मुलीच्या संरक्षणासाठी धावून आला सुरक्षारक्षक : सहाय्यक पोलीस आयुक्ताकडून कौतुक

Santosh Gaikwad February 02, 2024 10:30 PM


रमेश औताडे , मुंबई 

मुंबई : आजही शहरात महिला, मुली असुरक्षित आहेत. याचे जिवंत उदाहरण म्हणजे विक्रोळी येथे घडलेली एक दुर्देवी घटना होय. रस्त्यावरून जाणाऱ्या एका मुलीला एका पुरुषाने अतिप्रसंग करण्याचा प्रयत्न केला असता त्या नराधमाला एका सुरक्षा रक्षकाने आपल्या कर्तव्याचा हिसका दाखवत त्या मुलीला सुरक्षित केले. या घटनेमुळे महाराष्ट्र शासन स्थापित सुरक्षा रक्षक मंडळातील सुरक्षा रक्षक समीर कोळवणकर यांचे सहाय्यक पोलीस आयुक्त किशोर उतळे यांनी प्रशंसापत्र देऊन अभिनंदन केले.


सुरक्षा रक्षक समीर कोळवणकर कामावरून घरी बस ने  निघाले होते. कन्नमवार नगर विक्रोळी स्टेशनवरीन जाणारी बेस्ट बस कन्नमवार नगरच्या दिशेने जात असताना टागोर नगरला जाणाऱ्या रस्त्यावरील बस स्टॉप जवळ एक विकृत पुरुष रस्त्यावरून चालणाऱ्या एका २५ वर्षीय मुलीला पाहून लैंगिक चाळे करून  हावभाव करत असताना ती मुलगी घाबरून पळू लागली. तो तिला पकडायला धावला त्यावेळेस सुरक्षा रक्षक समीर कोळवणकर यांनी  प्रसंगावधान दाखवत  त्या मुलीचे संरक्षण केले. पुढील गंभीर घटना कोळवणकर यांच्यामुळे टळली. ही घटना त्यांनी सोशल मीडियावर टाकली होती. तसेच विक्रोळी पोलिस स्टेशनमध्ये आणि डीसीपी ऑफिसला जाऊन लेखी सूचना केली होती. या प्रकरणाची दखल सहाय्यक पोलीस आयुक्त किशोर उतळे यांनी घेत सुरक्षा रक्षक कोळवणकर यांचे  प्रशंसापत्र देऊन अभिनंदन केले.