महायुतीच्या जागा वाटपाचा तिढा दिल्ली दरबारी सुटणार ?

Santosh Gaikwad March 11, 2024 09:31 AM

अमित शहांसोबत आज दिल्लीत बैठक 

मुंबई : लोकसभा निवडणुकीच्या महायुतीचा जागावाटपाचा तिढा आज सुटण्याची शक्यता निर्माण झाली आहे. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री अजित पवार आणि देवेंद्र फडणवीस आज पुन्हा दिल्लीत जाऊन केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांची भेट घेणार आहे. या भेटीत जागावाटप निश्चित होणार असल्याची माहिती मिळत आहे. 

लोकसभा निवडणुकीची आचारसंहिता कोणत्याही क्षणी जाहीर होऊ शकते त्यामुळे सर्वच राजकीय पक्षांकडून जागा वाटप निश्चित केले जात आहे महायुती आणि महाविकास आघाडी यांच्या जागा वाटपाचे गणित अजूनही स्पष्ट होऊ शकलेले नाही मित्रपक्षाने किती जागा लढवाव्यात यावरून चर्चा  सुरू आहेत तसेच कोणत्या जागेची अदलाबदल करायची, कोणती जागा कोणी लढवावची, कोणत्या मतदार संघातून कुणाला उमेदवारी देण्यात यावी यावर सध्या खलबंत सुरू आहे. येत्या देान दिवसात आचारसंहिता जाहीर होण्याची शक्यता असल्याने, महायुती आणि महाविकास आघाडी दोघांचाही जागावाटपाचा तिढा पुढच्या ४८ तासात मिटण्याची चिन्हं आहेत. 

 महायुतीच्या जागा वाटपावर शिक्कामोर्तेब करण्यासाठी मुख्यमंत्री शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि अजित पवार सोमवारी पुन्हा दिल्लीवारी करणार आहे. भाजप ३२ ते ३५ जागांवर उमेदवार उभे करणार असल्याची माहिती मिळत आहे. तर शिंदे गटाला ८ ते १० जागा आणि अजित पवार गटाला ३ ते ४ जागा मिळणार असल्याचं सूत्रांनी सांगितलं  जातंआहे.

दुसरीकडे महाविकास आघाडीत सुद्धा जागावाटपाची चर्चा अंतिम टप्प्यात आली असून १३ जागांवर उमेदवार निश्चित झाले आहेत. उर्वरित जागांवर आज किंवा उद्या चर्चा होऊन तोडगा काढला जाईल, असं सूत्रांनी सांगितलं आहे. त्यामुळे महाविकास आघाडीतील कोणत्या पक्षाला किती जागा मिळणार? याकडे  लक्ष लागलं आहे.