ठाकरी तोफ कोणावर धडाडणार? आज पाचोऱ्यात सभा; गुलाबराव सभा उधळणार?

SANTOSH SAKPAL April 23, 2023 08:53 AM

जळगाव : शिवसेना दुभंगल्यानंतर माजी मुख्यमंत्री आणि पक्षप्रमुख उद्धव ठाकरे हे पहिल्यांदाच जळगाव दौऱ्यावर येत आहेत. यानिमित्ताने जोरदार शक्ती प्रदर्शनाची तयारी ठाकरे गटाने केली आहे. पाचोरा येथे रविवारी सायंकाळी ठाकरे यांची जाहीर सभा होणार आहे. त्यांच्या हस्ते निर्मल सीड्सने उभारलेल्या अत्याधुनिक मायकोरायझा लॅबचे उद्घाटन होणार आहे. त्याचबरोबर या लॅबच्या प्रांगणातील माजी आमदार तथा निर्मल सीड्सचे संस्थापकीय अध्यक्ष स्व. आर ओ. (तात्या) पाटील यांच्या पूर्णाकृती पुतळ्याचे अनावरणही करण्यात येणार आहे. यानंतर त्यांची जाहीर सभा येथे होणार आहे.


सध्या या सेभेची जोरदार तयारी करण्यात आली आहे. तर सभेला दीड लाखांची उपस्थिती राहील, असा अंदाज वर्तवण्यात येत आहे. तर ठाकरे यांच्या दौऱ्यानिमित्त शिवसैनिकांमधील आनंद व उत्साह शिगेला पोहोचला आहे.


यापूर्वी खेड, मालेगाव येथे उद्धव ठाकरेंच्या जाहीर सभा झाल्या आहेत. या सभांमधून उद्धव ठाकरेंनी राज्य सरकारला चांगलेच घेरले होते. महागाई, बेरोजगारीसह शेतकऱ्यांच्या मुद्द्यावरुन भाजप-शिंदे सरकारवर निशाणा साधला होता. विशेष म्हणजे याच सभांमधून त्यांनी शिंदे गटासह भाजप नेत्यांचा समाचार घेतला होता. त्यामुळे आज होणाऱ्या जळगावच्या पाचोऱ्यातील सभेतून उद्धव ठाकरेंची तोफ कुणावर धडाडणार हे पाहणे आता महत्त्वाचे ठरणार आहे. तर दुसरीकडे शिंदे गटाचे मंत्री गुलाबराव पाटीलयांच्या समर्थकांनी सभा उधळून लावण्याचा इशारा दिला आहे. 


उद्धव ठाकरेंची तिसरी मोठी सभा आज जळगावच्या पाचोऱ्यात होत आहे. या सभेसाठी ठाकरे गटाकडून जोरदार तयारी करण्यात आली आहे. विशेष म्हणजे ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत कालच सभास्थळी दाखल झाले होते. तर राऊत यांच्यासह ठाकरे गटातील अनेक महत्वाच्या नेत्यांनी देखील आज होणाऱ्या सभास्थळाची पाहणी केली आहे. विशेष म्हणजे आज होणाऱ्या या सभेमुळे ठाकरे गटाच्या पदाधिकाऱ्यांसह कार्यकर्त्यांचा उत्साह आता वाढला आहे. त्यामुळे आजच्या या सभेतून उद्धव ठाकरे कुणावर 'बाण' सोडणार हे पाहणं महत्वाचं ठरणार आहे.