डोंगर कापारीतील रहिवासीयांचे कायमस्वरूपी पुनर्वसनासाठी देशव्यापी योजना तयार करा : रामदास आठवलेंची मागणी

Santosh Gaikwad July 23, 2023 07:02 PM


मुंबई दि. २३ : इर्शाळगड दुर्घटनास्थळा रविवारी (दि.२३ जुलै) केंद्रीय सामाजिक न्याय राज्यमंत्री रामदास आठवले यांनी भेट देऊन पाहणी केली. दरड दुर्घटना कायम स्वरूपी टाळण्यासाठी डोंगर कपारीत राहणाऱ्या रहिवासीयांचा देशव्यापी सर्व्हे करून त्यांचे कायमस्वरूपी सुरक्षीतस्थळी पुनर्वसन केले पाहिजे अशी मागणी आठवले यांनी केली. त्यासाठी एखादी नवीन योजना राज्यसरकार आणि केंद्र सरकारच्या समन्वयातून करण्यासाठी आपण प्रयत्न करु असेही आठवले यांनी स्पष्ट केले.


खालापूर मधील इर्शाळगड येथील इर्शाळवाडीवर दरड कोसळून भीषण दुर्घटना घडली.त्यात आतापर्यंत २९ जणांचा मृत्यू झाला असून ढिगाऱ्याखाली अद्याप ५० लोक दबले असल्याची शक्यता आहे. इर्शाळगड वर निमुळता रस्ता असून रस्त्याच्या दोन्ही बाजूला खोल दरी आहे. पाऊस येथे सुरू असून चिखल आणि धुके असल्याने मदतकार्यात अनंत अडचणी निर्माण झाल्या आहेत. त्यामुळे येथे वायरलेस संदेशवर मदतकार्याची माहिती  आठवले यांनी घेतली. त्यावेळी दोन मृतदेह ढिगाऱ्याखालून काढल्याची माहिती एन डी आर एफ च्या जवानांनी दिली. यानंतर  आठवले यांनी इर्शाळगड दरड दुर्घटनाग्रस्तांची पंचायतन मंदिर येथे  सांत्वनपर भेट घेतली. यावेळी रायगड चे जिल्हा पोलीस अधीक्षक सोमनाथ घार्गे  अतिरिक्त तहसीलदार पूनम कदम आदी उपस्थित होते.


आठवले म्हणाले की, इर्शाळगड दरड दुर्घटनाग्रस्तांचे पुनर्वसन करताना त्याना शेती रोजगार आणि घर  देऊन त्यांचे पुनर्वसन करावे. इर्शाळवाडीतील लोकांना डोंगरावरून खाली सुरक्षितस्थळी राहायला यायचे होते. त्यासाठी त्यांनी प्रयत्न केला मात्र वन विभागाची जमीन असल्यामुळे त्यांना परवानगी मिळाली नाही. अशा दरड दुर्घटना कायम स्वरूपी टाळण्यासाठी डोंगर कपारीत राहणाऱ्या रहिवासीयांचा देशव्यापी सर्व्हे करून त्यांचे कायमस्वरूपी सुरक्षीतस्थळी पुनर्वसन केले पाहिजे. डोंगर भागात बहुतेक ठिकाणी वन विभागाची जमीन असते त्या जमिनीवर पुनर्वसन करताना वन विभागाला राज्य सरकार वनविभागाच्या जमिनीच्या मोबदल्यात राज्य सरकारची अन्य  जमीन द्यावी. तशी कायदेशीर तरतूद असून त्यातून अशा दुर्घटनाग्रस्तांचे पुनर्वसन वन विभागाच्या जमीनीवर होऊ शकते.  संपूर्ण देशात डोंगरकपारीवर राहणाऱ्या लोकांचे जीवन सुरक्षित करण्यासाठी त्यांचे सुरक्षित स्थळी पुनर्सवन केले पाहिजे त्यासाठी एखादी नवीन योजना राज्यसरकार आणि केंद्र सरकारच्या समन्वयातून करण्यासाठी आपण प्रयत्न करु.


*रिपब्लिकन पक्षातर्फे ५ लाखाची मदत*


 इर्शाळगड दुर्घटना ग्रस्तांना केंद्र सरकार तर्फे मदत मिळवून देऊ; राज्य सरकार ने  रु.५ लाख मदत केली आहे. रिपब्लिकन पक्षातर्फे  एकूण रु.५ लाख सांत्वनपर मदत आपण करणार असल्याचे  आठवले यांनी जाहीर केले.यावेळी रिपाइं चे नरेंद्र गायकवाड, मुंबई अध्यक्ष सिद्धार्थ कासारे,ज्येष्ठ नेते सुरेश बारशिंग, मोहनिष गायकवाड,संजय डोळसे, आदी अनेक रिपाइं कार्यकर्ते पदाधिकारी उपस्थित होते.