ठाण्यात नाटयगृह आम्ही बांधल, नाटकं दुसरं करताहेत : उध्दव ठाकरेंची एकनाथ शिंदेंवर टीका

Santosh Gaikwad July 29, 2023 10:59 PM

ठाणे : ठाण्यातील गडकरी रंगायतनमध्ये आज ठाकरे गटाच्या वतीने उत्तर भारतीयांच्या मेळावा पार पडला. माजी मुख्यमंत्री पक्षप्रमुख उध्दव ठाकरे यांनी  या मेळाव्याला संबोधित केले. मुख्यमंत्री एकनाथ शिंदेच्या बालेकिल्ल्यात ठाकरे यांनी शिंदेसह पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यावर निशाणा साधीत जोरदार टीका केली.  


ठाकरे म्हणाले, ठाण्यात नाट्यगृह नव्हतं ही बाब बाळासाहेब ठाकरे यांना सांगितली गेली. त्यावेळी त्यांनी उपस्थित  जनसमुदायाला सांगितलं की, सत्ता द्या मी तु्म्हाला नाट्यगृह देतो. सत्ता आली आणि गडकरी रंगायतन नाट्यगृह तयार झालं. आम्ही नाट्यगृह दिलं पण नाटक काही लोक करत आहेत. आज हा जोश बघून काही लोकांची झोप नक्कीच उडाली असेल आणि उडाली पण पाहीजे. काही जणांना वाटतं मी म्हणजे ठाणे..पण तसं काही नाही. ठाणे आणि शिवसेना यांचं नातं आहे..ते पण खरी शिवसेना.. खरी शिवसेना यासाठी संबोधलं कारण मार्केटमध्ये चायनीज माल पण येतो. मालच नाही देवाच्या मूर्तीही येतात. असेच काही चायनीज बनावट लोक बोगस..गद्दार..स्वत:ला समजतात की मी शिवसेनेहून वर आहे. पण तू इतक्या वर जाऊ शकत नाही. त्याच्या वर गेलं तर परत येणार नाही अशी बोचरी टीका त्यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यावर केली. 


उध्दव ठाकरे म्हणाले की, मी काँग्रेससोबत गेलो. खुलेआम गेलो. अर्ध्या रात्रीत लपून छपून मिटींग नाही केली. मी त्यांना एक प्रश्न विचारू इच्छितो की, आम्हाला काँग्रेससोबत जाण्याची वेळ कोणी आणली. भाजपासोबत आम्ही 25 वर्षे होतो. हिंदुत्वासाठी ही आमची मजबूत युती होती. ही युती कोणी तोडली. भाजपाने ही युती तोडली. युती तोडल्यावर भाजपला वाटलं की माझया गळयात पट्टा घालता येईल. पण माझया गळयात पट्टा घालणारा अजून जन्माला आलेला नाही, आणि होणारही नाही. कारण बाळासाहेबांचं रक्त माझया अंगात आहे. मी कधीच लाचार होणार नाही. कधीच गुलाम होणार नाही. मी फक्त तुमच्यासमोर झुकेन, पण हुकूमशाहीपुढे कधीच झुकणार नाही अशा शब्दात उध्दव ठाकरे यांनी भाजपवर निशाणा साधला. जे भेदाभेद करतात त्याला हिंदुत्व म्हणत नाहीत त्याला चाणक्य नीती म्हटलं जाऊ शकत नाही ती कूटनिती आहे आणि काहीजण स्वार्थासाठी ते करत आहेत अशा शब्दात त्यांनी देवेंद्र फडणवीस यांच्यावरही निशाणा साधला.


राष्ट्रपती महिला आहेत, काय करत आहेत? मी महामहीम राष्ट्रपतींना विचारु इच्छितो, राष्ट्रपती महोदया तुम्ही ज्या राष्ट्रपती आहेत त्या देशातील महिलांची आब्रू भर रस्त्यावर लुटली जात आहे. आपल्याला काही संवेदना नाहीत का?", असा सवाल उद्धव ठाकरे यांनी केला. दु:खाची गोष्ट तर हीच आहे की, द्रौपदीचं वस्त्रहरण झालं तेव्हा तिथे ध्रुतराष्ट्र राजा बसले होते. त्यांना दृष्टी नव्हती. आजचं सरकार जे बसलं आहे ते ध्रुतराष्ट्र आहे. आपल्याही देशात दोन महिलांसोबत जे केलं ते व्हिडीओमुळे समोर आलं. तिथले मुख्यमंत्री म्हणत आहेत की, अशा घटना भरपूर घडल्या आहेत. अरे लाज वाटली पाहिजे, अशा शब्दांत उद्धव ठाकरे यांनी केंद्र सरकारला सुनावलं.

 

मोदींना सवाल 


मी विरोधी पक्षांची एकजूट मानत नाही तर ज्या सर्व पक्षांची एकजूट झालीय तिचं नाव इंडिया आहे. पण इंडियावरही त्यांनी टीका केली. त्यांनी इंडिया मुजाहीद्दीन म्हणत टीका केली. मग  पंतप्रधान एक-दोन दिवसात महाराष्ट्रात येणार आहेत. गद्दारांसोबत बसणार आहेत. त्यांचा सत्कार करणार आहेत. हेच आपलं हिंदुत्व आहे?, असा सवाल उद्धव ठाकरे यांनी केला.


काहींना लवकरच ठाणे सोडून पळावे लागेल : संजय राऊत 


ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांनी यावेळी मुख्यमंत्री शिंदे यांच्यावर टीका केली. काही लोकांना लवकरच ठाणे सोडून पळून जावे लागणार आहे, अशी अप्रत्यक्षपणे टीका संजय राऊतांनी एकनाथ शिंदेंवर केली आहे. राऊत म्हणाले की, ज्या शहराने शिवसेनेला सर्वात आगोदर सत्ता दिली ते ठाणे शहर आहे. गडकरी रंगायतने यापूर्वी खूप प्रेम दिलं आहे, आजही तिच निष्ठा दिसून येतेय. हे वातावरण बघून काही लोकांना लवकरच ठाणे सोडून जावं लागेल, असं दिसतंय. राऊत पुढे म्हणाले की, आम्ही येथे येणार आणि येतच राहणार आहोत. कारण ठाणे शहर आमचं आहे. हम ताज बदलेंगे... गद्दारोंका राज बदलेंगे.. हा संदेश ठाण्यातून देणं गरजेचं होतं. म्हणून आम्ही ठाण्यात आलेलो आहोत. कारण ठाणे हे मर्दांचं शहर आहे. ''स्व. आनंद दिघेंकडे पाहून आम्हांला हिंमत यायची. ते बाळासाहेब ठाकरेंच्या खांद्याला खांदा लावून उभं राहिलेलं आम्ही पाहिलेलं आहे. परंतु आज परिस्थिती वेगळी आहे. संकट आल्यानंतर पळून जातो तो नामर्द असतो, आमची ही मर्दांची फौज आहे. म्हणून इथे आलीय.'' असं म्हणून राऊतांनी पुन्हा एकदा शिंदे गटाला टार्गेट केलं.