प्रशासकीय इमारतीचे आराखडे करताना ५० वर्षाचा विचार करा - अजित पवार यांचे निर्देश

Santosh Gaikwad November 25, 2023 06:22 PM

 पुणे, दि.26:  प्रशासकीय इमारतीचे आराखडे करतांना आगामी ५० वर्षाचा सर्वांगीण विचार करता एकही शासकीय कार्यालय भाड्याच्या जागेत राहणार नाही यादृष्टीने नवीन इमारतीचे आराखडे तयार करा, असे निर्देश उपमुख्यमंत्री तथा जिल्ह्याचे पालकमंत्री अजित पवार यांनी शहरातील विविध विकासकामांच्या पाहणी दौऱ्याच्यावेळी दिले.


यावेळी सहकार आयुक्त अनिल कवडे, कृषी आयुक्त प्रवीण गेडाम, शिक्षण आयुक्त सूरज मांढरे, जिल्हाधिकारी डॉ. राजेश देशमुख, छत्रपती शाहू महाराज संशोधन, प्रशिक्षण व मानव विकास संस्थेचे व्यवस्थापकीय संचालक अशोक काकडे, सार्वजनिक बांधकाम विभागाचे मुख्य अभियंता अतुल चव्हाण, अधीक्षक अभियंता बाप्पा बहिर, अपर कामगार आयुक्त शैलेश पोळ आदी उपस्थित होते.


विकास कामांची पाहणी  करताना उपमुख्यमंत्री पवार यांनी संबंधित अधिकाऱ्यांकडून कामाबाबत माहिती घेतली. महाराष्ट्र राज्याची निर्मिती झाल्यानंतर काळानुरुप गरजेनुसार विभागीय आयुक्त, जिल्हाधिकारी कार्यालय, जिल्हा परिषद, पुणे व पिंपरी चिंचवड महानगरपालिकेची विस्तारित इमारत आदी शासकीय इमारतीचे काम नव्याने पूर्ण करण्यात आले आहेत. नोंदणी भवन, शिक्षण भवन, कृषी भवन, सहकार भवन, कामगार भवन आदी इमारतींचे काम सुरु आहेत तर काही इमारतींच्या कामांच्या प्रशासकीय व तांत्रिक मान्यताही देण्यात आल्या आहेत.


आगामी काळातही विविध शासकीय इमारती नव्याने बांधण्याचे काम हाती घेण्यात येणार आहेत. प्रशासकीय इमारतीचे आराखडे तयार करताना संबंधित विभाग प्रमुखाला विश्वासात घेऊनच आराखडे तयार करावेत. आराखड्यात प्रामुख्याने वीज, वाहनतळ, अग्निशमन यंत्रणा या बाबतीत सुरक्षितेच्यादृष्टीने अत्याधुनिक तंत्रज्ञानाचा समावेश करा. यासाठी नामांकित, कामे दर्जेदार व वेळेत पूर्ण करणाऱ्या कंत्राटदारांची नेमणूक करावी.