सुषमा अंधारेंचा आमदार शिरसाटांवर तीन रूपयांचा दावा

Santosh Gaikwad April 03, 2023 03:32 PM

मुंबई : ठाकरे गटाच्या उपनेत्या सुषमा अंधारे यांनी आक्षेपार्ह वक्तव्य केल्याप्रकरणी  शिवसेना शिंदे गटाचे आमदार संजय शिरसाट यांच्यावर तीन रूपयांचा अब्रनुकसानीचा दावा दाखल करणार आहे. याप्रकरणी अंधारे यांनी शिवाजीनगर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल केला आहे तसेच महिला आयोगाकडे तक्रार दाखल केली होती. त्यानंतर आज अंधारे यांनी शिरसाट यांच्यावर तीन रूपयांचा अब्रुनुकसानीचा दावा दाखल केला आहे. 


आमदार संजय शिरसाट यांनी छत्रपती संभाजीनगर मधील मेळाव्यात ठाकरे गटाच्या उपनेत्या सुषमा अंधारे यांच्याबद्दल वादग्रस्त विधान केलं होत. त्यामुळे शिरसाट चांगलेच अडचणीत सापडले आहेत. शिरसाटांवर सर्वच स्तरातून टीकेची झोड उठवली जात आहे. यावेळी माध्यमांशी बोलताना सुषमा अंधारे म्हणाल्या की,  मी मध्यमवर्गीय आहे. त्यामुळे आमच्याकडे अब्रुशिवाय काही नाही. अब्रुची तशी किंमत करता येत नाही. तिची लाखो करोडोमध्ये किंमत होऊ शकत नाही. त्यामुळे मला कुठली आर्थिक लाभांश स्टंटबाजीमध्ये पडायचे नाही. पण मी भटक्या विमुक्तातून येते आणि अशा अपराधासाठी शिरसाट यांच्यावर तीन रूपयांचा दावा दाखल करणार आहे. शिरसाट यांच्यावर  विविध पोलिस ठाण्यात तक्रारी दाखल करण्याचा प्रयत्न केला, मात्र एकही जिल्ह्यात तक्रार दाखल झाली नाही, असा आरोप यावेळी केला. अमृता फडणवीस यांच्या सांगितलेल्या माहितीवरुन तक्रार दाखल होते. शीतल म्हात्रे प्रकरणात लोकांना उचलले जाते, मात्र आमची तक्रारही दाखल केली जात नाही," अशी टीकाही सुषमा अंधारे यांनी यावेळी केली. दरम्यान शिरसाट यांनी   "सुषमा अंधारेंबद्दल एकही शब्द 'अश्लील' बोलल्याचे दाखवा, मी तात्काळ राजीनामा देतो," असा खुलासा केला आहे. माझ्यासाठी सत्ता महत्वाची नाही. मी चुकीचे काहीही बोललो असल्याचं सिद्ध केल्यास मी लगेच माझ्या आमदारकीचा राजीनामा देण्यासाठी तयार असल्याचे शिरसाट म्हणाले आहेत.