उद्धव ठाकरेंचं काही कर्तृत्व नव्हतं!:एकनाथ शिंदेंचा आरोप; म्हणाले, राज यांचे कौतुक केले तर लगेच आनंद दिघेंचे पंख छाटले गेले

Santosh Sakpal October 24, 2023 10:34 PM

“माझ्या शरीरात रक्ताचा शेवटचा थेंब असेपर्यंत…”, मराठा आरक्षणासंदर्भात शिंदेंचं मोठं वक्तव्य; घेतली शिवरायांची शपथ

 
Eknath Shinde Maratha
मुंबई : मराठा आंदोलक मनोज जरांगे पाटील यांनी सरकारला मराठा आरक्षणासाठी ४० दिवसांचा अवधी दिला होता. या अल्टिमेटमचा आजचा शेवटचा दिवस होता. दिवसभर सरकारकडून मनोज जरांगे पाटलांना कोणतंही निवेदन देण्यात आलं नाही. त्यामुळे सगळ्यांच्या नजरा आज होणाऱ्या दसरा मेळाव्याकडे होत्या. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी मराठा आंदोलनाचा उल्लेख त्यांच्या भाषणात तर केला, परंतु, मनोज जरांगे पाटलांना अपेक्षित असलेला निर्णय सरकारने दिला नाही.

मुख्यमंत्री एकनाथ शिंदे म्हणाले की, “मी सर्वसामान्य मराठा कुटुंबातील आहे. मला त्यांचे दुःख – वेदना कळतात. मलाही त्यांची जाणीव आहे. जस्टिस शिंदे यांची समिती खूप काम करतेय. ही समिती २४ बाय ७ काम करतेय. पुनर्विचार याचिका दाखल झाली आहे. एक विंडो ओपन झाली आहे. म्हणून कोणावरही अन्याय न करता, कोणाचंही आरक्षण काढून न घेता, मराठा समाजाला टिकणारं आरक्षण हे सरकार देणार म्हणजे देणार. या एकनाथ शिंदेच्या शरीरामध्ये रक्ताचा शेवटचा थेंब असेपर्यंत मराठा समाजासाठी लढणार. इतर कोणावरही अन्याय न करता आरक्षण देणार. कारण हे सगळे आपले आहेत.”

“शिवरायांची शपथ घेऊन सांगतो, मी तिथे जाऊन त्यांच्यासमोर जाऊन नतमस्तक होतो”, असं म्हणत मुख्यमंत्री एकनाथ शिंदे हे छत्रपती शिवाजी महाराज यांच्या प्रतिमेजवळ गेले. तिथे त्यांनी महाराजांना अभिवादन केलं. आणि पुन्हा भाषणस्थळी येऊन मराठ्यांना आरक्षण देणारच असा विश्वास दिला.

“मी आपल्याला विनंती करतो की टोकाचं पाऊल उचलू नका. आत्महत्या करू नका. आपल्या कुटुंबाला वाऱ्यावर सोडू नका. आपल्या मागे मुला-बाळांचा विचार करा. हे सरकार तुमचं आहे. देवेंद्र फडणवीस मुख्यमंत्री होते तेव्हा त्यांनी आरक्षण देण्याचं काम केलं. हायकोर्टात हे आरक्षण टिकलं, पण सर्वोच्च न्यायालयात टिकलं नाही. ते का टिकलं नाही त्यावर मी आता बोलू इच्छित नाही. आपल्यासाठी सरकार आहे. मराठा समाजाला आरक्षण देण्यास हे सरकार कटिबद्ध आहे. धनगर, मराठा, ओबीसी, धनगर, कुणबी, आदिवासी यांच्यात द्वेष, लढाई आहे. राज्यात अशांतता पसरवण्याचं काम काही जण करत आहेत. त्यांच्या हातात कोलीत देणार का? काहींना वाटतंय की एकनाथ शिंदेंचं मुख्यमंत्री पद अडचणीत आणू. हा गरीब माणूस मुख्यमंत्री झाला कसा? पण मी एक सांगू इच्छितो की मला या गोर-गरीब जनतेपेक्षा मुख्यमंत्री पद महत्त्वाचं नाही”, असं एकनाथ शिंदे म्हणाले.

सरकारच्या या भूमिकेवर मराठा आंदोलक मनोज जरांगे पाटील काय प्रतिक्रिया देतात हे पाहावं लागणार आहे.

 
 

“…त्यानंतर लगेच आनंद दिघेंचे पंख छाटण्याचे काम सुरू झाले”, एकनाथ शिंदेंचा उद्धव ठाकरेंवर आरोप

 

मुख्यमंत्री एकनाथ शिंदे म्हणाले की, यांचं (उद्धव ठाकरे) काही कर्तृत्व नव्हतं. पण राज ठाकरे प्रचंड मेहनत करायचे, त्यामुळे आनंद दिघे यांनी एका बैठकीत राज ठाकरे यांचं कौतुक केलं. यानंतर आनंद दिघे यांचे पंख छाटण्याचं काम सुरू झाले. असा दावा एकनाथ शिंदे यांनी केला. तसेच आनंद दिघे यांना ज्या-ज्या पद्धतीने वागवलं, त्याचा मी स्वत: साक्षीदार आहे, असे म्हणत त्यांनी घणाघात केला.

शिंदे म्हणाले की, आनंद दिघे साहेबांच्या अंत्ययात्रेलाही हे आले नाहीत. आम्हीच त्यांची सगळ्यात मोठी समाधी बांधली. या समाधीला भेटदेखील दिली नाही. मी जेव्हा त्यांना (उद्धव ठाकरे) भेटायला गेलो, तेव्हा त्यांनी मला विचारलं, आनंद दिघेंची संपत्ती कुठे कुठे आहे? अरे तो फकीर माणूस होता. त्यांच्याकडे काय संपत्ती असणार', असा बोलत शिंदेंनी ठाकरेंवर निशाणा साधला.

“मर्द आहात हे सांगावं का लागतं?”, एकनाथ शिंदेंचा ठाकरेंना थेट सवाल

“म्हणून मी एवढंच सांगतो की ते छाती बडवतात की मर्द आहोत, मर्द आहोत. मग मर्द आहोत हे सांगावं का लागतं? ही सभा बाळासाहेबांच्या शिवसैनिक मर्दांची आहे. तिकडे आहे ती हुजरे आणि कारकुनांची आहे”, अशी टीकाही त्यांनी केली.

यांना खोके नाही, कंटेनर लागतो

“रक्ताचं नातं सांगण्याऱ्यांनी बाळासाहेबांच्या विचारांचा गळा घोटला. त्यांची बांधिलकी फक्त पैशांशी. त्यांनी कोणतीही सीमा ठेवली नाही. निर्लज्जपणाचा कळस गाठला. आपल्याला शिवसेना आणि धनुष्यबाण अधिकृतपणे दिल्यानंतर शिवेसनेच्या खात्यातील ५० कोटी रुपये बँकेकडे मागितले. बँकेने नकार दिला. बँक म्हणाली निवडणूक आयोगाने शिवसेना एकनाथ शिंदेना दिली आहे. त्यांनी निर्लज्जपणे आम्हाला पत्र पाठवले. तुम्ही आमच्यावर ५० खोक्यांवर आरोप करता आणि ५० खोके आमच्याकडे मागता. या एकनाथ शिंदेंनी क्षणाचाही विलंब न लावता ५० कोटी द्यायला लावले. मी सांगितलं यांचं प्रेम बाळासाहेब, विचारांवर नाही. पण खोके आणि ओके मी बोलणार नाही. कारण खोके त्यांना पुरत नाहीत. त्यांना जवळून ओळखणारे म्हणाले की यांना खोके चालत नाही, यांना कंटेनर पाहिजे. त्याचा साक्षीदार माझ्यापेक्षा दुसरा कोण असू शकतो.योग्य वेळेला बोलेन, असंही एकनाथ शिंदे म्हणाले.

बाळासाहेबांचं स्वप्न मोदींनी पूर्ण केलं

इंडिया आघाडी या दहा तोंडी रावणाचं दहन केल्याशिवाय राहणार नाही. महाराष्ट्रात ४८ पैकी ४५ जागा आपण देणार आणि मोदींना बळकटी देणार. बाळासाहेब म्हणाले होते की एकदिवस मला पंतप्रधान बनवा, मी राममंदिर बांधतो आणि कश्मीरमधील ३७० कलम हटवतो. आता मोदींनी राम मंदिर बांधलं आणि काश्मीरमधील ३७० कलम हटवलं. मोदींनी मंदिरही बनवलं आणि तारीखही सांगितली आणि आपल्या सर्वांना उद्घाटनाला जायचं आहे. विरोधक कोणत्या तोंडाने जातील माहीत नाही. मोदींच्या हात बळकट करण्यासाठी महाराष्ट्र त्यांच्यापाठीमागे उभा राहील, असंही एकनाथ शिंदे म्हणाले.