बाळासाहेब ठाकरेंच्या शिवसेनेवर विपुल लिखाण केले आहे. तीन दशकांपेक्षा जास्त काळ त्यांनी इंग्रजी वर्तमानपत्रे, साप्ताहिक आणि डिजिटल पोर्टलसाठी काम केले. सुजाता आनंदन यांच्या निधनाने सर्वसामान्यांचे प्रश्न मांडणा-या पुरोगामी विचारसरणीच्या निर्भीड पत्रकाराला आपण गमावले आहे त्यांच्या कुटुंबियांच्या दुःखात सहभागी आहे असे नाना पटोले म्हणाले.