बुलढाणा अपघाताने महाराष्ट्र हळहळला : वेगमर्यादेवर नियंत्रण हवे !

Santosh Gaikwad 20, 7-01 01:27 PM


मुंबई:  समृद्धी महामार्गावर बुलढाणा येथे विदर्भ ट्रॅव्हल्सचा शुक्रवारी मध्यरात्रीच्या सुमारास झालेल्या  भीषण अपघाताने  महाराष्ट्र हळहळला आहे. या भीषण अपघातावर माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे, राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी प्रतिक्रिया देत मृतांना श्रध्दांजली अर्पण केली आहे. गेल्या अनेक दिवसांपासून समृध्दी महामार्गावर अपघातांचे प्रमाण वाढल्याने यावर राज्य सरकारकडून तातडीने उपाययोजना कराव्यात तसेच वेगमर्यादेवर नियंत्रण हवे अशी मागणी होत आहे. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे व उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी अपघातस्थळी जाऊन पाहणी केली आहे.


भविष्यात जे काही आवश्यक असेल, ते सर्व केलं जाईल : एकनाथ शिंदे  


घटनास्थळाची पाहणी केल्यानंतर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी प्रसारमाध्यमांशी संवाद साधला आहे. यावेळी एकनाथ शिंदे म्हणाले, “आज सकाळपासूनच आम्ही जिल्हाधिकारी आणि इतर पोलीस अधिकाऱ्यांच्या संपर्कात होतो. घटनास्थळी प्रत्यक्ष पाहणी केल्यानंतर त्याची भीषणता लक्षात येते. रात्री दीडच्या सुमारास ही दुर्घटना घडली आहे. धावती बस खांबाला धडकून डिझेलच्या टाकीचा स्फोट झाला, त्यांनतर बसला आग लागली, असं प्रत्यक्षदर्शी सांगत आहेत. रिपोर्टमध्येही तेच नमूद केलं आहे. ही मोठी दु:खद घटना आहे. या घटनेचं गांभीर्य लक्षात घेऊन आम्ही घटनास्थळी दाखल झालो. समृद्धी महामार्गावरील वाढते अपघात लक्षात घेता, भविष्यात जे काही आवश्यक असेल, ते सर्व केलं जाईल, अशी प्रतिक्रिया एकनाथ शिंदे यांनी दिली.


आता तरी सरकारचे डोळे उघडावेत : उध्दव ठाकरे  

उद्धव ठाकरे म्हणाले, 'बुलढाणा येथे समृद्धी महामार्गावर एका बसला भीषण अपघात होऊन त्यात २६ जणांचा दुर्दैवी अंत झाला. हे वृत मन हेलावणारे आहे. गेल्या वर्षभरात या महामार्गावर असे अपघात सुरूच आहेत. आता पर्यंत ३०० हून जास्त प्रवासी त्यात मरण पावले. सरकारने अपघात टाळण्यासाठी काहीच उपाय योजना केल्या नाहीत. बुलढाण्यातील अपघाताने तरी सरकारचे डोळे उघडावेत. अपघातात जीव गमावलेल्या अभागी जीवांना मी श्रद्धांजली अर्पण करीत आहे, असे उद्धव ठाकरे म्हणाले.


शरद पवारांनी केली होती चिंता व्यक्त  

शरद पवार यांनी ट्विट करत बुलढाणातील  मृतांना श्रद्धांजली वाहिली आहे. 'या दुर्दैवी घटनेमुळे समृद्धी महामार्गावरील खासगी वाहनांच्या वेगमर्यादेचा प्रश्न उपस्थित होत असून याबाबत राज्य सरकारने गंभीर दखल घेत त्वरित उपाययोजना करायला हव्यात. एक आठवड्यापूर्वीच संबंधित विभागाकडून होत असलेल्या अपघातांची आकडेवारी मागवून चिंता व्यक्त केली होती. अपघात रोखण्याच्या दृष्टीने तातडीच्या उपाययोजना कराव्यात असे सुचवले होते, असे शरद पवार म्हणाले.


बेदरकारीने गाड्या चालवण्यावर चाप बसवायलाच हवा :  राज ठाकरे 

बुलढाणा जिल्ह्यात समृद्धी महामार्गावर खाजगी ट्रॅव्हल बसला झालेल्या अपघाताची दुर्घटना अतिशय भीषण आहे. या अपघातात मृत्यू पावलेल्या दुर्दैवी व्यक्तींना भावपूर्ण श्रद्धांजली. त्यांच्या कुटुंबियांच्या दुःखात महाराष्ट्र नवनिर्माण सेना सहभागी आहे. महामार्गांवर अपघातांचं प्रमाण दिवसेंदिवस वाढत आहे. खाजगी ट्रॅव्हल्सच्या गाड्यांचे ड्रायव्हर्स आणि ट्र्क ड्रायव्हर तर कमालीच्या बेदरकारीने गाड्या चालवतात. ह्यांच्यावर चाप बसवायलाच हवा. अशा अपघातांच्या घटना परत कधीच होणार नाहीत ह्यासाठी आता प्रयत्न व्हायलाच हवेत.


समृद्धी महामार्गाला अनेकांचे शाप : संजय राऊत  

ठाकरे पक्षाचे खासदार संजय राऊत म्हणाले, समृद्धी महामार्ग शापित महामार्ग झाला आहे. तो शापित का झाला याच्या खोलात जावं लागेल. तो महामार्ग बनवण्यासाठी सरकारने मनमानी केली. याबाबत अनेक गोष्टी आहेत. त्या भविष्यात समोर येतील, पण दुर्दैवाने त्या रस्त्यावर वारंवार अपघात होत आहेत, वारंवार मृत्यू होत आहेत. हे काही चांगलं नाही. कितीवेळा श्रद्धांजल्या वाहायच्या. आम्ही अनेकदा समृद्धी महामार्गावरील वेगमर्यादेची मागणी केली आहे. त्याविषयी काहीच होत नाही. तो रस्ता भ्रष्टाचारातून तयार झाला आहे. त्या रस्त्यासाठी अनेकांच्या जमिनी हडप करण्यात आल्या. जबरदस्तीने जमिनी घेण्यात आल्या. त्या रस्त्याला अनेकांचे शाप आहेत आणि त्या रस्त्यात मला अनेकांचे अश्रू दिसत आहेत असं मत संजय राऊत यांनी व्यक्त केलं.