BMC निवडणूक अन फडणवीसांची खेळी :. मुंबईकर झोपडीधारकांना मिळणार अवघ्या अडीच लाखात घर !

Santosh Gaikwad May 25, 2023 10:51 PM


मुंबई : मुंबई महानगरपालिका काबीज करण्यासाठी भाजपकडून जोरदार प्रयत्न सुरू आहेत. देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी गृहमंत्री अमित शहा आणि भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष जे पी नड्डया यांचे मुंबई दौरे वाढले आहेत. यातच आता राज्य सरकारने एक महत्वाचा निर्णय घेतला आहे. मुंबईकर झोपडीधारकांना अवघ्या 2 लाख 50 हजार रुपयांमध्ये घर मिळणार आहे. मुंबईकरांना प्रधानमंत्री आवास योजनेचा लाभ घेता येणार आहे. त्यामुळे मुंबईकरांवर आर्थिक भार पडणार नाही, अशी माहिती राज्याचे गृहनिर्माण मंत्री आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिली. मात्र निवडणुकीच्या तोंडावर फडणवीसांची नवी खेळी असल्याचे बोललं जात आहे. 


महाराष्ट्रात मागील वर्षी झालेल्या सत्तांतरानंतर मुंबई महापालिका ताब्यात घेण्यासाठी भाजप आणि मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वाखालील बाळासाहेबांची शिवसेना या पक्षांकडून जोरदार प्रयत्न सुरू आहेत.  यासाठी सत्ताधाऱ्यांकडून मुंबई शहरात सुशोभीकरणाचं काम केलं जात आहे. शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे या पक्षाचे प्रमुख उद्धव ठाकरे यांना मुख्यमंत्रिपदावरून पायउतार केल्यानंतर त्यांच्या पक्षाच्या ताब्यात गेल्या अनेक दशकांपासून असलेली मुंबई महानगरपालिकेची सत्ता हिसकावून घेण्यासाठी भाजप-शिंदे गटाकडून जोरदार प्रयत्न सुरू आहेत. यासाठीच शहरातील रस्ते खड्डेमुक्त करतानाच पूल, फूटपाथ, उद्याने, समुद्रकिनाऱ्यांची स्वच्छता, रंगरंगोटी, विद्युत सुशोभीकरणासाठी मुख्यमंत्र्यांकडून पालिकेचा सूचना करण्यात आल्या होत्या. त्यानंतर आता देवेंद्र फडणवीस यांनी झोपडपट्टीधारकांना दिलासा देणारा निर्णय घेतला आहे. १ जानेवारी २००० ते १ जानेवारी २०११ या कालावधीतील झोपडपट्टीधारकांना अडीच लाख रुपये भरून मुंबईत घर मिळू शकणार आहे. त्यामुळे गेल्या अनेक वर्षांपासून हक्काच्या घराच्या प्रतिक्षेत असणाऱ्या नागरिकांना दिलासा मिळाला आहे.

 

काय म्हणाले देवेंद्र फडणवीस...

2000 पर्यंतच्या झोपडपट्टीधारकांना नि:शुल्क घरे आपण देत होतो. मी मुख्यमंत्री असताना 2018 मध्ये एक कायदा करुन 2011 पर्यंतच्या झोपडपट्ट्यांना संरक्षण देण्याचा निर्णय घेतला. पण, न्यायालयाच्या निर्णयाप्रमाणे त्यांना हे लाभ सशुल्क देण्याचाच पर्याय होता. त्यामुळे त्याचे दर आता निश्चित करण्यात आले आहेत. आता 2011 पर्यंतच्या झोपडपट्टीधारकांना केवळ ₹2.5 लाखात घर मिळणार आहे. याशिवाय, प्रधानमंत्री आवास योजनेचाही लाभ मिळणार असल्याने फारसा भार त्यांच्यावर येणार नाही. मुख्यमंत्री एकनाथराव शिदेंच्या नेतृत्त्वात आमचे सरकार समाजातील प्रत्येक घटकाच्या विकासासाठी कटिबद्ध आहे.