समीर वानखेडेंना अटकेपासून तात्पुरता दिलासा

Santosh Gaikwad May 19, 2023 06:02 PM

मुंबई : आर्यन खान प्रकरणात समीर वानखेडे यांना अटकेपासून तात्पुरता दिलासा मिळाला आहे. वानखेडे यांना २४ मे पर्यंत अटक करू नये असा महत्वाचा निर्णय मुंबई उच्च न्यायालयाने दिला आहे. किंगखान शाहरूख खानचा मुलगा आर्यन खान याला ड्रग्ज प्रकरणात अटक केल्यानंतर त्याच्या सुटकेसाठी शाहरूखकडे २५ कोटीची लाच मागितल्याचा आरोप वानखेडे यांच्यावर आहे. 

 

समीर वानखेडे यांनी मुंबई हायकोर्टात   धाव घेत रिट पिटीशन दाखल केली होती. या याचिकेवर आज हायकोर्टात सुनावणी झाली. हायकोर्टाने या याचिकेवरील सुनावणी २४ मेपर्यंत तहकूब केली आहे. हायकोर्टाने समीर वानखेडे यांना २४ मेपर्यंत अटक करु नका असे निर्देश सीबीआयला दिले. या सुनावणी वेळी कोर्टाने समीर वानखेडे यांना संरक्षण देखील दिले आहे. हायकोर्टाने सीबीआयला याप्रकरणी समीर वानखेडे यांचा जबाब नोंदविण्याच्या सूचना दिल्या. त्याचबरोबरच समीर वानखेडे यांनी सीबीआयला तपासात सहकार्य करावे असे देखील सांगण्यात आले. हायकोर्टाने समीर वानखेडे यांना २२ तारखेला सीबीआयला उत्तर देण्यास संगितले आहे. या सुनावणीवेळी विधिज्ञ रिझवान मर्चंट आणि आबाद पोंडा यांनी समीर वानखेडे यांची हायकोर्टात बाजू मांडली. दरम्यान, कोर्टाच्या बाहेर आल्यानंतर समीर वानखेडे यांनी माध्यमांना प्रतिक्रिया दिली. यावेळी त्यांनी 'मला केंद्र सरकार आणि सीबीआयवर पूर्ण भरोसा आहे. ते मला नक्की न्याय देतील.' असा विश्वास व्यक्त केला.