गोळीबारप्रकरणी भाजप आमदार गणपत गायकवाड यांच्यासह दोनजणांना अटक

Santosh Gaikwad February 03, 2024 09:48 AM


कल्याण : कल्याण पूर्वेचे भाजप आमदार गणपत गायकवाड यांनी शिवसेना शिंदे गटाचे शहरप्रमुख महेश गायकवाड यांच्यावर केलेल्या गोळीबार प्रकरणी पोलिसांनी सहा जणांविरेाधात गुन्हा दाखल करण्यात आला असून,  आमदार गायकवाड यांच्यासह हर्षल केणे आणि संदीप सरवणकर यांना अटक करण्यात आली आहे. 


भाजपचे आमदार गणपत गायकवाड यांनी शिंदे गटाचे शहरप्रमुख महेश गायकवाड यांच्यावर गोळीबार केला आहे उल्हासनगर हिललाइन पोलीस ठाण्यातच हा प्रकार घडल्याने खळबळ उडाली आहे.  जखमी महेश गायकवाड आणि त्यांचा मित्र राहुल पाटील यांना ज्युपिटर रुग्णालयात दाखल करण्यात आले असून त्यांच्यावर उपचार सुरू आहे.  विशेष म्हणजे दोघे ही नातेवाईक आहेत.

महेश गायकवाड आणि गणपत गायकवाड यांच्यात अनेक दिवसांपासून वाद सुरू आहे. जन्या वादाच्या प्रकरणातून दोघे ही उल्हासनगर येथील हिललाईन पोलिस ठाण्यात गेले होते. ते वरिष्ठ पोलिस निरीक्षकांशी चर्चा करत असतानाच भाजप आमदार गणपत गायकवाड यांनी थेट महेश गायकवाड यांच्यावर पाच गोळया झाडल्या. या गोळीबारात महेश गायकवाड आणि त्याचे मित्र राहुल पाटील हे जखमी झाले आहेत. 

दरम्यान, गेल्या अनेक दिवसांपासून दोघांमध्ये टोकाचा वाद सुरू आहे   यापूर्वीही त्यांनी जाहीर सभांतून एकमेकांवर आरोप-प्रत्यारोप केले होते. टीका टिप्पणीनंतर एकमेकांची उणीदुणी काढण्यापर्यंत हा वाद पोहोचला होता. आमदार गणपत गायकवाड यांची नार्को टेस्ट नव्हे तर सायको टेस्ट करण्याची गरज आहे, अशी टीकाही शिवसेना शहरप्रमुख महेश गायकवाड यांनी केली होती. मुख्यमंत्र्यांच्या जिल्ह्यात भाजप आणि शिंदे गटात राडा झाल्याने खळबळ उडाली आहे.


मी गोळीबार केला.., गणपत गायकवाड यांची प्रतिक्रिया 

  

या प्रकरणानंतर भाजप आमदार गणपत गायकवाड यांनी प्रतिक्रिया देताना म्हणाले की, "पोलिस  स्टेशनमध्ये माझ्या मुलाला धक्काबुक्की केली. माझ्या जागेचा जबरदस्ती कब्जा घेतला. एकनाथ शिंदे हे महाराष्ट्रात गुन्हेगारांचे राज्य घडवण्याचा प्रयत्न करत आहेत. एकनाथ शिंदे हे मुख्यमंत्री असतील, तर महाराष्ट्रात गुन्हेगारच पैदा होतील. आमच्यासारख्या चांगल्या माणसांना एकनाथ शिंदेंनी गुन्हेगार केलं आहे. माझा मनस्ताप झाला, म्हणून मी फायरिंग केली."

"मी स्वत: पोलिसांसमोर गोळी झाडली. मला याचा पश्चाताप नाही. कारण माझ्या मुलांना जर ते पोलिसांच्या समोर मारत असतील, तर मग मी काय करणार. पोलिसांनी मला पकडलं. त्यामुळेच तो वाचला. मी त्यांना जीवे मारणार नव्हतो. पण पोलिसांच्या समोर जर असं कोणी करत असेल, तर आत्मसंरक्षणासाठी हे करणं गरजेचे आहे. एकनाथ शिंदेंनी असेच गुन्हेगार सर्व ठिकाणी पाळून ठेवले आहेत. मी बऱ्याचदा वरिष्ठांना याबद्दल सांगितलं आहे. माझ्यावर भ्रष्टाचाराचे आरोप केले", असेही गणपत गायकवाड यांनी सांगितले. 

नेमकं काय घडलं?

गायकवाड यांनी घडलेल्या सर्व घटनाक्रमाचीही माहिती दिली. "मी दहा वर्षांपूर्वी एक जागा घेतली. मी त्या जागा मालकांना पैसे दिले. पण त्यांनी सही केली नाही. त्यामुळे आम्ही कोर्टात गेलो. आम्ही केस जिंकलो. त्यानंतर 7/12 जेव्हा आमच्या नावावर झाला, त्यानंतर महेश गायकवाड यांनी जबरदस्ती त्या जागेवर कब्जा केला. मी काही दिवसांपूर्वी याबद्दल त्यांना विनंती केली होती. तुम्ही कोर्टात जाऊन याबद्दल रितसर ऑर्डर आणा, असेही त्यांना सांगितले होते. आज कंपाऊंड तोडून 400 ते 500 लोकांना घेऊन त्यांनी आत प्रवेश केला. माझा मुलगा पोलिस स्टेशनमधून बाहेर जात होता, त्यावेळी त्यांनी धक्काबुक्की केली. मला ते सहन झालं नाही, त्यामुळे मी गोळीबार केला. मला याचा पश्चाताप नाही", असे ते म्हणाले.
-------