ठाकरे vs शिंदे : शिवाजी पार्कवर दसरा मेळावा कुणाचा ?

Santosh Gaikwad September 29, 2023 05:27 PM


मुंबई : शिवसेनेत दोन गट पडल्यामुळे आता दोन दसरा मेळावे होतात. आगामी निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर ठाकरे आणि शिंदे दोघांसाठी दसरा मेळावा महत्वाचा आहे. गेल्या वर्षी शिवाजी पार्कवर दसरा मेळावा घेण्यासाठी शिंदे आणि ठाकरे दोन्ही गट आमनेसामने आले होते. या पार्श्वभूमीवर यावर्षी एक महिन्याच्या आधीच दोन्ही गटांकडून शिवाजी पार्क मैदानासाठी अर्ज करण्यात आला आहे. त्यामुळे आता प्रशासनापुढे पेच निर्माण झाला आहे. गेल्यावर्षीप्रमाणे यावर्षी देखील मेळाव्याच्या जागेवरुन राजकारण होण्याची शक्यता आहे. त्यामुळे शिवाजी पार्कवर दसरा मेळावा कुणाचा होणार ? याकडे लक्ष वेधले आहे. 


 शिवाजी पार्क मैदानावर दरवर्षी शिवसेनेकडून दसरा मेळाव्याचे आयोजन करण्यात येते. मात्र, गेल्या वर्षी शिवसेनेत फूट पडल्याने शिवसेनेचे दोन गट निर्माण झाले. यातच शिवाजी पार्कवर दसरा मेळावा घेण्यासाठी दोन्ही गटांमध्ये वाद निर्माण झाला होता. दरम्यान, न्यायालयाच्या आदेशानुसार ठाकरे गटाला दसरा मेळाव्याची परवानगी मिळाली होती. तर शिंदे गटाकडून बीकेसी मैदानावर दसरा मेळावा घेण्यात आला होता. या सगळ्या प्रकारामुळे शिवसेनेचा दसरा मेळावा चर्चेचा विषय ठरला होता. हा सगळा प्रकार लक्षात घेता यावर्षी दोन्ही गटांकडून महिनाभरापूर्वीच मुंबई महापालिकेकडे अर्ज करण्यात आला आहे. त्यामुळे आता पुन्हा एकदा हे दोन्ही गट आमनेसामने येणार असल्याचे बोलले जात आहे. दोन्ही गटांनी महिनाभरापूर्वीच अर्ज केला असल्याने आता महापालिका कोणाला परवानगी देणार याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे. 


 दसरा मेळाव्यातून बाळासाहेब ठाकरे वर्षभराच्या राजकारणाची रुपरेषा ठरवायचे. त्यामुळे सर्वांच्या नजरा आता उद्धव ठाकरे यांच्याकडे आहेत. एकनाथ शिंदे शिवसेनेतून बाहेर पडल्यानंतर त्यांनी शिवसेनेवर दावा केला आहे. निवडणूक आयोगाने देखील शिंदेच्या बाजूने निर्णय दिला. त्यामुळे उद्धव ठाकरे आपली बाजू मजबूत करण्यासाठी प्रयत्न करणार आहेत. 


१९ जून १९६६ रोजी बाळासाहेब ठाकरे यांनी शिवसेनेची स्थापना केली. शिवसेनेचा पहिला मेळावा दसऱ्याच्या दिवशी होणार असल्याची घोषणा ठाकरे यांनी पक्ष स्थापनेच्या वेळी केली होती. बाळासाहेब ठाकरेंच्या घोषणेनुसार दादरच्या शिवाजी पार्कवर ३० ऑक्टोबरला दसऱ्याच्या दिवशी मेळावा झाला होता.


१९६६ पासून दरवर्षी दसरा मेळावा होत आहे. आत्तापर्यंत असे दोनच प्रसंग आले आहेत जेव्हा ही रॅली झाली नाही. २००६ मध्ये पहिल्यांदाच मुसळधार पावसामुळे मुंबईत रॅली होऊ शकली नाही. तसेच, २००९ मध्ये विधानसभा निवडणुकीमुळे मेळावा आयोजित करण्यात आला नव्हता. २०१४ मध्ये शिवसेनेने शिवाजी पार्कवर पारंपरिक दसरा पूजा केली. त्याच वर्षी विधानसभेच्या निवडणुकाही झाल्या. त्यानंतर बोरिवलीत दसरा मेळावा आयोजित करण्यात आला होता.


यंदाच्या सभेत सर्वात महत्त्वाची बाब म्हणजे शिवसेनेचे दोन गटात विभाजन झाले आहे. दरवर्षीप्रमाणे शिवाजी पार्कवर उद्धव ठाकरे गटाचा मेळावा होतो.  मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वाखालील शिवसेनाही दसरा मेळाव्याचे आयोजन करत आहे. दोन्ही गटांकडून रॅलीची तयारी जोरात सुरू आहे.

-----