शिक्षकेतर कर्मचाऱ्यांची रिक्त पदे तातडीने भरणार : शिक्षण मंत्री

Santosh Gaikwad February 12, 2024 09:29 PM

मुंबई : संचमान्यता सुधारित करून शिक्षकेतर कर्मचाऱ्यांची रिक्त पदे तातडीने भरण्यात येतील, असे शालेय शिक्षण मंत्री दीपक केसरकर यांनी सांगितले. महाराष्ट्र राज्य माध्यमिक शाळा शिक्षकेतर संघटनांचे महामंडळच्या शिष्टमंडळाने मंत्री केसरकर यांची भेट घेतली. यावेळी त्यांच्या विविध मागण्यांबाबत मंत्री केसरकर यांनी शालेय शिक्षण विभागाला निर्देश देऊन यापूर्वीच कार्यवाही सुरू केल्याबद्दल महामंडळाच्या पदाधिकाऱ्यांनी त्यांचे आभार मानले.

        राज्यातील शिक्षकांची पदभरती प्रक्रिया सुरू झाली आहे. त्याचप्रमाणे संचमान्यता सुधारित करून शिक्षकेतर कर्मचाऱ्यांची रिक्त पदे देखील तातडीने भरण्यात येणार असल्याचे मंत्री श्री.केसरकर यांनी सांगितले. कर्मचाऱ्यांना वाढीव मानधन लागू करण्यात आले आहे. अर्धवेळ ग्रंथपालांचे पूर्णवेळ ग्रंथपालपदी उन्नयन करण्यात आले आहे. शिक्षण सेवकांच्या मानधनात देखील भरघोस वाढ करण्यात आली आहे. अन्य मागण्यांबाबत देखील शासन सकारात्मक असल्याचे मंत्री केसरकर यांनी सांगितले.