पंतप्रधानांनी 141 व्या आंतरराष्ट्रीय ऑलिंपिक समितीच्या सत्राचे मुंबईत केले उद्घाटन

Santosh Sakpal October 14, 2023 10:47 PM

2019 या वर्षात होणाऱ्या युवा ऑलिंपिकचे देखील यजमानपद भूषवण्यासाठी भारत उत्सुक आहे
भारतीय केवळ क्रीडाप्रेमीच नाहीत तर आम्ही खेळ जगत आहोत
भारताच्या क्रीडा वारशावर संपूर्ण जगाचा अधिकार आहे. खेळामध्ये कोणीही पराभूत नसतात तर केवळ विजेते आणि शिकणारे असतात
आम्ही भारतातील क्रीडा क्षेत्रात समावेशकता आणि विविधतेवर भर देत आहोत
आंतरराष्ट्रीय ऑलिंपिक समितीच्या कार्यकारी मंडळाने क्रिकेटचा ऑलिंपिक मध्ये समावेश करण्याची शिफारस केली आहे आणि आम्ही त्याबाबत लवकरच सकारात्मक बातमी ऐकण्याची आशा करत आहोत

नवी दिल्‍ली, : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आज मुंबईत आंतरराष्ट्रीय ऑलिंपिक समितीच्या 141 व्या 17 चे उद्घाटन केले. हे सत्र क्रीडा क्षेत्राशी संबंधित विविध हितधारकांना परस्परांशी संवाद साधण्याची आणि ज्ञानाची देवाणघेवाण करण्याची संधी उपलब्ध करून देत आहे. यावेळी या कार्यक्रमाला संबोधित करताना पंतप्रधानांनी हे सत्र भारतात तब्बल 40 वर्षांनी होत असल्याची बाब अधोरेखित केली. यावेळी त्यांनी उपस्थित असलेल्यांना जगातल्या सर्वात मोठ्या स्टेडियमवर भारताने विश्वचषकात मिळवलेल्या विजयाची अतिशय मोठ्या जल्लोषाच्या पार्श्वभूमीवर माहिती दिली. टीम भारत आणि प्रत्येक भारतीयाचे या ऐतिहासिक विजयाबद्दल मी अभिनंदन करतो असे ते म्हणाले.

भारतीय संस्कृती आणि जीवनशैलीचा खेळ हा एक महत्त्वाचा भाग असल्यावर पंतप्रधानांनी भर दिला. ज्यावेळी तुम्ही भारतातील गावांमध्ये जाता त्यावेळी तुम्हाला खेळाशिवाय कोणताही सण हा अपूर्ण असल्याचे दिसेल असे पंतप्रधानांनी सांगितले. भारतीय केवळ क्रीडाप्रेमीच नाहीत पण आम्ही खेळ जगत असतो असे मोदी म्हणाले. यावेळी त्यांनी भारताच्या हजारो वर्षांच्या इतिहासामध्ये प्रतिबिंबित होत असलेली क्रीडा संस्कृती अधोरेखित केली मग ती सिंधू संस्कृती असेल वेदिक कालखंड असेल किंवा त्यानंतरचा कालखंड असेल भारताचा क्रीडा वारसा हा अतिशय समृद्ध राहिला आहे असे पंतप्रधानांनी अधोरेखित केले.

भारतातील प्राचीन क्रीडा परंपरेविषयीचे वैज्ञानिक पुरावे पंतप्रधानांनी आपल्या भाषणात सादर केले. धोलविरा यूनेस्को जागतिक वारसा स्थळाचा त्यांनी उल्लेख केला आणि या  5000 वर्षे जुन्या नगर नियोजनात क्रीडाविषयक पायाभूत सुविधांचा उल्लेख असल्याचेही त्यांनी सांगितले. उत्खनननात दोन स्टेडियम म्हणजे बांधीव मैदाने देखील आढळली, त्यापैकी एक त्या काळातील जगातल्या सर्वात मोठ्या मैदानापैकी एक होते. त्याचप्रमाणे, राखीगढी इथेही खेळाशी संबंधित संरचना आढळल्या आहेत. “भारताचा हा क्रीडाविषयक वारसा संपूर्ण जगाचा आहे” असेही पंतप्रधान यावेळी म्हणाले.

“खेळात कोणीही पराभूत होत नाही, खेळात फक्त विजेते आणि त्यातून धडा घेणारे असतात.” असे पंतप्रधान म्हणाले. खेळांची भाषा आणि त्यांची भावना जगभरात एकसारखीच आहे. खेळ म्हणजे केवळ स्पर्धा नाही, तर खेळ मानवतेच्या मूल्यांचा विस्तार करण्याची संधी आपल्याला देतो.” आणि म्हणूनच, कोणाचाही विक्रम झाला तर त्याचा आनंद, उत्सव जगभरात साजरा होतो. क्रीडाक्षेत्र, वसुधैव कुटुंबकम, म्हणजेच एक देश, एक कुटुंब आणि एक भविष्य ही भावना अधिक दृढ करते, असे ते पुढे म्हणाले. भारतात गेल्या काही काळात क्रीडा क्षेत्राच्या विकासासाठी करण्यात आलेल्या उपाययोजनांची त्यांनी माहिती दिली. खेलो इंडिया क्रीडा स्पर्धा, खेलो इंडिया युवा स्पर्धा, खेलो इंडिया हिवाळी स्पर्धा, खासदार क्रीडा चषक स्पर्धा आणि लवकरच सुरू होणाऱ्या खेलो इंडिया पॅरा स्पर्धांचा त्यांनी उल्लेख केला. “आम्ही भारतात क्रीडा क्षेत्रात सर्वसमावेशकता आणि विविधता आणण्यावर भर देत आहोत” असे पंतप्रधानांनी अधोरेखित केले.

क्रीडा जगतात, भारताच्या खेळाडूंच्या चमकदार कामगिरीसाठी सरकारचे प्रयत्नही उपयुक्त ठरले,असे त्यांनी सांगितले. ऑलिंपिक्स मध्ये भारतातील अनेक अॅथलिट्स ने केलेल्या दिमाखदार कामगिरीचे त्यांनी स्मरण केले आणि अलीकडेच संपलेल्या अधियाई क्रीडा स्पर्धेतली भारताची आजवरची सर्वोत्तम कामगिरी असल्याचाही उल्लेख केला. जागतिक विद्यापीठ स्पर्धेतही युवा खेळाडूंनी नवे विक्रम नोंदवले आहेत, असे गौरवोद्गार त्यांनी काढले.भारताच्या क्रीडाविश्वात अत्यंत वेगाने होत असलेले सकारात्मक बदल त्यांनी अधोरेखित केले.  

जागतिक क्रीडा स्पर्धांचे यशस्वी आयोजन करण्याची क्षमता भारताने सिद्ध केली आहे यावर त्यांनी भर दिला. काही महिन्यांपूर्वी भारताने, बुद्धीबळ ऑलिम्पियाड चे आयोजन केले होते, ज्यात 186 देशांचे खेळाडू सहभागी झाले होते, तसेच फूटबॉलची 17 वर्षांखालील मुलींची जागतिक अजिंक्यपद स्पर्धा, हॉकी विश्वचषक, महिलांची मुष्टियुद्ध स्पर्धा, नेमबाजी विश्वचषक स्पर्धा, आणि सध्या सुरू असलेला क्रिकेट विश्वचषक, अशी उदाहरणे त्यांनी दिली. भारतात दरवर्षी सर्वात मोठ्या क्रिकेट लीगचे आयोजन केले जाते, हे ही त्यांनी अधोरेखित केले. आयओसी कार्यकारी मंडळाने, ऑलिंपिक स्पर्धेत क्रिकेटचा समावेश करण्याची शिफारस केली आहे, अशी माहिती त्यांनी दिली आणि ही शिफारस मान्य केली जाईल, असा विश्वासही त्यांनी व्यक्त केला.

जागतिक कार्यक्रम ही भारतासाठी जगाचे स्वागत करण्याची संधी आहे हे अधोरेखित करून पंतप्रधानांनी यावर भर दिला की भारताची वेगाने विस्तारणारी अर्थव्यवस्था आणि सुविकसित पायाभूत सुविधांमुळे जागतिक कार्यक्रमांचे आयोजन करणे भारतासाठी अनुकूल आहे.  त्यांनी जी 20 शिखर परिषदेचे उदाहरण दिले, जेव्हा देशातील 60 हून अधिक शहरांमध्ये कार्यक्रम आयोजित केले गेले आणि त्यांनी सांगितले की हा प्रत्येक क्षेत्रातील भारताच्या आयोजन क्षमतेचा पुरावा आहे. भारताच्या 140 कोटी नागरिकांचा विश्वास पंतप्रधानांनी सर्वांसमोर मांडला.

“भारत ऑलिम्पिकचे यजमानपद भूषविण्यासाठी उत्सुक आहे.  2036 मध्ये ऑलिम्पिकच्या यशस्वी आयोजनाच्या तयारीत भारत कोणतीही कसर ठेवणार नाही, हे 140 कोटी भारतीयांचे स्वप्न आहे,” असे पंतप्रधान म्हणाले.  सर्व हितसंबंधियांच्या पाठिंब्याने हे स्वप्न पूर्ण करण्याची देशाची आकांक्षा आहे, यावर त्यांनी भर दिला.  “भारत 2029 मध्ये होणाऱ्या युवा ऑलिम्पिकच्या यजमानपदासाठी देखील उत्सुक आहे”, अशी  टिप्पणी मोदी यांनी केली आणि विश्वास व्यक्त केला की आंतरराष्ट्रीय ऑलिंपिक संघटना भारताला आपला पाठिंबा देत राहील.

पंतप्रधान म्हणाले की, “खेळ हा केवळ पदके जिंकण्यासाठी खेळला जात नाही तर ते मने जिंकण्याचे एक माध्यम आहे.  खेळ सर्वांसाठी सर्वांचा आहे.  तो केवळ चॅम्पियन तयार करत नाही तर शांतता, प्रगती आणि निरोगीपणाला प्रोत्साहन देतो.  म्हणूनच, खेळ हे जगाला जोडण्याचे आणखी एक माध्यम आहे.”  पुन्हा एकदा प्रतिनिधींचे स्वागत करून पंतप्रधानांनी अधिवेशन सुरू झाल्याचे घोषित केले.

आंतरराष्ट्रीय ऑलिम्पिक समितीचे अध्यक्ष थॉमस बाख आणि आंतरराष्ट्रीय ऑलिम्पिक समितीच्या सदस्या श्रीमती नीता अंबानी, इत्यादी याप्रसंगी उपस्थित होते..

 

पार्श्वभूमी

आंतरराष्ट्रीय ऑलिम्पिक समिती  सदस्यांची प्रमुख बैठक म्हणून आयओसी अधिवेशन घेतले जाते.   ऑलिम्पिक खेळांच्या भविष्याबाबत महत्त्वाचे निर्णय आयओसी अधिवेशनामध्ये घेतले जातात.  सुमारे 40 वर्षांच्या कालावधीनंतर भारत दुसऱ्यांदा आयओसी अधिवेशन आयोजन करत आहे.  आयओसीचे 86 वे अधिवेशन 1983 मध्ये नवी दिल्ली येथे झाले होते .

भारतात आयोजित होत  असलेले 141 वे आयओसी अधिवेशन हे जागतिक सहकार्याला चालना देण्यासाठी, खेळातील उत्कृष्टता साजरी करण्यासाठी तसेच मैत्री, आदर आणि उत्कृष्टतेच्या ऑलिम्पिक आदर्शांना पुढे नेण्यासाठी राष्ट्राच्या समर्पणाचे प्रतीक आहे.  हे विविध खेळांशी संबंधित भागधारकांमध्ये परस्परसंवाद आणि ज्ञानाची देवाणघेवाण करण्याची संधी प्रदान करते.

या अधिवेशनाला आंतरराष्ट्रीय ऑलिम्पिक समितीचे अध्यक्ष थॉमस बाख आणि आयओसीचे इतर सदस्य यांच्यासह भारतीय ऑलिम्पिक संघटनेसह विविध क्रीडा महासंघांचे प्रमुख, भारतीय क्रीडा क्षेत्रातील व्यक्ती आणि प्रतिनिधी उपस्थित होते.