मराठा आरक्षणाचा निर्णय संसदेच्या विशेष अधिवेशनातच घ्या:- नाना पटोले

Santosh Gaikwad September 04, 2023 05:28 PM


मुंबई, दि. ४ सप्टेंबर  : मराठा समाजाच्या आरक्षणाचा प्रश्न भारतीय जनता पक्षाच्या सरकारनेच चिघळवला आहे. भाजपा आरक्षण विरोधी पक्ष आहे त्यामुळे त्यांना आरक्षण द्यायचेच नाही. केंद्रात ९ वर्षांपासून भाजपाचे सरकार आहे पण त्यांनी निर्णय घेतला नाही. मराठा समाजाला आरक्षण देण्याची भाजपाची प्रामाणिक इच्छा असेल तर संसदेच्या विशेष अधिवेशनातच मराठा आरक्षणाचा निर्णय घेऊन मराठा समाजाला न्याय द्यावा, अशी मागणी महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष नाना पटोले यांनी केली आहे.  


माध्यमांशी बोलताना काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले म्हणाले की, मराठा समाजासह मागास समाजांना आरक्षण द्यायचे असेल तर सध्याची ५० टक्क्यांची मर्यादा हटवावी लागणार आहे. ही मर्यादा हटवण्याचे अधिकार केंद्र सरकारकडे आहेत. केंद्राने ही मर्यादा हटवावी पण केंद्रातील भाजपा सरकार त्यासंदर्भातील निर्णय घेत नाही. मराठा व धनगर समाजाला खोटे आश्वासन देऊन भाजपा सत्तेत आले आणि त्यानंतर त्यांनी या सामाजाला आरक्षण दिले नाही. विधानसभेत घाईगडबडीत मराठा आरक्षणाचा कायदा केला पण तोही सुप्रीम कोर्टात टिकला नाही. मराठा समाजाला मीच आरक्षण देऊ शकतो अशी गर्जना फडणवीस यांनी केली होती पण सत्तेत येऊन दिड वर्ष झाली अजून मराठा समाजाला आरक्षण दिलेले नाही.


राज्यातील तिघाडी सरकारने आज पुन्हा एक बैठक घेऊन मराठा आरक्षणावर बाजू मांडण्याचा प्रयत्न केला. एक महिनाच्या वेळ सरकारने मागितला आहे, हा प्रकार वेळकाढूपणाचा आहे. मराठा आरक्षणप्रश्नी मविआ सरकारवर खापर फोडण्याचा प्रयत्न आहे हास्यास्पद आहे. कोर्टात टिकणारे आरक्षण दिले असा दावा तत्कालीन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केला होता मग ते सुप्रीम कोर्टात का टिकेल नाही? फडणवीसांनी केंद्र सरकारशी बोलून मराठा आरक्षणाचा नवव्या सूचीत समावेश का केला नाही ?

मुळात भाजपाला आरक्षण द्यायचे नाही हे स्पष्ट आहे. आजच्या बैठकीतून कोणताही ठोस निर्णय सरकारने जाहीर केला नाही. सरकारने समाजासाठी काही निर्णय घेतले याची यादी वाचून दाखवण्यात आली पण मराठा समाजाला आरक्षण कसे देणार यावर एक शब्दही काढला नाही.विरोधी पक्षांवर आरोप करून काहीही साध्य होणार नाही, असेही पटोले म्हणाले.  


जालना जिल्ह्यात लहान-थोर सर्वांनाच पोलिसांनी प्रचंड मारहाण केली यात अनेकजण जखमी झाले. ही घटना जाणीवपूर्वक करण्यात आली आहे. मराठा समाजाला ओबीसी कोट्यातून आरक्षणातून देण्याची मागणी काही लोक करत आहेत यामागे दोन्ही समाजात भांडणे लावण्याचा प्रयत्न होत आहे. असेही पटोले म्हणाले.